हिवाळी अधिवेशन सरकारची ‘परिक्षा’ ठरणार  

मराठा आरक्षण, अवनी हत्या, दुष्काळ, जलयुक्त शिवार आदी मुद्दे गाजणार 

मुंबई: येत्या सोमवारपासून मुंबईत सुरु होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासह धनगर आणि मुस्लिम आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी, यवतमाळमधील अवनी वाघिणीची हत्या, शिवस्मारक, जलयुक्त शिवार, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या… आदी मुद्दे गाजण्याची शक्‍यता आहे. केवळ नऊ दिवस चालणारे हे अधिवेशन सरकारची परिक्षा घेणारे ठरणार असले तरी विरोधकांचा हल्ला परतवण्यासाठी सत्ताधारी सज्ज झाले आहेत.

येत्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबई विधानभवन येथे सुरू होत आहे. गेल्या अनेक अधिवेशनात गाजणारा कर्जमाफीचा मुद्दा या अधिवेशनात पुन्हा ऐरणीवर येणार आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या विरोधकांसह सत्तेत असलेल्या शिवसेनेने कर्जमाफीपासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे.

कर्जमाफी देवूनही कर्जमाफी आणि नापिकीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी यवतमाळ येथील एका शेतकऱ्याने, तर चिखलीतील आशा इंगळे या शेतकरी महिलेने स्वत:ची चिता रचून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या मुद्‌द्‌यावर विरोधक सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकतात.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल नुकताच सरकारला सादर केला आहे. मराठा समाजाने येत्या 1 डिसेंबरला जल्लोषाला तयार राहावे, असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी विरोधक या प्रकरणी कामकाजाच्या पहिल्या दिवसापासूनच हा मुद्दा लावून धरण्याची शक्‍यता आहे.

यवतमाळमधील बोराटीच्या जंगलात अवनी या वाघिणीला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच वादग्रस्त ठरले आहे. अवनीच्या हत्येवरून सत्ताधारी शिवसेना आणि विरोधक वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर एकतर्फी हल्लाबोल करण्याची रणनीती आखली आहे. याच मुद्‌द्‌यावरून विरोधक मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी करू शकतात, असे बोलले जात आहे. त्यामुळे हे अधिवेशनात चांगलेच गाजण्याची चिन्हे आहेत
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने धनगर समाजासह मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाणार आहे.

राज्य सरकारने राज्यातील 26 जिल्ह्यातील 151 तालुक्‍यात दुष्काळ जाहिर केला आहे. दुष्काळग्रस्तांसाठी उपाययोजना केल्या गेल्या असल्या तरी त्यांना अजून नुकसानभरपाई दिली गेलेली नाही. नुकसानभरपाईसाठी राज्य सरकार केंद्राकडून मिळणाऱ्या निधीवर अवलंबून असल्याने या मुद्यावर विरोधक आक्रमक भूमिका घेणार आहे. टंचाईची परिस्थिती असलेल्या अनेक तालुक्‍यात दुष्काळ जाहिर करण्याची मागणी विरोधकांकडून केली जाईल, अशी शक्‍यता आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर होणारे यावर्षातील हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनात जास्तीत जास्त जनेतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याशिवाय विरोधकांकडून विविध विभागांचा घोटाळे बाहेर काढून अनेक मोठे गौप्यस्फोट केले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सभागृहात सत्ताधारी व विरोधकांमध्ये वादाची ठिणगी पडणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहे.

सिद्धेश पवारच्या मृत्यूचा जाब विचारणार 
अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या शिवस्मारकाच्या उंचीचा वाद पुन्हा उद्‌भण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. तर नुकत्याच झालेल्या स्मारकाच्या पायभरणीच्या समारंभावेळी स्पीड बोटला अपघात होवून शिवसंग्राम संघटनेचा कार्यकर्ता सिद्धेश पवार याचा मृत्यू झाला होता. सरकारी कार्यक्रम असताना त्यासाठी कार्यकर्त्यांची गरजच काय होती, असा प्रश्न उपस्थित करून विरोधक सरकारला जाब विचारणार असल्याचे बोलले जात आहे.

भूजल पातळी घटली 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार याजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची रणनिती आखली आहे. 14 हजार गावांची भूजल पातळी 1 मीटरने घटली असल्याचा भूजल विभागाने दिलेल्या अहवालावरून गदारोळ होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)