हार्टफेल म्हणजे खरोखर काय असते?

शरीराच्या हालचालीवर हृदयाचे काम अवलंबून असते. विश्रांतीच्या काळात शरीराला कमी प्रमाणात रक्‍त लागते. कष्टाचे काम करताना किंवा व्यायाम करताना शरीरातील पेशींना अन्न आणि प्राणवायूचा पुरवठा जास्त लागतो. त्यामुळे हृदयाला नेहमीपेक्षा जास्त वेगाने काम करावे लागते. म्हणून हृदयाचे ठोके वाढतात. विश्रांतीच्या काळात हृदयाचे ठोके कमी पडतात. एखाद्या आजारपणात शरीराला अन्न आणि प्राणवायूची आवश्‍यकता जास्त असल्याने हृदयाला नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागते.

हार्ट फेल्युअरची कारणे
शरीराच्या प्रत्येक अवयवाला जसा रक्‍ताचा पुरवठा आवश्‍यक असतो त्याचप्रमाणे प्रत्यक्ष हृदयालासुद्धा काम करण्यासाठी रक्‍ताचा पुरवठा असावा लागतो. हृदयाला रक्‍तपुरवठा करणाऱ्या रक्‍तवाहिन्यांना कोरोनरी रक्‍तवाहिन्या असे म्हणतात. या कोरोनरी रक्‍तवाहिन्यांचा घेर अरुंद झाला किंवा त्यात अडथळा आला तर हार्ट फेल्युअर होते.
आधी एखादा हार्टअटॅक (त्याला मायोकार्डीयल इन्फाकशन असे म्हणतात) येऊन गेला असेल तर हृदयाचा काही भाग निकामी झालेला असतो. हृदयाच्या आकुंचन प्रसरणाच्या कार्यामध्ये त्याचा अडथळा येतो.
रक्‍तदाब वाढला असेल तर ऱ्हुमाटिक फिवर नावाच्या रोगामध्ये हृदयाचा कप्पा निकामी होतो.
हृदयाच्या स्नायूंना एखादा रोग झाला तर हृदयाच्या स्नायूंना जंतुसंसर्ग झाला असेल किंवा हृदयाच्या कप्प्यांना रोग झाला असेल तर (याला एन्डोकार्डायटीस किंवा मायोकार्डायटीस असे म्हणतात)
वरील कारणांमुळे हृदयाचे स्नायू कमजोर होऊन आकुंचन प्रसरण नीट करता येत नाही. नीट आकुंचन प्रसरण झाले नाही तर हृदयाचे कप्पे रक्‍ताने नीट भरले जात नाहीत. त्यामुळे शरीरालासुध्दा रक्‍तपुरवठा नीट होत नाही किंवा हृदयाच्या कप्प्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त रक्‍त भरले जाते.

हार्ट फेल्युअर होताना नेमके काय होते?
हृदयाचे काम नीट होत नसेल तर म्हणजे हार्ट फेल झाले असेल तर रक्‍ताभिसरणाचा वेग कमी होतो. शरीराकडून हृदयाकडे येणारे रक्‍त नीला वाहिनी म्हणजे व्हेन्समध्ये साचून राहते. त्यामुळे पायावर सूज येते.त्याला एडिमा असे म्हणतात. कधीकधी ही सूज पोटावर आणि यकृतवरही येते. (इतर कारणांमुळेही अशी सूज येते. याचा अर्थ त्यामुळे हार्ट फेल होते असे नाही)

फुप्फुसातून प्राणवायू घेऊन आलेले रक्‍त हृदयाच्या डाव्याबाजूच्या कप्प्यामध्ये येते आणि ते हृदयाच्या आकुंचनामुळे मोठ्या रक्‍तवाहिनीमधून संपूर्ण शरीराला पुरवले जाते. हृदयाची डावी बाजू नीट आकुंचन होत नसेल तर रक्‍त पुन्हा फुप्फुसामध्ये मागे जाते आणि तिथे साचून राहते. त्यामुळे फप्फुसाला सूज येते. त्याला पल्मोनरी एडिमा असे म्हणतात. त्यामुळे दम लागतो. अशक्‍तपणा येतो.

हार्ट फेल झाले की किडनीचे कामही बिघडते. शरीरातले जादा मीठ आणि पाणी मुत्रावाटे बाहेर फेकणे हे किडनीचे काम असते. मीठातले सोडीयम किडनीवाटे बाहेर टाकले गेले नाही तर शरीरात साचून राहते. मीठ पाण्याला ओढून धरते. त्यामुळे आधीच सूजलेल्या शरीराला आणखी सूज येते.

हार्ट फेल झालेल्या पेशंटला खूप थकवा येतो. कारण रक्‍ताभिसरण नीट होत नसल्यामुळे शरीरातील पेशींना प्राणवायूचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही. हार्ट फेल झाले तरी हृदय अशाही परीस्थितीत जुळवून घेऊन काम करते. हृदयाचा आकार मोठा होतो. हृदयाच्या कप्प्यांचा आकार वाढला की त्याचे आकुंचन आणि प्रसरण जास्त होते. त्यामुळे शरीराला रक्‍तपुरवठा जास्त प्रमाणात होतो.

दुसरा बदल असा होतो की, हृदयाचे स्नायू जाड व्हायला लागतात. स्नायुतंतूच्या संख्येत वाढ झाली की तंतूच्या आकुंचन प्रसरणाच्या शक्‍तीमध्ये वाढ होते. म्हणजेच हृदय ताकदीने काम करू लागते आणि शेवटचा बदल असा होतो की, हृदयाच्या स्नायूंना आकुंचन प्रसरण पावण्यासाठी विद्युत प्रेरणा लागते. ती प्रेरणा वाढते.म्हणून हृदय पुरेसे काम करू लागते. वर सांगितलेले बदल म्हणजे हृदयाने पूर्वीसारखे काम करण्याचा केलेला प्रयत्न असतो. सुरुवातीला काम नीट होतेही, पण हळूहळू हृदयाची शक्‍ती कमी पडायला लागते आणि पेशंटची स्थिती गंभीर होते.

हार्ट फेलची लक्षणे कोणती?
सर्वांत महत्त्वाचे लक्षण म्हणजे दम लागणे. कारण फुप्फुसात पाणी साचलेले असते. कोणत्याही शारीरिक हालचाली करताना दम लागतो. विश्रांती घेतानासुध्दा दम लागतो. रात्री झोपेत श्‍वास गुदमरल्यासारखे होते. तो अचानक जागा होतो. श्‍वास नीट घेता यावा म्हणून एकाऐवजी दोनतीन उशा घ्याव्या लागतात. छातीला सूज आल्यामुळे आणि तिथे रक्‍त साचून राहिल्यामुळे खोकल्यावाटे फिकट लाल रंगाचे बेडके पडायला लागतात.

पायावर आणि पोटावर सूज आल्यामुळे वजन वाढते. थकवा खूप येतो. वयस्कर पेशंटच्या मनाचा गोंधळ होतो. त्यांना नीट विचार करता येत नाही. पेशंटच्या पायावर पोटावरची सूज, दम लागणे, थकवा, हृदयाचे ठोके, फुप्फुसात साचलेल्या पाण्याचा आवाज स्टेथोस्केपने ऐकून डॉक्‍टरला हार्ट फेलचे निदान करणे सोपे जाते.

हार्ट फेलच्या पेशंटने व्यायाम करावा की नाही?
तंदुरुस्त राहण्यासाठी पेशंटने व्यायाम करायला हरकत नाही. सतत क्रियाशील असायला हवे. व्यायाम कोणता करायचा हे डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन ठरवा. कधीकधी स्ट्रेस टेस्ट घेतल्यानंतर हृदयाचे काम नीट चालते आहे की नाही हे बघितल्यानंतर व्यायाम कोणता करायचा हे ठरवले जाते.चालण्याचा, पोहोण्याचा, सायकलिंगचा व्यायाम करायला हरकत नाही. ज्या व्यायामामध्ये श्‍वास रोखून धरावा लागतो आणि झटक्‍याने हालचाली कराव्या लागतात असा व्यायाम करू नये. वजन उचलण्याचा व्यायाम करू नये. दम लागेल असा कोणताही व्यायाम करू नये.

जेवणानंतर लगेचच व्यायाम करू नये. खूप उष्मा किंवा खूप थंडी असेल तर व्यायाम करू नये. बरे वाटत नसेल तर व्यायाम करू नये. मानसिक ताण असेल, अस्वस्थ वाटत असेल, इतर कारणांमुळे ताप आला असेल तर व्यायाम करू नये.
हार्ट फेल झालेल्या पेशंटला रात्री वारंवार लघवीला जावे लागत असल्यामुळे त्याची झोप पूर्ण होत नाही. म्हणून दुपारची डुलकी घेऊ नये. रात्री दम लागू नये म्हणून दोनतीन उशा घेऊन झोपावे. शरीरातले पाणी बाहेर काढण्यासाठी म्हणजेच सूज कमी करण्यासाठी डॉक्‍टर डाययुरेटीक औषध देतात. ते अगदी सकाळी उठल्याबरोबर घ्यावे म्हणजे दुपारपर्यत भरपूर प्रमाणात भरपूरवेळा लघवी होते. रात्री उठावे लागत नाही.

हार्ट फेल्युअरवर कोणते उपाय करतात?
हार्ट फेल खात्रीने बरा करता येतो. मात्र, उपचार योग्य हवेत आणि पेशंटने आपल्या जीवनशैलीत बदल केला तर त्याला खात्रीने बरे वाटायला लागते. दम लागायला नको, थकवा दूर व्हायला हवा. शरीरावरची सूज कमी व्हायला हवी. प्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी पुरेसा व्यायाम करणे.

एवढ्या गोष्टी साध्य झाल्या म्हणजे पेशंटला खूप बरे वाटते. सर्वात आधी जेवणामध्ये मीठ बंद करणे. पोटॅशियम आणि मॅग्नेशियमची पातळी कायम राखणे. वाढलेले वजन कमी करणे. हे ध्येय डॉक्‍टरांच्या डोळ्यासमोर असते.
मीठामुळे शरीरातले पाणी साचून राहते म्हणून सूज येते. हृदयाला जास्त काम करावे लागते. म्हणून दम लागतो. मीठाचं प्रमाण शरीरात जास्त झालं तर पोटॅशियम आणि मॅग्नेशियचे प्रमाणात गडबड होते.

खारट पदार्थ कोणताही खाऊ नका
अॅसिडिटी कमी करणाऱ्या अँटासिडच्या गोळ्यांमध्ये किंवा पातळ औषधांमध्ये सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम
कार्बोनेट असते म्हणून अशी औषधे घेऊ नका. भारतीय माणसाच्या रोजच्या जेवणात एक चमचा मीठ असते. स्वयंपाक करतानाच मीठ कमी घालावे. इतरांनी वरून मीठ घ्यावे. पण पेशंटने वरून मीठ घालू नये.

मीठ कमी असूनसुध्दा बरेच पदार्थ चवीला चांगले लागतात.
हार्ट फेलच्या पेशंटने रोज सकाळी वजन करून बघावे. रोज वजन वाढत असेल तर ते शरीरात पाणी साचत असल्याचे म्हणजेच सूज येत असल्याचे लक्षण आहे. डॉक्‍टरांना सांगावे. म्हणजे कोणते डाययुरेटीक (लघवी जास्त होण्यासाठी व सूज कमी होण्यसाठी) द्यायचे हे त्यांना ठरवता येते.

डाययुरेटीकच्या गोळ्यांमुळे सूज तर उतरतेच शिवाय सूज उतरल्याने हृदयावरचा कामाचा ताणही कमी होतो. पण या गोळ्यांमुळे पोटॅशियमचेही प्रमाण शरीरात कमी होते. पोटॅशियम शरीरासाठी आवश्‍यक असते. उलट्या जुलाब किंवा जुलाब होण्यासाठी घेतलेली औषधे आणि स्टीरॉइडस यामुळे पोटॅशियचे प्रमाण कमी होत असते. बहुतेक फळांमध्ये आणि पालेभाज्यांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते. इतके करून पोटॅशियम कमी पडले तर पोटॅशियमच्या गोळ्या द्याव्या लागतात. जास्त प्रमाणात पोटॅशियम घेणे प्राणघातक असू शकते हे लक्षात ठेवा. डॉक्‍टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागा.

हृदयाच्या स्नायूंना बळ देण्यासाठी डिजिटॅलीस (डिगॉक्‍सान) नावाचे औषध द्यावे लागते. औषधाची पातळी शरीरात किती आहे हे वेळोवेळी रक्‍ताची तपासणी करून बघावे लागते. कारण हे औषध जास्त प्रमाणात झाले तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आता आधुनिक उपचारांमध्ये व्हासोडायलेटर्स (नायट्रोग्लसरीन आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट) हे औषध देतात. यामुळे रक्‍तवाहिन्यांचा घेर रुंद होतो. दुसरे एक औषध आहे. हायड्रालाझाइन. ते फक्‍त शुध्द रक्‍तवाहिनीवरच काम करते. कॅटॉप्रिल, एनाल्प्रील, लिसिनोप्रिल ही औषधे नीला (व्हेन्स) आणि रोहिणी (आर्टी किंवा शुद्धरक्‍तवाहिनी) या दोन्ही रक्‍तवाहिन्यांचा घेर रुंद करतात. यातली काही औषधे हृदयाच्या स्नायूंचा आकार वाढू न देण्याचे काम करतात.

व्हॉल्व म्हणजे हृदयाचा कप्पा निकामी झाला असेल तर तो ऑपरेशन करून बदलावा लागतो आणि कोरोनरी वाहिन्या ब्लॉक झाल्या असतील तर बायपास सर्जरी करावी लागते ज्यांचे हृदय अगदीच निकामी झाले असेल तर हृदयारोपण करावे लागते.

खालील गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात…
जेवणामध्ये मीठ घेऊ नका
एखाद्या पदार्थात मीठ कमी पडले असेल तर वरून मीठ घालू नका.
ताज्या पालेभाज्या खा. प्रक्रिया केलेल्या तयार पदार्थामध्ये सोडीयमचे प्रमाण जास्त असते. असे पदार्थ खाऊ नका.
तयार पदार्थ विकत घेताना त्यात मीठ किती आहे हे लेबल वाचून खात्री करून घ्या.
काही तयार पदार्थांमध्ये मीठ कमी असते, पण पोटॅशियम किंवा मॅग्नेशियमचे प्रमाण योग्य नसते.

– डॉ. जयदीप महाजन  


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
6 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)