हिमालयाची सावली 

डॉ. न. म. जोशी 

हिमालयाची सावली हे वसंत कानेटकरांचं नाटक रंगभूमीवर खूप गाजलं. एका व्रतस्थ समाजकार्यकर्त्याच्या पत्नीला अवघं आयुष्य त्यागाच्या वेदीवर जगावं लागतं हा त्या नाटकाचा विषय होता. अशा अनेक सावल्या महाराष्ट्रात होऊन गेल्या.
भाई वैद्य हे थोर समाजवादी कार्यकर्ते. भाईंचं लग्न संगमनेरच्या नलिनी दुर्वे यांच्याशी झालं. लग्नाच्यावेळी भाईंनी सांगितलं होतं…

मी नोकरी करणार नाही. माझं आयुष्य मी समाजवादी चळवळीला दिलंय. नलिनी वैद्य यांनी हा बिनकामाचा नवरा स्वीकारला आणि एकदा स्वीकारल्यानंतर ती भूमिका निष्ठेनं निभावून नेली. भाईंची अट स्वीकारून नलिनीताई पुण्यात आल्या. सार्वजनिक संडास असलेल्या चाळवजा घरात राहिल्या. घर चालविण्यासाठी म.न.पा. शाळेत शिक्षिकेची नोकरी करू लागल्या. घरात पाहुण्यारावळ्यांचा राबता. नवरा समाजकार्यात. कार्यकर्त्यांचीही वर्दळ नेहमीची. पण नलिनीताईंनी हा सारा व्याप सांभाळून संसार केला काटकसर तरी किती? बसचे पैसे वाचविण्यासाठी आणि भाजी स्वस्त मिळेल तेथून घेऊन सायकलला पिशवी अडकवून ही माऊली संसाराचा गाडा ओढत होती.

यथावकाश भाईंना राहण्यासाठी स्वयंपूर्ण छोटी सदनिका मिळाली. नंतर भाई पुण्याचे महापौर झाले. महापौर निवासातही महापौरांच्या पत्नी तितक्‍याच साध्या होत्या. भाईंचा तुरुंगवास नेहमीचाच. स्वतःची नोकरी, मुलांची शिक्षणं याकडं माऊलीनं काटेकोर लक्ष देत भालचंद्र सदाशिव वैद्य यांचा संसार सुरळित सुरू ठेवला. मुलगा अभिजित शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत आला. मराठीत त्यानं पारितोषिक मिळवलं. मुलगीही उत्तम शिकली.

आणीबाणीच्या कालखंडात भाई 19 महिने तुरुंगात होते. अर्थातच संसाराचा भार या हिमालयाच्या सावलीवरच होता.
आणीबाणी संपली. भाई राज्याचे गृहराज्यमंत्री झाले. नलिनीताईंनी संसार सुरू ठेवण्यासाठी मुंबईच्या शाळेत बदली करून घेतली. तोरणा बंगल्यावर निवास! पण नलिनीताई शाळा सुटल्यावर दोन बस बदलून भाजीच्या पिशव्या घेऊन तोरणावर येत. मंत्र्याची लाल दिव्याची गाडी आपल्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी त्यांनी कधीही वापरली नाही. काही अधिकाऱ्यांनी तसे सुचवूनही त्यांनी गाडीचा वापर टाळला.

आजच्या चंगळवादी युगात, सत्तेचे मान असणाऱ्यांनाही दंतकथा वाटेल. पण ती सत्यकथा आहे. कारण ती एका हिमालयाच्या सावलीची कथा आहे.

कथाबोध 
कर्तृत्ववान पण त्यागी वृत्तीच्या कार्यकर्त्यांच्या पत्नीला इतरांपेक्षा वेगळे जीवन जगावे लागते. भोगाचा त्याग करून त्यागाचा स्वीकार करावा लागतो. निश्‍चयाचे बळ आणि तत्त्वनिष्ठेची उदात्त झळ असेल तर या त्यागी जीवनाचाही आनंद घेता येतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)