– गोळीबार करणाऱ्याला पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव
पिंपरी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात व्यापाऱ्यावर गोळीबार करून पळून जाणाऱ्या आरोपीला पाठलाग करून पकडणाऱ्या हिंजवडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पाच हजारांचे बक्षीस देत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.
उपायुक्त नम्रता पाटील यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी सहाय्यक आयुक्त सतीश पाटील, श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे आदी उपस्थित होते.
पुणे विद्यापीठ चौकात समीर येनपुरे यांच्यावर शनिवारी (दि.18 ऑगस्ट) सकाळी गोळीबार झाला होता. यात ते जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात 8-8 कर्मचाऱ्यांची एक टीम तयार केली. गोळीबारानंतर आरोपी सांगवी किंवा हिंजवडीच्या दिशेने पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षावरून कळविण्यात आली होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील सांगवी, वाकड व हिंजवडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या टीमला सतर्क करण्यात आले होते. नाकाबंदी करून प्रत्येक वाहन तपासले जात होते. शुक्रचार्य मडाळे हा पाषाणच्या दिशेने पळाला होता. त्याच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने त्याने एका दुचाकीस्वाराला “लिफ्ट’ मागून तो पुढे जात होता. यावेळी नाकाबंदी दरम्यान, पोलीस कर्मचारी इंगळे व अहिवळे यांनी शुक्रचार्य याच्या कंबरेला पिस्तूल पाहिले. त्यांनी त्याचा पाठलाग करून पकडले. हिंजवडी पोलिसांनी संपूर्ण प्रक्रिया करून त्याला पुणे पोलिसांच्या हवाली केले. या कामगिरीबद्द्ल अतुल इंगळे व शिवाजी अहिवळे या दोघांना हे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा