पुणे- गोड चवीचे सफरचंद म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. त्यातल्या त्यात हिमाचल प्रदेशचे फळ अधिक रसाळ आणि चवदार असल्याने ते खाण्यास नागरिक पसंती देतात. या सफरचंदाची मार्केट यार्डातील फळ विभागात आवक सुरू झाली आहे. पोषक वातावरणामुळे उत्पादन अधिक असल्याने भावही सर्वसामान्यांच्या आटोक्‍यात असल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.
बाजारात दररोज 10 ते 12 ट्रकची आवक होत आहे. 25 ते 30 किलोच्या बॉक्‍सला घाऊक बाजारात 1500 ते 2500 रूपये भाव मिळत आहे. इतर वेळी विदेशातील कोल्ड स्टोरेजमधील सफरचंद बाजारात असतात. मात्र, सद्य:स्थितीत सफरचंदचा हंगाम सुरू झाल्याने ताजे सफरचंद बाजारात उपलब्ध होत आहेत. मागील वर्षी हिमाचलमध्ये सफरचंदसाठी पोषक वातावरण नव्हते. त्यामुळे चांगल्या प्रतिचा माल बाजारात येत नव्हता. यावर्षी मात्र, फळाचा दर्जा चांगला असून, तो टिकून राहणार आहे. रॉयल, रिचर्ड, व्हाईट गोल्डन, रेड गोल्डन आदी प्रकारचे सफरचंद बाजारात दाखल होत आहेत. सफरचंदला पोषक वातावरण असल्याने फळधारणा अधिक झाली आहे. त्यामुळे येत्या काळात रोज 15 ते 20 ट्रकपर्यंत आवक जाणार आहे. मालाचा दर्जा मात्र कायम टिकून असणार आहे. मागील वर्षी मालाचा दर्जा खालावला होता. त्यामुळे नागरिकांनी खरेदीकडे पाठ फिरविली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)