हिमाचलात विरभद्रसिंह बंडाच्या पवित्र्यात

कॉंग्रेस श्रेष्ठींपुढे नवीन पेच

सिमला – हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विरभद्रसिंह यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींपुढे बंडाचे निशाण फडकवले आहे. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुखविंदरसिंह सुखु यांना पदावरूून काढून टाकावे आणि त्यांच्या जागी आशा कुमार यांची नियुक्ती केली जावी आणि आगामी विधानसभा निवडणूकीत आपल्याला सर्वाधिकार दिले जावेत अशा त्यांच्या मागण्यात आहेत. या प्रकरणात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली असून या संबंधात चर्चा करण्यासाठी सोनियांची वेळ मागितली आहे.

प्रदेशाध्यक्ष सुखविंदरसिंह सुखु यांना पदावरून त्वरीत हटवावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर आपण विधानसभेची निवडणूक लढवणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या 27 समर्थक आमदारांनीही विरभद्रसिंह निवडणूक लढवणार नसतील तर आम्हीही निवडणूक लढवणार नाही असा इशारा दिला आहे.

हिमाचल प्रदेशात कॉंग्रेसचे एकूण 36 आमदार आहेत. तेथे लवकरच विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत ऐन निवडणूक काळात ही नवीन समस्या उद्‌भवल्यामुळे कॉंग्रेस श्रेष्ठी पेचात पडले आहेत. विरभद्रसिंह यांची मागणी मान्य करायची की नाही यावरून कॉंग्रेस नेत्यांमध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाला त्यांचे म्हणणे ऐकावे असे वाटते तर दुसऱ्या गटाने त्यांना धूप घालण्याची गरज नाही अशी भूमिका घेतली आहे.

कॅ. अमरिंदर यांचे केले अनुकरण
पंजाबात तेथील विधानसभा निवडणुकीपुर्वी कॅ अमरिंदरसिंग चयांनीही पक्षश्रेष्ठींच्या पुढे अशीच स्थिती निर्माण केली होती. त्यावेळी अमरिंदर सिंग यांनी राहुल गांधी यांनी निवडलेले प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष प्रतापसिंग बाजवा यांना हटवण्याची व निवडणुकीत आपल्याला सर्वाधिकार देण्याची मागणी केली होती. त्यांच्या दबावामुळे बाजवा यांना त्यांच्या पदावरून हटवावे लागले होते. याचेच अनुकरण आता विरभद्रसिंह यांनी हिमाचलात केले आहे. त्यांच्या या भूमिकेवर राहुल गांधी विदेश दौऱ्यावरून परत आल्यावर निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)