हिंजवडीतील “कोंडी’; राष्ट्रवादी-शिवसेनेला “उपरती’

कलाटे बंधू आमने-सामने : आपआपल्या पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा

पिंपरी – हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मात्र, या “कोंडी’च्या मुद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी उडी घेतली आहे. या भागातील नगरसेवक असलेले शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी आपआपल्या परिने पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला या समस्येबाबत आत्ताच “उपरती’ झाली का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

हिंजवडीतील वाहतूक सक्षमीकरणासाठी पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी रस्त्यावर उतरून पाहणी आणि काही बदलही केले. त्याला “आयटीएन्स’चा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, जगभरात प्रसिद्ध असलेल्या या “आयटी पार्क’मधील वाहतुकीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते अपयशी ठरले आहेत. स्थानिक नगरसेवक राहुल कलाटे आणि मयूर कलाटे यांनी घेतलेला पुढाकार सकारात्मक असला तरी आपल्याच पक्षाच्या नेत्यांचे अपयश अधोरेखित करणारा आहे.

वास्तविक, हिंजवडी “आयटी पार्क’ हा पिंपरी-चिंचवडशी जोडला असला, तरी हा परिसर बारामती लोकसभा मतदार संघातील आहे. या ठिकाणी भोर-वेल्हा-मुळशी तालुक्‍याचे आमदार संग्राम थोपटे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तसेच, बारामतीच्या खासदार म्हणून गेल्या 9 वर्षांपासून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे या मतदार संघाचे नेतृत्त्व करीत आहेत. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत केवळ बैठका आणि निवेदन या पलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. अशा परिस्थितीत या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत का? असा प्रश्‍न उपस्थित होतो. राष्ट्रवादीचेच स्थानिक नगरसेवक मयूर कलाटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी पवार यांना निवेदन देण्यात आले.

वास्तविक, स्थानिक खासदार या नात्याने सुप्रिया सुळे यांनी याबाबत पुढाकार घेण्याची आवश्‍यकता होती. मात्र, गेल्या 9 वर्षांमध्ये खासदार सुळे हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निकालात काढण्यात अपयशी ठरल्या आहेत, असे स्पष्ट होते. तसेच, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे “कारभारी’ असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही अपयश यानिमित्ताने अधोरेखित होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिंजवडीतील वाहतूक कोंडीच्या मुद्याला “फुंकर’ घालणे राष्ट्रवादीच्या अंगलट येण्याची शक्‍यता आहे.

तत्कालीन आघाडी सरकारचीही उदासिनता
आघाडी सरकारच्या काळात स्थानिक आमदार असलेले कॉंग्रेसचे संग्राम थोपटे यांनी हिंजवडीतील कोंडी सोडवण्यात कोणत्या उपाययोजना केल्या? हाही प्रश्‍न आहे. याबाबत विधानसभा अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करुन लक्ष वेधण्याची अपेक्षा होती. मात्र, थोपटे याबाबत उदासीन भूमिकेत दिसतात. त्यामुळे आघाडी सरकार मधील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षांनी हिंजवडीतील कोंडीबाबत दूरदृष्टीने प्रयत्न करण्याची अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. हिंजवडी आयटी पार्क उभारण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोलाचा वाटा आहे, यात शंका नाही. मात्र, त्यानंतरच्या सत्ताधाऱ्यांनी राज्यातील महत्त्वाचा “आयटी हब’ असलेल्या या परिसराच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले आहे.

शिवसेनेला उशिरा सूचले शहाणपण
दुसरीकडे, राज्यात सत्तापरिवर्तन होऊन साडेचार वर्षे झाली आहेत. उद्योगमंत्री म्हणून शिवसेनेचे सुभाष देसाई यांच्याकडे राज्याची जबाबदारी आहेत. हिंजवडी आयटी पार्कमधील अनेक कंपन्या वाहतूक कोंडीच्या त्रासाने स्थलांतरीत होत आहेत, याबाबत माध्यमांमधून अनेकदा चर्चा होत असते. मात्र, याबाबत उद्योगमंत्र्यांनी सकारात्मक भूमिकेतून पुढाकार घेतलेला जाणवला नाही. त्यामुळेच स्थानिक नगरसेवक आणि गटनेता राहुल कलाटे यांनी गेल्या आठवड्यात उद्योगमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, गेल्या साडेचार वर्षांपासून उद्योगमंत्री आपल्या खात्याचा कारभार हाकत आहेत. आता निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेना नेत्यांनीही आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला आहे.

…अन्‌ भाजपचा अजेंडाही “फेकू’
भाजपनेही हिंजवडीच्या वाहतूक समस्येकडे कानाडोळा केला आहे. या परिसरातील रस्ता रुंदीकरण, अनधिकृत बांधकाम, भूसंपादन असे अनेक विषय राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. हिंजवडी ते पिंपळे सौदागर जगताप डेअरीपर्यंत उड्डाणपूल करण्याचे (कॅरिडोर) नियोजित आहे. यापैकी एमआयडीसीच्या हद्दीतील पूलाचा खर्च त्या आस्थापनेने करावा व महापालिका हद्दीतील पुलाचा खर्च महापालिकेने करावा, असा प्रस्ताव आहे. पण, एमआयडीसीकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. हिंजवडी चौकात उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे. “सिग्नल फ्री’ चौक, ग्रेडसेपरेटर, अंडरपास अशा सुविधा उपलब्ध केल्या तर हिंजवडीतील वाहतूक सुरळीत होऊ शकतो. मात्र, वाहतुकीच्या समस्येमुळे काही कंपन्या स्थलांतरीत होत असताना, भाजपचेही या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)