हाफकिनला औषध व लस निर्मितीसाठी 100 कोटी

संशोधन व चाचणीसाठी अत्याधुनिक इमारत उभारणार
मुंबई – भारतातील अग्रगण्य संशोधन संस्था हाफकीनच्या औषध निर्माण महामंडळासाठी विविध जीवन रक्षक लस व औषध निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडून 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच हाफकीन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्थेसाठी अत्याधुनिक अशी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हाफकीन इन्स्टिट्यूटच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक झाली. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट, हाफकिन इन्स्टिट्यूट सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, सदस्य डॉ. आनंद बंग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव संजय देशमुख, हाफकीन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक संपदा मेहता, महाव्यवस्थापक सुभाष शंकरवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हाफकिनमध्ये जागतिक दर्जाची औषध निर्मिती व संशोधन कार्य व्हावे यासाठी लागणारे आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर देण्यात यावा तसेच या संस्थेला विशेष दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडून सहकार्य मिळावे यासाठी चर्चा करण्यात यावी. या संस्थेत अवश्‍यक असणारे अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता, खासगी तज्ज्ञ सल्लागारांच्या कंत्राटी पद्धतीने सेवा घेण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी हाफकीन संस्थेच्यावतीने राज्य शासनाचा सन 2015- 16 या वर्षाचा 1 कोटी 4 लाख 47 हजाराचा लाभांशाचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपुर्द करण्यात आला.

संशोधनासाठी सुविधांची आवश्‍यकता – माशेलकर
भारत देशाला पोलियो मुक्त करण्यामध्ये हाफकिन संस्थेने मोलाची भूमिका बजावली आहे. इथे तयार केलेली पोलिओची लस 45 देशांना पुरविण्यात आली होती. हाफकीन संस्थेने आतापर्यंत 68 औषधे संशोधन करुन बनविली आहे. हाफकिन संस्थेत सर्पदंशावरील लस व त्यावरील संशोधन तसेच साथीच्या रोगावरील लसीचे संशोधन करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा व इतर सुविधांची आवश्‍यकता असल्याचे डॉ. माशेलकर यांनी यावेळी सांगितले.

संस्थेच्या कामात गती यावी व योग्य प्रकारे संशोधनास चालना मिळावी म्हणून डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशींचे आज सादरीकरण करण्यात आले. कमीत कमी किंमतीत दर्जेदार औषध उपलब्ध करुन देण्याचे या संस्थेचे लक्ष आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)