हिंजवडी बनतेय “गुन्हेगारीचे हब’

पिंपरी – पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे हिंजवडी आयटी पार्क आता “समस्यांचे हब’ म्हणून नावारुपाला येत आहे. तेथील वाहतूक कोंडी तर जगप्रसिद्ध आहेच पण याठिकाणी गुन्हेगारीनेही आता डोके वर काढले आहे. रसिला खून प्रकरणानंतर महिला सुरक्षेच्या अनेक उपाययोजना करुनही महिलांची असुरक्षितता कायम असल्याचे शुक्रवारी (दि. 26) उघड झालेल्या तरुणीच्या अपहरण प्रकरणावरुन समोर आले आहे.

आयटी पार्कमुळे हिंजवडीने जगाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे येथे घडणाऱ्या घटना देखील चर्चेत राहतात. गुरुवारी रात्री एक 22 वर्षीय तरुणी तिच्या मित्रसोबत रात्री नऊच्या सुमारास हिंजवडीतील पेट्रोल पंपाजवळ थांबली होती. तिला अचानक एका कारमधून आलेल्या चार तरुणांनी कारमध्ये ओढत तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडा-ओरडा केल्यानंतर तिला सोडून देत नराधमांनी तेथूून धूम ठोकली. त्यामुळे ती बचावली. मात्र, या घटनेमुळे दिल्लीतील निर्भयापासून ते हिंजवडीतील रसिला खून प्रकरणापर्यंत आठवणी ताज्या झाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्तीगत लक्ष घालत तरुणीसोबत झालेल्या विनयभंगाचा प्रकार उघडकीस आणला. पण हा प्रकार पहिलाच नव्हता तर आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींचे असे अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. यामध्ये खूनापासून विनयभंगापर्यंतच्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. इन्फोसीसमध्ये झालेल्या रसिला खून प्रकरणामुळे संपूर्ण आयटी हब हादरले होते. कंपनीच्या सुरक्षा रक्षकानेच तिचा खून केला होता. या आधीही एकतर्फी प्रेमातून तळवडे आयटी पार्क येथे अंतरा दास हिचा मारेकऱ्याकरवी खून करण्यात आला होता. एकामागोमाग घडलेल्या या घटनांमुळे पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीला मोठा हादरा बसला होता. कॅन्डल मार्च व मानवी साखळीद्वारे महिला असुरक्षिततेकडे लक्ष वेधल्यानंतर पोलिसांनी काही उपाययोजना केल्या. मात्र, त्या तात्पुरत्या ठरल्या आहेत.

हिंजवडी मधील “नाईट लाईफ’ तरुणांसाठी आकर्षण ठरत आहे. पुण्यातील एफसी रोड प्रमाणे हिंजवडीतही अनेक ठिकाणी रात्री उशीरापर्यंत तरुण रस्त्यावर गप्पा मारत किंवा खात-पित फिरत असतात. हिंजवडीत काल घडलेला प्रकार “नाईट लाईफ’ला धक्का देणारा आहे. पब, नाईट क्‍लब अथवा कितीही सुशिक्षीत वर्ग याठिकाणी असला तरी सुरक्षितता नाही हे यातून सिद्ध झाले आहे. गर्दीच्या ठिकाणावरुन तरुणीचे अपहरण करुन तिचा विनयभंग केला जातो. हा तेथील बिनधास्त फिरणाऱ्या तरुणींना एक इशाराच आहे. हिंजवडी परिसरातील अर्धी लोकसंख्या ही स्थलांतरीत आहे. त्यामुळे तेथे राहणारे अनेक भाडेकरु व “पेईंग गेस्ट’ची पोलिसांकडे काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या भागात वचक बसवणे हे देखील पोलिसांपुढे आव्हान आहे. त्यामुळेच हिंजवडी येथे मुलींच्या वसतीगृहात शिरुन मुलींचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला अद्याप पोलीस बेड्या ठोकू शकलेले नाहीत.

आता गुन्हेगारांना वठणीवर आणा!
हिंजवडी आयटी पार्कमधील कंपनीच्या आवारातील किंमती वस्तुंच्या चोरीच्या घटनांमध्ये मागील काही महिन्यांमध्ये वाढ झाली आहे. इन्फोसीस कंपनीच्या आवारातील चंदनाचे झाड तोडण्याचा प्रयत्न झाला. ही घटना जरी छोटी असली तरी कंपनीची सुरक्षा यंत्रणा भेदून होत असलेला चोरीचा प्रयत्न गंभीर आहे. या कंपनीला विद्युतवाहक तारांचे कुंपण आहे. यातूनही चोरीचा प्रयत्न झाल्याने पोलीस देखील चक्रावले होते. हिंजवडीतील वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश आले आहे. त्याच धर्तीवर “आयटी हब’च्या सुरक्षेला गालबोट लावणाऱ्यांना पोलिसांनी वठणीवर आणावे, अशी अपेक्षा “आयटीयन्स’कडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)