हिंदुत्ववाद ज्यांना हवा ते सोबत येतील ; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा

जालना: ‘ज्यांना हिंदुत्ववाद हवे आहे, त्यांना सोबत घेऊन, ज्यांना नको, त्यांच्याशिवाय’ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला. जालन्यात झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बोलत होते.
युतीवर बोललो नाही, तर प्रसार माध्यमे माझ्या भाषणाला किंमत देणार नाहीत. भाजप लाचार नाही, ज्यांना हिंदुत्ववाद हवा आहे, ते सोबत येतील, ज्यांना नको, त्यांच्याशिवाय भाजप निवडणुका लढवेल. आता आपले सैन्य तयार करुन लोकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. युती असली-नसली तरी तुम्ही कामाला लागा, असे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केले.

या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या विकासकामांची माहिती दिली. कर्जमाफी, सिंचन, पीक विमा, उद्योग अशा अनेक क्षेत्रातील कामांची माहिती त्यांनी दिली. जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. लोकसभा निवडणुकीपूर्वीची आजची शेवटची बैठक, यानंतरची बैठक विजयानंतरची होईल, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विरोधकांकडे नेतृत्व नसल्याने ते पंतप्रधान मोदींना रोखू शकणार नाहीत. भाजपला रोखण्यासाठी विरोधक एकत्र आले पण विरोधकांची ही महाआघाडी कुचकामी ठरेल, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. भाजपविरोधासाठी जे एकमेकांचे तोंड पाहत नव्हते, ते देखील एकमेकांसोबत युती करत आहेत. यांच्या पक्षांना नीती नाही, धोरण नाही, नियम नाही. पण नरेंद्र मोदींच्या भीतीपोटी हे लोक एकत्र आले आहेत. महागठबंधन केले तरी भाजपला काही फरक पडत नाही, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राफेल प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने कॉंग्रेसच्या थोबाडीत मारली. पण सुधारेल ती कॉंग्रेस कसली? जे मोदींसाठी हात वर करतील त्यांना निवडून आणू. सत्ता नाही, भारतमातेची सेवा करण्यासाठी मोदींना साथ द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तरी नगरपालिकेत पराभव

नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निकालावरुनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला. राष्ट्रवादीने संघर्ष यात्रा की परिवर्तन यात्रा रायगडावरून सुरु केली आणि तिथल्या कर्जतमध्ये भाजपने त्यांना पराभूत केले. गडचिरोलीच्या आरमोरी नगरपालिकेतही कॉंग्रेसला जनतेने जागा दाखवली. जनतेने त्यांना दिलेला हा प्रतिसाद आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तरी नगरपालिकेत त्यांचा पराभव झाला. त्यांचे मिळून जितके नगरसेवक निवडून आले, त्यापेक्षा जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आले, असं फडणवीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)