हिंदुस्थान एरोनॉटिक्‍सला ऑफसेट पार्टनर होण्यात स्वारस्य नाही 

व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केली भूमिका 

बंगळुरू – आम्हाला आता कोणत्याही विमान निर्मिती करणाऱ्या कंपनीशी ऑफसेट पार्टनर म्हणून काम करण्यात स्वारस्य नाही त्याऐवजी आम्ही टोटल टेक्‍नॉलाजी ट्रान्स्फर पार्टनर म्हणून काम करण्यास उत्सुक आहोत असे हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष आर माधवन यांनी म्हटले आहे.

राफेल विमानांच्या संबंधात जो वाद सुरू आहे त्या संबंधात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना माधवन यांनी हे प्रतिपादन केले. राफेल विमाने बनवणाऱ्या दसॉल्ट कंपनीने अनिल अंबानी यांच्या सध्या अस्तित्वात नसलेल्या कंपनीला आपल्या कंपनीचा ऑफसेट पार्टनर म्हणून मान्यता दिली आहे. तथापी युपीए सरकारने हे काम सरकारी मालकीच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स कंपनीला हे काम देऊ केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी केलेल्या या प्रतिपादनाला महत्व आहे.

युपीए सरकारने जो करार प्रस्तावित केला होता त्यात राफेल कंपनीने या विमानांचे तंत्रज्ञान हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स कंपनीला द्यावे आणि भारतातच 118 राफेल विमानांचे उत्पादन सुरू करावे अशी तरतूद होती. पण हा करार मोदी सरकारच्या काळात बदलला गेला.

माधवन म्हणाले की, आमच्या कंपनीला विमानांचे उत्पादन करण्यात आणि त्यांची देखभाल तसेच दुरूस्तीची कामे करण्यात स्वारस्य आहे. जगातल्या अन्य कोणत्याही मुळ विमान कंपनीचे ऑफसेट पार्टनर म्हणून काम करण्यात आम्हाला स्वारस्य नाही, असे ते म्हणाले. सध्या राफेल विमानांच्या कोणत्याच प्रक्रियेत हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स कंपनीचा सहभाग नाही पण एकेकाळी आमचा त्या प्रक्रियेशी संबंध होता असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)