हायटेक प्रचाराचा ट्रेंड

निवडणुका जवळ आल्या की पूर्वी ट्रक-टेम्पो आणि वाहनांचा ताफा, हातात झेंडे घेऊन शेकडोंचा रस्त्यावर उतरलेला समुदाय आणि एकाचढ एक घोषणा यांनी सारा परिसर दणाणून जायचा; परंतु आता हा ट्रेंड बदलतोय, आचारसंहितेच्या लक्ष्मणरेषेने या प्रचारपद्धतीला प्रचंड मर्यादा आणल्या आहेत.
वेगाने बदलत्या काळानुसार प्रचार यंत्रणेत अभिनव बदल घडून येत आहे, हायटेक प्रचार यंत्रणेने स्वतःला सिद्ध केले आहे आणि म्हणूनच सोशल मीडियाने एव्हाना अवघ्या प्रचारयंत्रणेचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. समाज तांत्रिकदृष्ट्या स्मार्ट होत असताना राजकीय व्यूहरचनाही तितकीच आधुनिक आणि स्मार्ट होताना दिसत आहे. कारण सोशल मीडियामध्ये सत्तापालटाची असणारी प्रचंड ताकद मागील काळात पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतच सिद्ध झाली आहे.
तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारतात सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण मोठे असल्याने सर्व राजकीय पक्ष व उमेदवार सोशल मीडियाद्वारे प्रचार करण्यावर भर देत आहेत.
मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्षांनी व इच्छुकांनी वॉट्‌स ऍप, फेसबुक, यू-ट्यूबचा आधार घेतला असून, त्या ऑपरेट करण्यासाठी स्वतंत्र मानवी यंत्रणाही सज्ज केली आहे.
निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राजकीय पक्षांकडून सोशल मीडियाच्या प्रचारासाठी ई-कार्यकर्ता मेळावा तसेच सोशल मीडिया प्रशिक्षण कार्यशाळाही आगामी काळात फलदायी ठरणार आहेत. या कार्यशाळांचे माध्यमातून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना पक्षावर, पक्षाच्या नेत्यांवर व मंत्र्यांवर आरोप वा टीका झाल्यानंतर लोकांसमोर वस्तुस्थिती मांडण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. सोशल मीडियावर चालणारे हे सोशल वॉर युवकांना व मतदारांना पक्षाकडे किंवा इच्छुक उमेदवाराकडे आकर्षित करणारे ठरणार, यात शंका नाही.
पक्षाचे स्वतंत्र टायटल सॉंग’, पक्षातील ज्येष्ठ व प्रभावशाली नेत्यांच्या भाषणांच्या चित्रफिती, पक्षाने काढलेले मोर्चे, केलेली आंदोलने यांच्या क्‍लिप सोशल मीडियावर धुमाकूळ घालू शकतात. मोबाइल ऍप, वॉट्‌स ऍप, फेसबुक, यू-ट्यूब, ट्‌विटर या माध्यमातून प्रचाराबरोबच पक्षाची भूमिका सडेतोड मांडल्यास याचा प्रचंड फायदा उमेदवारांना होणार आहे. अपलोड केलेल्या बातम्या, क्षणचित्रे, विरोधकांचे वस्त्रहरण इत्यादी लाईक आणि शेअर करून हे सोशल वॉर अधिकच रंजक आणि मतदारांना खेचणारे ठरणार आहे. याचबरोबर एसएमएस, व्हॉईस कॉल आणि व्हॉईसमेलच्या सातत्याने होणाऱ्या माऱ्यामुळे उमेदवाराचे नाव मतदारांच्या कानात अगदी फिट्ट बसणार आहे.
परंपरागत प्रचाराच्या एक पाऊल पुढे जाऊन हायटेक प्रचाराची जोरदार मोर्चेबांधणी केल्यास आगामी निवडणुकांत सोशल मीडिया खऱ्या अर्थाने प्रचाराचा आखाडा बनणार आहे.
निवडणुकांमध्ये फ्लेक्‍स, बॅनर, पत्रके, पोस्टर आदी प्रचार साहित्य छापण्यासाठी होणारी चढाओढ आणि प्रचारपत्रके मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी उभी केली जाणारी कार्यकर्त्यांची फळी तितकीशी प्रभावी ठरणार नाही. आता बदलत्या काळानुसार कमी वेळेत अधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाइन प्रचार लाभदायक ठरणार असल्याने सोशल मीडियाच्या हायटेक प्रचार प्रणालीला पर्याय नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)