हिवरे कुंभारच्या सरपंचांनी बदले गावचे नाव

शिक्रापूर- शिरूर तालुक्‍यातील हिवरे कुंभार या गावाचे नाव हिवरे करण्याचा पराक्रम येथील गावाचा सरपंचांनी केला आहे. अनेक दिवसांपासून प्रत्येक शासकीय कार्यालयावर तसेच ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर तसेच नाहरकत प्रमाणपत्रावर हिवरे कुंभार हे असताना काही महिन्यांपूर्वी नव्याने निवड झालेल्या सरपंचांनी गावच्या लेटर पॅडवर गावचे नाव हिवरे केले आहे. गावचे नाव परस्पर बदल केल्याने अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
हिवरे कुंभार (ता. शिरूर) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सप्टेंबर 2017 मध्ये माया जगताप या कार्यरत झाल्या. त्यांनतर त्यांनी ग्रामपंचायतचे दाखले, ना हरकत प्रमाणपत्र तसेच लेटर पॅड बनवून घेताना पूर्वी असलेल्या सर्व सरपंचांच्या लेटर पॅडवर तसेच दाखल्यांवर हिवरे कुंभार नाव होते. मात्र, जगताप यांनी त्यावर हिवरे कुंभार ऐवजी केवळ हिवरे असे गावचे नामकरण केले आहे. एकीकडे गावातील जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय, लोकसंख्या फलक, ग्रामपंचायत कार्यालय, सांस्कृतिक भवन तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामविकास अधिकारी यांच्या नोंदवहीमध्ये ग्रामपंचायत हिवरे कुंभार या नावाने शिक्के आहेत. असे असताना देखील मनमानी करून हिवरे कुंभार ऐवजी हिवरे असे गावचे नाव त्यांनी केले आहे.
अलिकडील काळामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात येणाऱ्या दाखले आणि उताऱ्यांवर हिवरे कुंभार ऐवजी हिवरे असे नाव छापून येत आहे. त्यामुळे नागरिकांना पुढील काळामध्ये शासकीय कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. तर शिरूर तालुक्‍यामध्ये गावचे नाव हिवरे कुंभार म्हणून परिचित आहे. गावामध्ये चाललेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये आपल्या गावचे नाव हिवरे कुंभार की हिवरे? असा संभ्रम निर्माण झाला आहे. तर याबाबत सरपंच माया जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलणे टाळले. त्याबाबत त्यांच्या पतींनी प्रतिक्रिया देत गावामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून सरपंच यांनी हिवरे कुंभार ऐवजी हिवरे नाव टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या रेकॉर्डनुसार गावचे नाव हिवरे आहे. गावातील काही ठिकाणी हिवरेच नाव असल्याचे त्यांच्या पतींनी सांगितले आहे. सरपंचांचा प्रतिनिधी म्हणून मी बोलत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 • सरपंच यांनी लेटर पॅडवर आणि दाखले छापले. त्यावर हिवरे असे नाव केलेले होते. या गावचे नाव हिवरे कुंभार की हिवरे याबाबत मला जास्त काहीही माहिती नाही.
  – अर्चना गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी, हिवरे कुंभार ग्रामपंचायत.
 • हिवरे कुंभार गावचे नाव हिवरे करत असल्याबाबत अथवा हिवरे गावचे नाव हिवरे कुंभार करत असल्याबाबत आमच्या कार्यालयाकडे कोणताही मसुदा आलेला नाही.
  – रणजीत भोसले, तहसीलदार, शिरूर.
 • महिला सरपंच केवळ नामधारी?
  हिवरे कुंभार (ता. शिरूर) ग्रामपंचायतच्या सरपंच महिला असून ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात येणारे निर्णय तसेच चालणारे कामकाज हे सरपंचांचे पतीच पाहत आहेत. महिला सरपंच असल्यामुळे मलाच काम पहावे लागते. मीच सरपंच असल्याचे त्यांचे पती खुलेआम सांगत आहे. त्यामुळे महिला सरपंच केवळ नामधारी आहेत काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
 • रेकॉर्डवर आढळते हिवरे?
  आमच्या रेकॉर्डवर हिवरे आढळून येत असून तरी देखील मी विस्तार अधिकारी यांना याबाबत तपासणी करण्यास सांगत आहे, असे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)