हायब्रीड एअरो बोटी आणि रोप वे, केबल कारच्या वापराबाबत सरकारचे प्रयत्न 

File photo....

नवी दिल्ली: प्रदूषणमुक्त आणि कमी खर्चिक वाहतूक नवसंकल्पनांचा प्रचार करण्यासाठी तसेच आयातीला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला. देशात सुरक्षित आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमात त्यांनी भारताच्या पहिल्या ईज ऑफ मोबिलिटी इंडेक्‍सचे प्रकाशन केले. जमीन, पाणी आणि हवाई तंत्रज्ञानाचे एकत्रिकरण असलेल्या आणि ताशी 80 कि.मी. पेक्षा अधिक वेग असणाऱ्या हायब्रीड एअरो बोटसारख्या नव्या वाहनांचा वापर करण्याबाबत सरकार पडताळणी करत आहे. पुढच्या वर्षी कुंभमेळ्यात तसेच दिल्लीहून ताजमहालला भेट देण्यासाठी यमुना नदीत अशा बोटींचा वापर करण्यासंदर्भात सरकार विचार करत असल्याचे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डोंगराळ भाग आणि दाटीवाटीची गर्दी असलेल्या शहरांमध्ये रोप वे, पॉडस्‌ यासारख्या हवाई वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याची शक्‍यताही सरकार पडताळून पाहत असल्याचे ते म्हणाले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार करण्यावर भर देत गडकरी यांनी सांगितले की, सायकलचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी सरकार लवकरच एक मोहीम सुरू करणार आहे. नवीन द्रुतगती महामार्ग बांधताना सायकल मार्गाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असेही ते म्हणाले.

वाहतूक क्षेत्रात पर्यायी इंधनाचा वापर करण्यावरही गडकरी यांनी यावेळी भर दिला. मेंथॉल, इथेनॉल आणि इलेक्‍ट्रीक पर्याय वापरून देश पेट्रोलियम आयातीवरील प्रचंड रक्कम वाचवू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)