हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : चेन्नईयीनला हरवित जमशेदपूरची आगेकूच

जमशेदपूर: हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात जमशेदपूर एफसी पुन्हा विजयी मार्गावर परतला असून साखळी सामन्यात त्यांनी गतविजेत्या चेन्नईयीन एफसीवर 3-1 अशी एकतर्फी मात केली. पुर्वार्धातील दोन गोलांच्या जोरावर जमशेदपूरने विजय साकार केला. पाब्लो मॉर्गाडो, कार्लोस कॅल्वो आणि मारीओ आर्क्वेस यांनी गोल केले. चेन्नईयीनचा एकमेव गोल रफाएल बॅस्तोस याने केला. कॅल्वो आणि बॅस्तोस यांचे गोल पेनल्टीवर झाले.

सामन्यात जमशेदपूरची सुरवात सकारात्मक होती. दहाव्या मिनिटाला पाब्लो मॉर्गाडोने उजवीकडून मुसंडी मारली. त्याच्या पासमुळे मायकेल सुसैराज याला चेंडू मिळाला. त्याने आगेकूच करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून केवळ कॉर्नर मिळू शकला, ज्यावर अखेरीस काही घडले नाही. 11व्या मिनिटाला बिकाश जैरू याने डावीकडून मुसंडी मारत बॉक्‍समध्ये प्रवेश केला, पण एली साबिया याने चपळाईने चेंडू बाहेर घालविला. त्यातून मिळालेल्या कॉर्नर किकवर काही घडले नाही. मात्र, सकारात्मक सुरवातीनंतर जमशेदपूरने 14व्या मिनिटाला गोल करत आपले खाते उघडले.

उजवीकडून मिळालेल्या फ्री किकवर कॅल्वोने मारलेला चेंडू चेन्नईयीनच्या मैल्सन आल्वेस याने थोपविला होता. हा चेंडू बॉक्‍समध्ये मॉर्गाडोकडे जाताच त्याने छातीने नियंत्रीत करीत नेटच्या उजव्या कोपऱ्यात जोरदार फटका मारत लक्ष्य साधले. त्यावेळी चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजीत सिंग याला चेंडू रोखण्याची कोणतीही संधी मिळू शकली नाही. तर, जमशेदपूरने दुसरा गोल 29व्या मिनिटाला पेनल्टी वर केला. सुसैराजने डावीकडून पलिकडील बाजूला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण करणजीतने चेंडू थोपविला. हा चेंडू सुमित पासी याच्यापाशी गेला. तो सहा यार्ड बॉक्‍समधून प्रयत्न करणार तोच जेरी लालरीनझुला याने त्याला मागून पाडले. त्यानंतर पंच उमेश बोरा यांनी जमशेदपूरला तातडीने पेनल्टी बहाल केली. त्यावर कॅल्वोने करणजीतचा अंदाज चुकवित नेटच्या डाव्या कोपऱ्यात लिलया चेंडू मारला.

दोन गोलांच्या पिछाडीनंतर चेन्नईयीनला 34व्या मिनिटाला फ्री किक मिळाली. त्यावर अनिरुध थापा याने मारलेल्या चेंडूवर आल्वेसने हेडिंग केले, पण तो अचूकता साधू शकला नाही. 40व्या मिनिटाला थापाने बॉक्‍समध्ये चेंडू मिळताच मारलेल्या फटक्‍यात अचूकता व ताकद नव्हती. त्यामुळे जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉलने चेंडू आरामात अडविला. मात्र, चेन्नईयीनने दुसऱ्या सत्रात खाते उघडले. बिकाश जैरू याने ग्रेगरी नेल्सन याला पाडले. त्यामुळे चेन्नईयीनला पेनल्टी मिळाली. त्यावर रफाएल आगुस्तोने डाव्या कोपऱ्यात फटका मारला. 68व्या मिनिटाला चेन्नईयीनने पिछाडी कमी केल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, पण चार मिनिटांनी जमशेदपूरने तिसरा गोल केला.

कॅल्वोने डावीकडून मारीओ आर्क्वेस याला पास दिला. त्या मार्गात राजू गायकवाड होता. त्यामुळे करणजीतला चेंडूचा नीट अंदाज आला नाही. राजूने पाय मध्ये घातल्यामुळे तो आणखी चकला आणि चेंडू नेटमध्ये गेला. हा गोल मारीओच्या नावावर जमा झाला.

या मोसमात विजयाने सुरवात केलेल्या जमशेदपूरला चार बरोबरी साधाव्या लागल्या. त्यानंतर दुसरा विजय मिळताच बरोबरी व एफसी पुणे सिटीविरुद्ध पराभव असे धक्के त्यांना बसले होते. त्यामुळे घरच्या मैदानावरील हा विजय जमशेदपूरसाठी मोलाचा ठरला. जमशेदपूरने नऊ सामन्यांत तिसरा विजय मिळविला असून पाच बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 14 गुण झाले. जमशेदपूरने पाचवरून दोन क्रमांक प्रगती करीत तिसरे स्थान गाठले. त्यांनी नॉर्थइस्ट युनायटेड एफसी व मुंबई सिटी एफसी (प्रत्येकी 14) या दोन संघांना मागे टाकले. यात जमशेदपूरचा गोलफरक 6 (18-12), नॉर्थइस्टच्या 4 (12-8) व मुंबईच्या उणे 1 (7-7) पेक्षा सरस ठरला. नॉर्थइस्टचे सात, तर मुंबईचे आठ सामने झाले आहेत. तर, चेन्नईयीनला आठ सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागला. एक विजय व एका बरोबरीसह त्यांचे चार गुण असून शेवटून दुसरे म्हणजे नववे स्थान कायम राहिले. त्यांचा गोलफरक उणे 6 (10-16) इतका घसरला आहे.

निकाल :
जमशेदपूर एफसी : 3 (पाब्लो मॉर्गाडो 14, कार्लोस कॅल्वो 29-पेनल्टी, मारीओ आर्क्वेस 72)  पराभूत विरुद्ध चेन्नईयीन एफसी : 1 (रफाएल आगुस्तो 68-पेनल्टी)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)