हार्मोन इम्प्लांट

रजोनिवृत्ती दरम्यान चेहरा लाल होणे किंवा अंग गरम होणे याला हॉट फ्लश असे म्हणतात. हे लक्षण सौम्य प्रमाणात असेल आणि सहन होण्यासारखे असेल तर त्यावर उपाय करण्याची गरज नसते. परंतु योनीमार्ग कोरडा पडला असेल तर मात्र डॉक्‍टरांना दाखवणे गरजेचे असते.

यावर उपाय कोणता आहे?
मेनापॉजची लक्षणे खूपच त्रासदायक असतील तर त्यावर एकच उपाय आहे.तो म्हणजे हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी (एचआरटी) हॉट फ्लशचा खूपच त्रास होत असेल, तर इस्ट्रोजेनच्या गोळया घ्याव्या लागतात. इस्ट्रोजेनच्या गोळया सतत आणि दीर्घकाळ घेतल्यास कॅन्सर होण्याचा धोका असतो. म्हणून इस्ट्रोजेनच्या गोळयांचा डोस खूप कमी असतो आणि शिवाय इस्ट्रोजेनसोबत प्रोजेस्टेरॉन नावाचे हार्मोनसुद्धा देतात.हे देताना महिन्यात एकदा देतात.

पहिले 11 किंवा 14 दिवस इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन दोन्ही देतात. ते पुढची बारा दिवस देतात. नंतर सात दिवस काहीही देत नाहीत. तुमची मासिक पाळी बंद झाली असली तरी या गोळया चालू केल्यावर 22 व्या किंवा 28 व्या दिवशी तुम्हाला पाळी आल्यासारखा रक्‍तस्राव सुरू होतो. अंगावरून जास्त जात नाही, आणि त्याचा काही त्रासही होत नाही. पण हा स्राव अनियमीत असेल किंवा ओटीपोट दुखत असेल तर मात्र डॉक्‍टरांना सांगणे आवश्‍यक असते.

हार्मोन इम्प्लांट
काही स्त्रियांची हिस्टेरेक्‍टॉमी म्हणजे गर्भाशय काढून टाकले असेल तर हार्मोन इंप्लॅंट करतात. ओटीपोटाच्या त्वचेला भूल देण्याचे इंजेक्‍शन देतात. एक लहानशी चीर पाडून त्वचेच्या आतमध्ये इस्ट्रोजीनची गोळी ठेवतात. या गोळीतून इस्ट्रोजेन सावकाशपणे रोज रक्‍तामध्ये मिसळते. काही महिन्यानंतर इस्ट्रोजीन संपून जाते. मग पुन्हा मेनापॉजची लक्षणे दिसू लागतात. मग पुन्हा इंप्लांट करावे लागते. गर्भाशय काढून टाकले असेल तर इस्ट्रोजेन इंम्प्लांटसोबत महिन्याच्या बारा दिवस प्रोजेस्टेरॉनच्या गोळया देतात. याचा अर्थ तुम्हाला महिन्याला पाळी येते. शिवाय कॅन्सरचा धोकाही रहात नाही.

इंजेक्‍शन आणि प्लास्टर्स
दर पंधरा दिवसाला इस्ट्रोजीनचे इंजेक्‍शन हा एक सोयीचा आणि उत्तम उपाय आहे. अर्थात हा निर्णय तुमच्या डॉक्‍टरांनी घ्यायचा असतो. आता इस्ट्रोजेनचे प्लास्टर्स वापरण्याची सोय झाली आहे आणि ती लोकप्रियही होत आहे.

प्रोजेस्टेरॉन
काही वैद्यकीय कारणांमुळे इस्ट्रोजेन घेता येत नसेल तर केवळ प्रोजेस्टेरान हार्मोनच्या गोळया देतात.

टेस्टेस्टेरॉन इम्प्लांट
ओव्हरीज टेस्टेस्टेरॉन नावाचे हार्मोनही तयार करतात. ते लैंगिक भावनेसाठी आवश्‍यक असते. ते जर त्वचेमध्ये इंम्प्लांट केले तर मेनॉपॉजमुळे लैंगिक भावना कमी झाली असेल, तर ती वाढते.

एचआरटी सर्वच स्त्रियांना उपयोगी आहे का?
नाही. स्तनाचा, गर्भाशयाचा किंवा ओव्हरीचा कॅन्सर असेल किंवा योनीमार्गातून रक्‍तस्राव होत असेल आणि तो कोणत्या कारणाने होतो आहे, याचे निदान झाले नसेल, तर ते होईपर्यंत एचआरटी करता येत नाही.

उच्च रक्‍तदाब असेल, हार्टऍटॅक येऊन गेला असेल, पक्षाघात झाला असेल, हृदयाला रक्‍तपुरवठा करणाऱ्या रक्‍तवाहिन्यांमध्ये रक्‍ताची गुठळी असेल, पोटऱ्यांमधल्या रक्‍तवाहिन्या मोठ्या झाल्या असतील म्हणजेच व्हेरीकोज व्हेन्स असतील, यकृताचा रोग असेल, मधुमेह असेल किंवा गर्भाशयात गाठी झाल्या असतील तर एचआरटी देता येत नाही. वजन जास्त असेल तर बहुधा एचआरटी देत नाहीत.

अशावेळेस काय करावे?
शक्‍यतो सैलसर कपडे घाला. सुती कपडे घाला. सिंथटीक कपडे घालू नका. रात्री झोपतानासुद्धा सुती कपडे वापरा. गादीवरची चादरसुद्धा सुती असायला हवी. रात्री घामानं कपडे ओले झाले तर ते काढून बदला.

घट्ट कपडे घालू नका. मनावर किंवा शरीरावर ताण येऊ देऊ नका. अतिथंड किंवा अतिउष्ण वातावरणात जाऊ नका. या सगळया कारणांमुळे योनीमार्गाचा जंतुसंसर्ग किंवा इन्फेक्‍शन होण्याचा धोका असतो.

– डॉ. अरुण मांडे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)