…हा तर कष्टकऱ्यांचे सुरक्षा कवच हटविण्याचा डाव!

इरफान सय्यद : माथाडी मंडळ एकत्रीकरणाच्या निषेधार्थ आंदोलन

पिंपरी – माथाडी कायद्यामध्ये बदल करुन कष्टकऱ्यांचे कवच काढून घेण्याचा भाजप सरकारचा डाव आहे, असा आरोप महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांनी केला. अध्यादेशावर निर्णय घेण्यासाठी नेमलेली समिती रद्द करावी. अन्यथा महाराष्ट्र मजदूर संघटना भविष्यात काम बंद आंदोलन करत चक्काचाम करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

माथाडी मंडळे एकत्र करण्याचा निषेधार्थ चिंचवड, केएसबी चौकातील आमदार दिवंगत आण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष खंडू गवळी, मुरलीधर कदम, ज्ञानोबा मुजुमले, भिवाजी वाटेकर, कार्याध्यक्ष परेश मोरे, सरचिटणीस प्रवीण जाधव, चिटणीस सर्जेराव कचरे आदी उपस्थित होते.

इरफान सय्यद म्हणाले, भाजप सरकारने यापूर्वीच राज्यातील 36 जिल्हास्तरीय माथाडी मंडळे बरखास्त करुन एकच माथाडी मंडळ स्थापनेचा घाट घातला होता. त्यावेळी राज्यातील माथाडी कामगारांनी राज्यभर मोर्चे काढले, निदर्शने केली. त्यावेळी सरकारने हा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले होते. परंतु, पुन्हा माथाडी मंडळामध्ये सुसुत्रता आणण्याच्या गुळगुळीत नावाखाली कामगार अधिकाऱ्यांची एक समिती नेमली आहे. त्याबाबतचा आदेश पारित केला आहे. या समितीत एकही कामगार नेता नाही. ही समिती सरकारच्या बाजूने अहवाल देणार आणि सरकार त्यांच्या मर्जीतील एकाची महामंडळावर नियुक्ती करणार आहे. एवढेच नव्हे तर अनेक माथाडी मंडळांमध्ये पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग नसताना काही मंडळातील कर्मचारी दुस-या मंडळामध्ये नेमण्याचे आदेश जारी केले आहे. भाजप सरकारला माथाडी मंडळे बंद करायची आहेत. कामगार खाते माथाडी मंडळाच्या स्वातंत्र्यावर अडचणी निर्माण करित कामकाजामध्ये ढवळाढवळ करत आहे. माथाडी कायदा कलम 5 (4) चा दुरुपयोग यापूर्वी कधीही झालेला नव्हता. भाजप सरकार अधिकाराचा दुरुउपयोग करुन माथाडी कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहे, असेही सय्यद म्हणाले.

“”कामगार विरोधी भाजप सरकारचा धिक्कार असो”, “”भाजप सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, “”भाजप सरकारचा निषेध असो”, “”कामगार एकजुटीचा विजय असो”, “”अमर रहे अमर रहे, अण्णासाहेब पाटील अमर रहे” अशा घोषणा कामगारांनी दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)