दिवाकर रावते यांचे निर्देश
मुंबई – कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पातील टप्पा क्रमांक 3 असलेल्या हिवर्डा कालवा उपसा सिंचन प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची प्रक्रिया जलद गतीने राबविण्यात यावी. तसेच या शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावाप्रमाणे जमीन अधिग्रहण कायदा 2013 नुसार जास्तीत जास्त भरपाई देण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांना दिले.

प्रकल्पग्रस्त शेतकरी उमेश नायकिंदे, मारुती कुदळे आदींनी आज यासंदर्भात मंत्रालयात मंत्री रावते यांची भेट घेतली. यावेळी आयोजित बैठकीत रावते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनद्वारे निर्देश दिले. बैठकीस गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहीरकर, जलसंपदा विभागाचे उपसचिव संजय तिरमानवार आदी उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी 75 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला असून उर्वरीत रक्कमही लवकरच वितरीत करण्यात येईल, अशी माहिती यावेळी उपस्थित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन करुन कालव्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. पण या प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अजूनही त्याचा मोबदला मिळालेला नाही. ही गंभीर बाब असून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला तातडीने देण्यात यावा.

जमीन अधिग्रहण कायदा 2013 नुसार आणि आजच्या बाजारभावाप्रमाणे जास्तीत जास्त मोबदला या शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी सूचना यावेळी रावते यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)