हिरडोशीत घराला लागली आग

जोगवडी- भोर-महाड रस्त्यावरील हिरडोशी (धामणदेव) गावातील रामचंद्र गोरे यांच्या घराला आग लागून घरातील सर्व जीवनाश्‍यक वस्तू खाक झाल्या आहेत. घराच्या फक्त भिंती शिल्लक राहिल्या असून लाकडी तुळया, कौले, खांब तसेच अन्य वस्तू जळून गेल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गोरे यांची परिस्थिती हलाखीची असून ते उदरनिर्वाहासाठी मुंबई येथे नोकरी करीत आहेत. घटनेच्या वेळी ते मुंबईला होते. गुरुवारी (दि. 28) दुपारी दोन वाजता शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली. घराचे छप्पर जळून नष्ट झाले आहे. तसेच घरातील पाच पोती तांदूळ, पंचवीस मन न भरडलेला भात, वरई पाच पोती, नाचणी चार पोती, कपडे, भांडी, फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू व महत्वाचे कागदपत्रे जळून गेली आहेत. या आगीत 6 लाख 62 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे गोरे यांनी सांगितले. तलाठी स्वप्नील आंबेकर व मंडलाधिकारी पांडुरंग लहारे यांनी पंचनामा केला. यावेळी अरुण मालुसरे, ग्रामसेवक पदमाकर डोंबाले, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी गोरे यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)