हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : पुणे सिटीचा चेन्नईयीनवर विजय

चेन्नई: हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात गतविजेत्या चेन्नईयीन एफसीची अधोगती कायम राहिली. एफसी पुणे सिटीने येथील नेहरू स्टेडियमवर पिछाडीवरून बाजी मारत 2-1 असा विजय मिळविला. मध्यंतरास गोलशून्य बरोबरीची कोंडी होती. केरळा ब्लास्टर्सकडून पाचारण केलेल्या सी. के. विनीत याने चेन्नईयीनचे खाते उघडले होते. त्यानंतर मार्सेलिनीयो याने लागोपाठ दोन गोल केले. नवे प्रशिक्षक फील ब्राऊन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सिटीने हिवाळी ब्रेकनंतर आपल्या मोहिमेला विजयी प्रारंभ केला.

पुण्याने 13 सामन्यांत चौथा विजय मिळविला असून दोन बरोबरी व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 14 गुण झाले. पुण्याचा सातवा क्रमांक कायम राहिला. चेन्नयीनला 14 सामन्यांत 11वा पराभव पत्करावा लागला. एकमेव विजय व दोन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे केवळ पाच गुण असून त्यांचा शेवटचा दहावा क्रमांक कायम राहिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खाते उघडण्याची शर्यत यजमान संघाने जिंकली. ग्रेगरी नेल्सन आणि रॅफेल आगुस्टो यांनी रचलेल्या चालीमुळे अनिरुध थापाला पास मिळाला. त्याने बॉक्‍सलगत मार्किंग नसलेल्या विनीतला पास दिला. चेंडू पुण्याचा मध्यरक्षक साहील पन्वर याच्या पायाला लागून विनीतकडे गेला. मग विनीतने उरलेले काम चोख पार पाडले. चेन्नईयीनची आघाडी जेमतेम चार मिनिटे टिकली. 59व्या मिनिटाला लालडीनलीना रेंथलेई याने चेंडूवरील ताबा गमावला. त्यामुळे पुणे सिटीच्या मार्को स्टॅन्कोविच याने संधी साधली. त्याने मार्सेलिनीयोला पास दिला. मार्सेलिनीयोचा फटका तेवढा ताकदवान नसूनही चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजीत सिंग चकला.

त्यानंतर चेन्नईयीनने पुन्हा चेंडूवरील ताबा गमावल्यामुळे आशिक कुरुनीयन याला संधी मिळाली. त्याने दिलेल्या पासवर मार्सेलिनीयने सफाईदार गोल केला आणि मग दोन्ही हात आकाशाकडे करीत भावपूर्ण जल्लोष केला. पुण्याने सकारात्मक सुरवात केली. पहिल्याच मिनिटाला त्यांनी प्रयत्न केला. इयन ह्यूमने रॉबिन सिंगला अप्रतिम पास दिला. त्यावेळी चांगली संधी असताना व चेंडूवर व्यवस्थित नियंत्रण मिळविले असताना रॉबिनला डाव्या पायाने ताकदवान फटका मारता आला नाही. त्यामुळे करणजीत चेंडू सहज अडवू शकला.

सातव्या मिनिटाला दिएगो कार्लोसने उजवीकडून बॉक्‍समध्ये मुसंडी मारली. त्याने दोन बचावपटूंना चकविले, पण अखेरीस लालडीनलीना रेंथलेईने त्याला रोखले. चेन्नईयीनला पहिली संधी 12व्या मिनिटाला मिळाली. ग्रेगरी नेल्सन याने उजवीकडून बॉक्‍समध्ये क्रॉस पास देत हालीचरण नर्झारी याच्यासाठी संधी निर्माण केली. नर्झारी मात्र ढिलाईमुळे चेंडूवर नीट ताबा मिळवू शकला नाही. तरिही त्याने प्रयत्न केला, पण चेंडू नेटच्या बाहेरील बाजूला लागला. पुण्याने लगेच प्रतिआक्रमण रचले. रॉबिनला मध्य क्षेत्रात पास मिळाला. त्याने ह्यूमला व ह्यूमने मार्सेलिनीयोला पास दिला. त्याचवेळी एली साबियाने चेन्नईयीनसाठी बचाव केला. नर्झारीने 18व्या मिनिटाला जादा ताकद लावल्यामुळे संधी गेली.

निकाल : 
चेन्नईयीन एफसी : 1 (सी. के. विनीत 55) पराभूत विरुद्ध
एफसी पुणे सिटी : 2 (मार्सेलिनीयो परेरा 59, 60)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)