अहमदाबाद – गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना शुक्रवारी प्रकृती खालावल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनी उपोषण चालूच ठेवले आहे.

पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागण्यांसाठी हार्दिक यांनी 25 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाला शनिवारी 15 दिवस झाले. प्रकृती खालावल्यानंतरही ते उपोषणावर ठाम आहेत. अन्नसेवन टाळून ते केवळ पाणी घेत आहेत. त्यांच्या उपोषणाला कॉंग्रेससह विविध पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

दरम्यान, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुक नेते ए.राजा यांनी हार्दिक यांची रूग्णालयात भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. याआधी विविध पक्षांच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेतली. हार्दिक यांचे उपोषण आणि त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा यांमुळे गुजरातमधील भाजप सरकारवरील दबाव वाढला आहे. त्यातून कुणाशीही चर्चा करण्याची आमची तयारी असल्याचे शुक्रवारी राज्य सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, चर्चेसाठी अद्याप सरकार हार्दिक यांच्यापर्यंत पोहचले नसल्याचे त्यांच्या समर्थकांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)