मंचर- आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील हिरकणी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पिंपरी-चिंचवड येथील विज्ञान केंद्राला भेट दिली. विज्ञान सहलीच्यानिमित्ताने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान केंद्रामधे चाकाच्या शोधापासून आतापर्यंतच्या सर्व ऍटोमोबाइल क्षेत्रातील तंत्रज्ञानाची आधुनिक माहिती,सौर ऊर्जेचे व्यवहारातील विविध उपयोग, ऊर्जेचे रूपांतरण, हवामान क्षेत्राशी संबधित प्रतिकृती, थ्री-डी मॉडेल शो, तारांगण तारामंडलचे प्रत्यक्ष निरीक्षण, विज्ञानातील गमती -जमती, हास्य गॅलरी, विज्ञान बागेतील प्रत्यक्ष वैज्ञानिक खेळणीचा स्वानुभव घेऊन विद्यार्थी आणि शिक्षक भारावून गेले. ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली याबाबत चित्र प्रतिकृती माहितीद्वारे प्रक्षेपणातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट झाल्या. तसेच संस्थेचे संचालक अनिल गावडे यांच्या विशेष प्रयत्नातीन बेटली फाउंडेशन, पुणे या कंपनीकडून संगणक आणि ई-लर्निंग संच विद्यालयाला भेट देण्यात आली. क्षेत्र भेटीचा समारोप विज्ञान प्रश्‍नमंजूषा कार्यक्रमाने झाला, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक उत्सुकतेला प्रोत्साहन मिळाले, अशी माहिती मुख्याध्यापक विनोद बोंबले यांनी दिली. या विज्ञान सहलीची व्यवस्था जनार्दन मेंगडे, निवृत्ती हुले, ज्योती दहितुले, विठ्ठल रासकर यांनी पाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)