हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी बालेवाडीतील साडेपाच हेक्‍टर जागा

राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी
मुंबई – पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा मार्ग आता सुकर झाला आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील 5 हेक्‍टर 60 आर इतकी शासकीय जमीन सरकार देणार आहे. झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही सरकारी जमीन देण्याबाबत मंजूरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळणार आहे.

पुणे महानगर विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक- खासगी सहभागाने संकल्पित करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. या मेट्रो प्रकल्पास आवश्‍यक सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. राज्य शासनामार्फत या प्रकल्पास कोणताही अर्थपुरवठा केला जाणार नसून प्राधिकरणास हस्तांतरित होणाऱ्या शासकीय व खाजगी जमिनीच्या आर्थिक विकासातून निधीची उभारणी करण्यात येणार आहे. त्यानुसार निधी उभारण्याचा एक स्त्रोत म्हणून बालेवाडी येथील सर्व्हे क्रमांक 4/1/1 मधील 5 हेक्‍टर 60 आर इतकी शासकीय जमीन पीएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली.

आजच्या निर्णयानुसारया शासकीय जमिनीतून मंजूर विकास योजनेंतर्गत 30 मीटर व 18 मीटर विकास योजना रस्त्याच्या प्रस्तावाने बाधित क्षेत्र वगळून उर्वरित जमीन महसूल अधिनियम -1966 च्या कलम 40 मधील तरतुदीनुसार भोगवटामूल्य विरहित पद्धतीने देण्यात येणार आहे. या जमिनीचा व्यावसायिक विकास करताना त्रयस्थ हितसंबंध (थर्ड पार्टी इंटरेस्ट) निर्माण करता येईल, असाही निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)