हाय हिल्स देतात कॉन्फिडन्स

टॉक टिक टॉक असा आवाज करत मोठ्या स्टिलेटोज किंवा हाय हिल्सवर आपल्या रस्त्यावरून चालणं शक्‍य आहे का? रस्त्यावर गर्दीच गर्दी, त्यातून रस्त्यात खड्डे, खड्ड्यातून मार्ग असा नेहमीचा प्रवास. या प्रवासातून कोण बरं टोकदार स्टिलेटोज घालून जाईल. त्यातून चुकून एखाद्यावर पाय पडला तर त्याचा पाय गेलाच कामातून, बरं आपण अडखळलो तर पाय मुरगळण्याची शक्‍यता. त्यापेक्षा नको तो खटाटोप असं बऱ्याच जणींना वाटतं, पण एखाद्या पार्टीला किंवा इव्हेंटला जाताना हिल्स तर घालाव्या लागतात नाहीतर तो फॅशनेबल लूक येत नाही, पण त्या घालायच्या झाल्याच तर वरचं सगळं आठवतं.

हाय हिल्स वापरणाऱ्यांसाठी दिलासा देणारी वस्तू म्हणजे ‘जेल कुशन.’ किंवा शू पॅडिंग’.
हाय हिल्स घातल्यानं शरीराचा भार कधीकधी टाचांवर आणि पुढच्या भागावर अधिक येतो. जास्त वेळ जोर दिल्यानं पायांच्या तळव्यांची जळजळ होणं, ते दुखणं, सूज पकडणं हे त्रास सुरू होतात. या हिल्सच्या तळव्याचा भागही कडक असतो त्यातून त्रास अधिक होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सगळ्या त्रासापासून मदत करतात ते जेल कुशन. पायाचे विशिष्ट प्रेशर पॉईंट असतात. त्या प्रेशर पॉईंटच्या ठिकाणी हे जेल कुशन बसवायचे असतात. टाच, तळवा, पायांची बोटं अशा तीन महत्त्वाच्या प्रेशर पॉईंटवरच्या ठिकाणी लावायला वेगवेगळ्या आकारात या कुशन येतात. या कशा वापरायच्या याचं मार्गदर्शन त्यात केलेलं असतं. या कुशन पायांचं संरक्षण करतात. या वापरल्यामुळे कोणत्याही एका पॉईंटवर जास्त दाब येत नाही. त्याचप्रमाणे या नरम आणि मऊ असल्यानं तळव्यांची जळजळ, सूजही येत नाही. एक कुशन तुम्ही अनेक वेळा वापरू शकता.

दुसरं म्हणजे तुमची खर्च करण्याची अधिक तयारी असेल तर तुम्ही कननवर्टेबल हिल्सचाही विचार करू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या उंच टाचा अगदी सहज कमी-जास्त करू शकता. अशा प्रकारच्या सॅंडल्सना तुम्ही कॅट हिल किंवा पॉईंटेड हिल्स अगदी सहज आणि तेही काही मिनिटांत लावू शकता. जुन्या हिल्स बाजूला काढून ठेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही त्याचा फ्लॅट सॅंडल्स म्हणून देखील वापर करू शकता. थोडक्‍यात तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्यांना हिल्स लावू शकता.

हल्ली बऱ्याच मुलींच्या तक्रारी असतात. काही जणींना प्रत्येक ड्रेस, कार्यक्रम किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चपला लागतात. पण प्रत्येक वेळी खर्च बजेटच्या बाहेरचा असतो. ड्रेसवर काही वेगळं, पार्टीसाठी हाय हिल्स, फिरायला जाताना आणखी वेगळा प्रकार, पण अशा वेगवेगळ्या कारणांसाठी चपलांची खरेदी करणार तरी किती. घरातला शू रॅक अशा 10 प्रकारच्या चपलांनी भरलेला असतो. एकाच प्रकारच्या चपला घेतल्या तर त्याच काय सगळीकडे घालणार, कोणीतरी हसेल अशी आपली मानसिकता असते. काहीअर्थी ते बरोबर देखील आहे म्हणा. तुम्ही स्पोर्ट शूज घालून लग्न किंवा पार्टीला तर नाही जाऊ शकत ना. भले तुम्ही त्याच्यावर हजार रुपये खर्च केले असतील. मग अशांसाठी डिटॅचेबलचा पर्याय अगदी उत्तम आहे.

डिटॅचेबल शूजचा म्हणजे तुम्ही या सॅंडल्सचा वरचा किंवा विशिष्ट भाग हव्या असलेल्या रंगात बदलू शकता. समजा तुमच्याकडे हाय हिल्स आहेत तर डिटॅचेबल शूजमध्ये सोबत अटॅचमेंट असते म्हणजे तुम्ही हाय हिल्सचे अगदी काऊ बॉय शूज देखील बनवून वापरू शकता. काहींमध्ये सॅंडल्सचे रंगीबेरंगी बेल्टही उपलब्ध असतात. तुम्ही कपड्याच्या रंगात ते बेल्ट्‌स बदलू शकता. काहींसोबत वेगवेगळ्या आकारातले आणि रंगातले पॅटर्न असतात, पण यासाठी तुम्हाला जास्तीची किंमत मोजावी लागेल हे मात्र नक्की, पण तसंही वर्षभर वेगवेगळ्या चपलांच्या प्रकारांना खर्च करण्यापेक्षा एकदाच खर्च केलेला बरा.

मुली काय, मुलं काय या फुटवेअर स्वस्तात मिळतात आणि दिसायला आकर्षक असतात म्हणून ते विकत घेतात, पण जर चपला चुकीच्या निवडल्या तर त्याच्यापासून पाठीचे किंवा पायाचे अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक फुटवेअर निवडणं गरजेचं असतं. असं म्हणतात की, माणसांनी चपला अतिशय चांगल्या घालाव्या, कारण कोणाचंही पहिलं लक्ष तुमच्या पायातल्या वहाणांकडे जातं.

केवळ आपण प्रेझेंटेबल दिसावं म्हणून चांगल्या फुटवेअर आवश्‍यक नसतात, तर त्यांची योग्य निवड देखील तितकीच गरजेची असते. बाजारात काहीशेपासून हजारोंच्या घरात या फुटवेअरच्या किमती आहेत. अनेक जण या चपलांच्या डिझाईन बघून त्या विकत घेतात, पण चपलांच्या डिझाईन आणि किमती बघून विकत घेण्यापेक्षा त्या आरामदायी आहेत का हे बघून मगच विकत घ्याव्यात. फुटवेअर निवडताना पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मापाच्या फुटवेअर निवडणं होय. काही जण वाढत्या पायाचा विचार करून एक साईज मोठी फुटवेअर निवडतात किंवा काही जण कमी साईजची फुटवेअर निवडतात. पण या दोन्ही गोष्टी करणं चुकीचं आहे, कारण यामुळे पायाला अधिक त्रास होऊ शकतो. फुटवेअरच्या दुकानात गेल्यावर प्रत्येक वेळी पायाचं माप मोजून घ्या आणि मगच त्या घ्या. मला आतापर्यंत याच मापाचे फुटवेअर लागतात त्यामुळे याच मापाचे फुटवेअर द्या असं करू नका. कारण काही जण वर्षभराच्या काळानंतर फुटवेअर विकत घेतात. या काळात तुमच्या पायाच्या मापात थोडा बदल झालेला असतो.

मुलींमध्ये हाय हिल्स असलेल्या फुटवेअर वापरण्याची फॅशन आहे. पण हिल्स घेताना त्या दोन इंचापेक्षा जास्त मोठ्या नसाव्यात. हिल्स जितक्‍या उंच असतील तितकंच पायाच्या बोटांवर येणारा ताण अधिक असतो. फुटवेअर खरेदी करताना तळव्याच्या ठिकाणी जरा दाब देऊन पाहा, पायाच्या आकाराच्या दृष्टीनं त्यात फुटपॅड बसवलेले असतात. तुमच्या तळव्याच्या आकाराप्रमाणे याची रचना केलेली असते, जे चालताना तळव्याची काळजी घेण्याचं काम करतात. शक्‍यतो कमी दर्जाचा रबर किंवा प्लॅस्टिकपासून बनवलेल्या चपला वापरणं टाळा.

फुटवेअरची खरेदी शक्‍यतो दिवसाअखेर तुमची सगळी कामं संपवून करावी. याचं कारण जुन्या फुटवेअरमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी दिवसभर फिरत असतो, त्यामुळे पायाच्या तळव्याला किंचितशी सूज पकडते, यामुळे पायाचं माप थोडंसं वाढलेलं असतं. फुटवेअर खरेदी करताना नेहमी चांगल्या दुकानातून त्या खरेदी करा. काही फुटवेअर ब्रॅंड आरामदायी अशा फुटवेअर बनवतात. इतकंच नाही तर तुमच्या पाठीला किंवा पायाला त्याचा त्रास होणार नाही याची खबरदारी या फुटवेअर निर्मितीमध्ये घेतलेली असते. त्यामुळे फुटवेअर खरेदी करायला जाण्याआधी असे ब्रॅंड कोणते याची माहिती आधीच काढून घ्या. ब्रॅंडेड फुटवेअर महाग असतील, पण आरोग्याच्या दृष्टीनं विचार केला तर यासाठी जास्त पैसे मोजण्यास काहीच हरकत नाही. पण कसाही विचार करा. हाय हिल्स तुम्हाला कॉन्फिडन्स देतात, हे नक्की!

– श्रुती कुलकर्णी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)