…हा तर आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न!

पेट्रोल-डिझेलचे दर कपात : नागरिक असमाधानी

पिंपरी – गेली अनेक महिने सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने करामध्ये सवलत दिली आहे. त्यामुळे इंधन दरात सरासरी पाच रुपयांची घट झाली आहे. याबाबत, विविध स्तरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून हा पेट्रोल शंभरीला टेकले असताना त्यात पाच रुपयांची कपात म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न असल्याची टीका नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

-Ads-

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. उशिरा का होईना केंद्र व राज्य सरकारने दरांमध्ये सुमारे पाच रुपयांची कपात करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. वाढत्या दरांमुळे सरकारवरील रोष सातत्याने वाढत होता. करात कपात करून दर कमी करण्याचा सरकारचा हा प्रयत्न नागरिकांची नाराजी दूर करू शकली नसल्याचे सध्या दिसून येत आहे. जनतेचा रोष कमी न होता ही दर कपात फसवी असून सरकारने सुरुवातीला भाव वाढ करुन जनतेला लुटले आणि आता थोड्याफार प्रमाणात दर कपात करुन गोंजारण्याचे काम सरकार करत असल्याचे मत नागरिकांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्त केले.

कॉंग्रेस सत्तेत असताना भाजपने पेट्रोल, डिझेलच्या दर वाढीवरुन रान पेटवले होते. मात्र भाजपचे सरकार सत्तेत असताना कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळापेक्षा ही जास्त दर वाढ केली. मोदी सरकार देशातील जनतेच्या भावनेशी खेळत आहे. याची किंमत येणाऱ्या निवडणुकीत त्यांना मोजावी लागणार आहे.
– व्यंकटेश नाईकवाडे

सुरूवातीला भरमसाठ दरवाढ करून जनसामान्यांना लुटले आणि आता निवडणुका तोंडावर आल्याने मोदी सरकार थोडीशी दर कपात करून जनतेची फसवणूक करत आहे. हे सरकार जनतेच्या मनातून उतरले आहे.
– ज्ञानेश्‍वर पाटील

गॅस दरवाढ, पेट्रोल, डिझेल, दरवाढीने जनसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यावर “अच्छे दिन’ येतील, असे आम्हाला वाटले होते. म्हणून स्वतः मोदींचा प्रचार करुन लोकांना मतदान करायला सांगितले. मात्र सरकारने अपेक्षाभंग केला आहे. ही दर कपात फक्‍त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे.
– जया सोनुलकर

सरकारला जनसामान्य नागरिकांशी काही देणेघेणे नसून सरकार फक्‍त राजकारण करण्यात गुंग आहे. दरवाढ करून पुन्हा दर कमी करणे या खेळीला जनता ओळखून आहे. आता जनता येणाऱ्या निवडणुकात मोदींना त्यांची जागा दाखवेल. – राजबीर मदान

पोकळ अश्‍वासने देऊन मोदी सरकार सत्तेत आले. “अच्छे दिन’ स्वप्न दाखवून “बुरे दिन’ आणले या सरकारने शेतकरी, कष्टकरी यांचे महागाईमुळे कंबरडे मोडले असून आता त्यावर सारवा-सारव करत आहे. पेट्रोल मोदींच्या काळातच पहिल्यांदा नव्वदच्या पुढे गेले. हे सरकार जनसामान्यांचे नाही, येणारा काळ मोदी सरकारसाठी “अच्छे दिन’ वाला नसेल. – चेतन राणा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)