हास्यासनाचे काही प्रकार

सुजाता टिकेकर

कोयल हास्यासन

कोकीळेसारखा घशातून आवाज काढत जोरात हसावे. यामुळे स्वरयंत्र चांगल्याप्रकारे कार्यान्वित होते. हे बैठकस्थितीतही करता येते.अल्फाबेटीकल हास्यासन हे दंड स्थितीत करतात. दोन्ही पाय आपटत पायाने पायाला जोर देत हात झटकत स्टेप बाय स्टेप चालत मोठ्याने इंग्लिश किंवा मराठी अक्षरे म्हणत शेवटच्या अक्षराला जोरात हसत दोन्ही हात डोक्‍यावर घ्यावेत. या हास्यामुळे चालण्याचा तर व्यायाम होतोच पण श्‍वसनाचाही व्यायाम होतो कारण आपल्या वर्णाक्षरामध्ये केव्हा तोंडावाटे, केव्हा नाकावाटे श्‍वास घ्यायचा हे ते उच्चार ठरवतात. अ, आ, इ, ई किंवा ए, बी, सी, डी किंवा क, ख, ग, घ, हे हास्य करताना म्हणावेत. हे हास्यासन फक्‍त “ह’ ची बाराखडी म्हणत खालून वर हात घेतही करतात.

क्‍लाऊड हास्यासन

ढगांच्या गडगडाटासारखे न लाजता हसावे. दोन्ही हातांना झटके देत सकाळी हे हास्य केल्यास संबंध दिवस आनंदात जातो. हातापायांना चांगला व्यायाम होतो.

सुमन हास्यासन

याला कोणी कोणी पुष्पांजली तर कोणी कोणी लोटस्‌ हास्यासन म्हणतात. यामध्ये दोन्ही हातांची मनगटे जुळवून कमळाची कळी बनवावी व ती उमलवत उमलवत म्हणजेच बोटे पसरवत खालून वर हात नेताना मधुर हासावे आणि वर आकाशाकडे नेल्यावर ओंजळ रिती केल्याची ऍक्‍शन करावी. हे हास्यासन ही एक प्रकारची नृत्य मुद्रा आहे. ज्यामुळे मनगट, कोपर, दंड यांचे रक्‍ताभिसरण सुधारते. गोलांगुरन मुद्रा होते तसेच ताणतणाव नाहीसा होतो.

मत्स्य हास्यासन

पाण्यात पोहल्यासारखी हाताची ऍक्‍शन करत हास्याचा आवाज करत हात गोलाकार पुढे न्यावेत. त्यामुळे कोपर, मनगट, कोपर आणि मनगट यामधील स्नायू, याचबरोबर छातीला व्यायाम मिळतो. याला स्विमिंग हास्यासनही म्हटले जाते.

एलिफंट हास्यासन

यामध्ये उजवा हात डाव्या हातावर घेऊन सोंडेसारखी ऍक्‍शन करत खाली वाकून हत्तीचा चित्कार करत हसावे. यामुळे कंबरेला तसेच हातापायांना व्यायाम चांगला होऊन तेथील कार्यक्षमता सुधारते. हत्तीसारखे चालत टाचा व तळव्यांना व्यायाम होतो. एकदा डावीकडून एकदा उजवीकडून हातांची सोंड बनवून खाली वाकून चित्कार करावा. एक मिनिट कालावधी ठेवावा.
अशा प्रकारे अनेक हास्यासने आहेत पण त्यातील महत्वाची नमूद केली आहेत रोज यातील काही प्रकार नियमित केले तर आपण नक्‍कीच आरोग्यसंपन्न राहू आणि आपले शरीर आणि मनही सुदृढ राहील.

हास्ययोगाची नवम्‌सूत्री

मी कधीही रडणार नाही.
मी दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसीन.
मी कोणाच्या रंगावर हसणार नाही.
मी कोणाच्या व्यंगावर हसणार नाही.
मी कोणाच्या दु:खावर हसणार नाही.
मी कोणाच्या पराभवावर हसणार नाही.
मी कोणाकडे कुत्सितपणे… “बरं झालं.. त्याचं वाईट झालं.. चांगली अद्दल घडली..’ अशा भावाने कधीही हसणार नाही.
मी सतत निखळपणे हसत राहीन.
मी आयुष्यभर हसत राहीन. मी हसेन आणि जग जिंकीन. जगालाही हसवत राहीन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)