हिल मॅरेथॉनवर इथिओपियाचा झेंडा

सात हजार रनर्सने घेतला सहभाग
भारतीय गटात आदिनाथ भोसले अन मनिषा साळुंखे प्रथम

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) – सातारा शहराचे नाव जगाच्या नकाशावर पोहचविणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनवर यंदाच्या वर्षी ही इथिओपियाच्या रनर्सने झेंडा रोवला असून खुल्या गटातील पुरूष व महिला गटात प्रथम क्रमांकांची बक्षिसे इथिपोअियाच्या रनर्सने पटकावली. तर भारतीय गटात मांढरदेव, ता. वाईच्या आदिनाथ भोसले व पुण्याच्या मनिषा साळुंखे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदांच्या वर्षी ही हिल मॅरेथॉनमध्ये देश विदेशातील सात हजार स्पर्धकांनी सहभाग घेतल्यामुळे साताऱ्यातील वातावरण मॅरेथॉनमय झाले होते.
रविवारी सकाळी 6 वाजता तालीमसंघ मैदान येथे खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्यासह संयोजक उपस्थित होते. स्पर्धेचा शुभारंभ होताच धावण्यासाठी उत्सुक झालेल्या रनर्समध्ये उत्साह निर्माण झाला होता. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकांनी 21 किलोमीटरचे उदिष्ट पुर्ण करण्याचे दृष्टीने सुरूवातीपासून धावण्याचा जोर वाढवला होता. तालीमसंघ ते राजवाडा ते बोगदा यवतेश्‍वर या मार्गावर धावताना घाटमाथ्यांवरून श्रावणसरी कोसळत होत्या. त्यामुळे निसर्गरम्य घाट परिसरातून धावताना रनर्सचा उत्साह आणखी वाढत होता. त्यात मार्गावर ठिकठिकाणी स्वयंसेवकांनी पिण्याचे पाणी, बिस्कीटे, औषधांची सुविधा उपलब्ध केली होती. तसेच स्पर्धा होण्यापुर्वी तालीमसंघ मैदानावर ढोल ताशांचा गजर आणि मार्गावर देखील रनर्सचा उत्साह वाढविण्यासाठी वाद्य वाजविली जात होती. त्याचप्रमाणे सातारकरांनी देखील ठिकठिकाणी उभा राहून रनर्सना चिअरअप केल्याचे दिसून येत होते. त्यामुळे आपसुकच देश विदेशातून आलेले स्पर्धक आणि साताकरांचे एक घट नाते निर्माण झाले असल्याचे देखील दिसून आले.
अडीच तासांच्या स्पर्धेनंतर समारोप व बक्षिस समारंभ तालीमसंघ मैदान येथे करण्यात आला. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना औरंगाबाद परिक्षेत्राचे महानिरीक्षक कृष्णप्रकाश व तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार व पीएनबी मेटालाईफचे पदाधिकारी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. खुल्या पुरूष गटात सिकीयास ओबात (इथिओपिया) याने 1 तास 07 मिनिटे 57 सेंकदात 21 किलोमीटरचे अंतर पूर्ण करत प्रथम क्रमांक व 1 लाख 50 हजार रूपयांचे रोख बक्षिस पटकावले. त्यापाठोपाठ इथिओपियाच्याच ऍडिलाडिल्यू मॅमो याने 1 तास 09 मिनिटात 21 किलोमीटरचे अंतर पूर्ण करत व्दितीय क्रमांकांचे 1 लाख रूपयांचे तर केनियाच्या जॉन सेलेल याने 1 तास 10 मिनिटे 27 सेंकदात 21 किलोमीटरचे अंतर पुर्ण करत 75 हजार रूपयांचे बक्षिस पटकावले. खुल्या महिला गटात इथिओपियाच्या अबिजेज गेला यांनी 1 तास 20 मिनिटे 1 सेंकदात 21 किलोमीटरचे अंतर पुर्ण करत करत 1 लाख 50 हजार रूपयांचे बक्षिस पटकावले तर व्दितीय क्रमांक केनियाच्या पास्कालिया चिपकागेल यांनी 1 तास 21 मिनिटे 32 सेंकदात 21 किलोमीटरचे अंतर पुर्ण करत 1 लाख रूपयांचा आणि तृतीय क्रमांक इथिओपियाच्या मिसरेट बिरू यांनी 1 तास 22 मिनिटात 17 सेंकदात अंतर पुर्ण करत 75 हजार रूपयांचे बक्षिस पटकावले.
भारतीय पुरूष गटात मांढरदेव, ता. वाई येथील आदिनाथ भोसले याने पटकावला. त्याने 1 तास 17 मिनिटे 09 सेंकदात 21 किलोमीटरचे अंतर पुर्ण करत 50 हजार रूपयांचे बक्षिस पटकावले. व्दितीय क्रमांक खिंडवाडी ता. सातारा येथील स्वप्निल सावंत याने पटकावला. त्याने 1 तास 17 मिनिटे 19 सेंकदात 21 किलोमीटरचे अंतर पुर्ण करत 30 हजार रूपयांचे बक्षिस पटकावले. तर तृतीय क्रमांक पालघर येथील काशिनाथ गोरे याने 1 तास 18 मिनिटे 41 सेंकदात अंतर पूर्ण करत 20 हजार रूपयांचे बक्षिस पटकावले. भारतीय महिला गटात पुणे येथील मनिषा साळुंखे यांनी 1 तास 35 मिनिटे 32 सेंकदात 21 किलोमीटरचे अंतर पुर्ण करत 50 हजार रूपयांचे बक्षिस पटकावले. व्दितीय क्रमांक मनिषा चावरकर यांनी पटकावले. त्यांनी 1 तास 36 मिनिटे 10 सेंकदात अंतर पुर्ण करत 30 हजार रूपयांचे बक्षिस पटकावले. तृतीय क्रमांक मांढरदेव ता. वाई येथील जनाबाई हिरवे यांनी पटकावले असून त्यांनी 1 तास 37 मिनिटात अंतर पुर्ण केले. त्यांना 20 हजार रूपयांचे बक्षिस वितरित करण्यात आले.

यंदा स्पीड कमी राहिले : नांगरे-पाटील
मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील धावले. धावण्याचा अनुभव सांगताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत धावण्याचा अनुभव प्रेरणादायी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी स्पीड जरा कमी राहिले. मात्र, मॅरेथॉनमध्ये जाताना चढ आणि येताना उतार हे वेगळेपण असल्याने हिल मॅरेथॉनचे नाव आता जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे.

युध्द मे विजय प्राप्त करने का अनुभव : कृष्णप्रकाश
औरंगाबाद परिक्षेत्राचे महानिरीक्षक कृष्णप्रकाश हे मागील पाच वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी सहभागी झाले. अनुभव सांगताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत धावण्याचा खूप मोठा आंनद आहे. येथील नैसर्गिक विहंगम दृश्‍य आणि स्पर्धेत धावून उद्दिष्ट पुर्ण केल्यानंतर युध्दात विजय प्राप्त केल्याप्रमाणे अनुभव येतो आहे. मी मागील 5 वर्षापासून या स्पर्धेत धावतोय आणि यापुढे देखील सहभागी होणार आहे.

ताण तणावापासून दूर राहता येते : कैलास शिंदे
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास हे हिल मॅरेथॉन सुरू झाल्यापासून स्पर्धेत सहभागी होत आहेत. ते यंदाच्या सातव्या स्पर्धेत सहभागी होवून धावले. समारोपप्रसंगी बोलताना ते म्हणाले, नियिमित धावण्यामुळे आरोग्य सुदृढ तर राहतेच त्याचबरोबर जीवनमान देखील चांगले राहते. त्याचबरोबर रोजच्या धावपळीच्या आयुष्यात निर्माण होणारा ताण-तणावापासून दूर राहता येते. यंदाच्या सातव्या स्पर्धेत धावताना आजपर्यंत सर्वात कमी वेळात अंतर पुर्ण करता आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)