हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सोहळा ः डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर

रा.ना.गोडबोले सार्वजनिक ट्रस्टतर्फे महाबळेश्‍वरच्या 2 ट्रेकर्स ग्रुपना साहित्य प्रदान
सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) – आजच्या चंगळवादाच्या युगात ही मदतीचा हात देणारे शेकडो नव्हे तर हजारो आहेत. सातारा येथील समर्थं सदनने अनेक कार्यंक्रम अनुभवले मात्र आजचा सोहळा हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि आनंददायी सोहळा आहे असे उद्‌गार सातारचे ज्येष्ठ संशोधक, लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर यांनी काढले.
सातारा येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टतर्फे महाबळेश्‍वर येथील सह्याद्री ट्रेकर्स व महाबळेश्‍वर ट्रेकर्स या दोन्ही ग्रुपना दोर (रोप्स), वॉकीटॉकी, स्ट्रेचर्स आदी उपयुक्त साहित्य विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन प्रदान करण्यात आले त्यावेळी डॉ. दाभोलकर बोलत होते.
राजवाडा परिसरातील समर्थ सदनमध्ये आयोजित या कार्यक्रमास सातारचे पत्रकार आणि महाबळेश्‍वर ट्रेकर्सचे प्रमुख राहुल तपासे, सह्याद्री ट्रेकर्सचे प्रमुख बळवंत पाडळे, ट्रस्टचे विश्‍वस्त अरुण गोडबोले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
वेदमूर्ती पुष्कराज अभ्यंकर यांनी विश्‍वशांती प्रार्थना म्हणून झाल्यावर अंबेनळी घाटातील दिवंगतांना सर्वांनी श्रध्दांजली वाहून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आपल्या प्रास्ताविकात बोलताना अरुण गोडबोले म्हणाले की, नुकत्याच महाबळेश्‍वर नजीकच्या अंबेनळी घाटात झालेल्या भीषण दुर्घटनेत अपघातग्रस्तांना नि:स्वार्थी माणुसकीने मदत करणाऱ्या सह्याद्री ट्रेकर्स व महाबळेश्‍वर ट्रेकर्स या संस्थांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेने मदत करावी या आवाहनाला संपूर्ण राज्यातून नव्हे तर देशभरातून अनेकांचे सहाय्य लाभले. कोकणातील खेडेगावापासून ते मुंबईपर्यंतच्या शेकडो नागरिकांनी 51 रूपयापासून 15 हजार रूपयापर्यंत मदत दिली. ही मदत व निधी मिळून 2 लाख 35 हजार रूपयाहून अधिक रक्कम गोळा झाली. या रकमेतून या दोन्ही समुहांना रोप्स, वॉकीटॉकी, स्टेचर्स, टीशर्ट आदी साहित्य प्रदान आज करताना मोठा आनंद वाटत आहे. याच शिवाय या दोन्ही समुहातील 46 व्यक्‍तींचा पर्सनल अक्‍सिडेंट इन्शुरन्सही पुढील 2 वर्षासाठी आपण देत आहोत. ही मदत गोळा करताना 103 देणगीदारांनी सहकार्य केले त्यात 70 जण सातारचे असून 33 जण पुणे व मुंबई येथील आहेत.
यावेळी डॉ. अच्युत गोडबोले यांनी रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या कार्यांची माहिती उपस्थितांना देताना शेैक्षणिक मदतीचा उदात्त हेतु पुढे ठेउन भाऊकाकांनी सुरु केलेला हा ट्रस्ट आज आमची तिसरी पिढी वाढवत आहे. त्यातच असा कार्यक्रम म्हणजे ट्रस्टसाठी वेगळा उपक्रम ठरला आहे असे सांगितले.
यावेळी ट्रेकर्सच्या सर्व सदस्यांना टी शर्टस आणि सन्मानचिन्हाचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच या उपक्रमाला विशेष मदत करणारे आयडीबीआय ट्रस्टी कंपनीचे दिलीप पाठक, सौ.मानसी माचवे, मधुकर भागवत, कराडचे सुधीर एकांडे, वाईचे विवेक मेरुकर, फलटणचे हेमंत रानडे, पुणे येथील शशिकांत वाकणकर, महाबळेश्‍वरचे पत्रकार संजय दस्तुरे यांचा सत्कार डॉ. दाभोलकर यांचे हस्ते करण्यात आला.
आपल्या भाषणात बोलताना डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर म्हणाले की, वेळ काळाचे भान न ठेवता जीवाची बाजी लावून मदत करणाऱ्या या सर्व शूरवीरांचे रक्षणाची जबाबदारी आपली असून 2 वर्षानंतरच्या पुढील काळासाठी या सर्वाचा विमा उतरवला जावा यासाठी मी स्वत: 5 हजाराची मदत आज जाहीर करतो, व सर्वांनीच या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करतो. तसेच या सर्वाचा सत्कार करण्याची संधी मला आज मिळाली हा माझ्या आयुष्यतला मोठा बहुमान मी मानतो असे सांगितले.
यावेळी राहूल तपासे आणि बळवंत पाडळे या दोघांनी ट्रेकर्सच्यावतीने मनोगत व्यक्‍त करताना या उपक्रमाचे कौतुक करुन सर्वाचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रद्‌युम्न गोडबोले यांनी केले .
या कार्यक्रमास ट्रस्टचे विश्‍वस्त उदयन गोडबोले, अशोक गोडबोले, माजी प्राचार्यं पुरूषोत्तम शेठ, प्रा. अविनाश लेवे, अरविंद भावे, पत्रकार वासुदेव कुलकर्णी, नंदकिशोर नावंधर, सौ.अनुपमा गोडबोले, सौ. विद्या आगाशे, अनिल काटदरे, बाबुराव शिंदे, प्रदिप भट्‌टड, मुकुंद लांडगे, अतुल देशपांडे, राजू कुलकर्णी, प्रदीप चव्हाण तसेच दोन्ही ट्रेकर्स ग्रुपचे हितचिंतक, सातारा जिल्ह्यातील विवध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)