हिरे बंधूंची शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत घरवापसी

नाशिकमधील राजकीय चित्र बदलणार…

मुंबई: भाजपाने केलेल्या भ्रमनिरासामुळे नाशिक-मालेगाव येथील प्रशांत हिरे आणि अपूर्व हिरे या बंधूंनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत घरवापसी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी हिरे बंधूंचे पक्षात सन्मानाने स्वागत केले. या घरवापसीमुळे नाशिकमधील राजकीय चित्र बदलेल, असा विश्वास व्यक्त करतानाच पक्षप्रवेशाचे असे प्रसंग पुन्हा-पुन्हा घडतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

भाजपमध्ये प्रवेश हा हिरे कुटुंबियांसाठी अपघात होता. हिरे कुटुंबाची विचारधारा भिन्न आहे. मालेगावची राजकीय स्थिती बदलण्यासाठी छगन भुजबळ व जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला म्हणून हा पक्षप्रवेश झाला. भुजबळांच्या भुजांना प्रशांत, अपूर्व हिरे बळ देतील, असा विश्वास पक्षप्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेली नाशिकच्या विकासाची स्वप्ने खरी होणार नाहीत, याची खात्री पटल्याचे प्रशांत हिरे या वेळी म्हणाले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, नाशिक दत्तक घेतो. पण काहीच झाले नाही. मुख्यमंत्री म्हणजे सपनों के सौदागरमधले राज कपूर आहेत. ते फक्त स्वप्नं विकतात. विकासाचा खरा मार्ग माननीय पवार साहेबच दाखवू शकतात, असे अपूर्व हिरे यावेळी म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, कोषाध्यक्ष हेमंत टकले, राष्ट्रीय सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आदींसह शेकडो कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
19 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)