हिंजवडी ते चाकण एसी बस धावणार!

पाच कोटींचा निधी : आमदार जगताप यांचा पाठपुरावा

पिंपरी – हिंजवडी ते चाकण मार्गावर बसने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. या मार्गावर आता पाच वातानुकूलित बसेस (एसी) धावणार आहेत. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी या वातानुकूलित बस खरेदीसाठी राज्य सरकारकडून 3 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच दापोडी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा ते वाकड, काळेवाडी फाटा ते चिंचवड, एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपूल या मार्गावर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यासाठी आमदार जगताप यांनी सरकारकडून 70 लाखांचा निधी आणला आहे. त्याचप्रमाणे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध व्यायामशाळांमध्ये व्यायामाचे साहित्य खरेदीसाठी 50 लाख आणि औंध ऊरो रुग्णालयाच्या परिसरात पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामे करण्यासाठीही आमदार जगताप यांनी 50 लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्यासाठी एकूण 5 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहराला लागून असलेल्या चाकण परिसराचे औद्योगिकीकरण झाले आहे. या भागात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे पुणे जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरच नव्हे; तर महाराष्ट्रातील लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. दुसरीकडे पिंपरी-चिंचवडलाच लागून असलेला हिंजवडीचा परिसरही आयटी हबमुळे जगाच्या नकाशावर झळकलेला आहे. हिंजवडीतही अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. चाकणचे औद्योगिकीकरण आणि हिंजवडी आयटी पार्कमुळे पिंपरी-चिंचवडची भरभराट होत आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी दररोज कामांसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुढाकार घेत राज्य सरकारच्या निधीतून वातानुकूलित बस (एसी) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार जगताप यांनी चाकण ते हिंजवडी दरम्यान वातानुकूलित बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली होती. तसेच सरकारने निधी मंजूर करावा यासाठी आमदार जगताप यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकण ते हिंजवडी मार्गासाठी पाच वातानुकूलित बस खरेदीला मान्यता दिली आहे. तसेच या पाच बसेससाठी 3 कोटी 30 लाखांच्या निधीला मंजुरीही दिली आहे. त्याचप्रमाणे आमदार जगताप यांनी शहरातील प्रमुख मार्गावर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यासाठीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी 50 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून दापोडी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा ते वाकड, काळेवाडी फाटा ते चिंचवड, एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपुलाच्या मार्गावर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून शहरासाठी निधी…
आमदार जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्र्यांनी औंध ऊरो रुग्णालय परिसरात पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामे करण्यासाठी सुद्धा 50 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून रुग्णालयात वैद्यकीय सेवा अद्ययावत करणे, व्हेंटिलेटर सेवा, आयसीयू बेड उपलब्ध करणे, डायलेसिस मशीन पुरवणे, पॅथॉलॉजिकल लॅब तयार करणे, दर्जा वाढ करणे, सुशोभिकरण, अंतर्गत रस्त्यांचा विकास, ड्रेनेज व्यवस्था, पथदिवे, पाणीपुरवठा, सुलभ शौचालय, समाजमंदिर दुरूस्ती, पायाभूत सुविधांची कामे केली जाणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्यासाठी एकूण 5 कोटींचा निधी मंजूर केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली असली, तर शहरातील विकासकामांसाठी राज्य सरकारचीही आर्थिक मदत व्हावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असतो. त्यातूनच मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)