हातांच्या समस्या आणि उपचार…

हातांची निगा ठेवणं हे सौंदर्याच्या आणि आरोग्याच्या दृष्टिनेही गरजेचं आहे. दिवसभरातला थोडासा तरी वेळ हातांच्या स्वच्छतेसाठी दिला तर आपल्या हातांचे सौंदर्य वाढू शकते. असे ठेवा आपले हात स्वच्छ…

टेंगळं : हाताची त्वचा काही ठिकाणी खूपच कठीण, कडक व्हायला लागते. जंतुसंसर्गामुळेच ही समस्या उद्‌भवते, आणि काही उपचार न घेताही काही काळानंतर आपोआप बरी होते. काही टेंगळं खूपच मोठी व कठीण असतात. अशा वेळी ऑपरेशन करून ती टेंगळं काढून टाकतात.

खरबरीत हात : सतत कामात असणारे व निगा न ठेवले गेलेले हात खरबरीत होतात. त्यांना नियमित क्रीम किंवा तेलाचं मालीश केल्यास त्वचा मऊ होते. मोहरी व तिळाचं तेल एकत्र करून चोळल्यासही फायदा होतो. साय व गाडं तेल चमचा एकत्र करून फेसून लावल्यास हातांची त्वचा मऊ होते. साय, लिंबू, लोणी, तूप यापैंकी काहीही हातांवर चोळून लावल्यास त्वचेचं पोषण होऊन त्वचेला चमक येते. हातांचा खरखरीतपणा कमी होतो.

घट्टे : कष्टाची कामं करणाऱ्या लोकांच्या हातांना घट्टे पडतात. सुरुवातीला हाताला फोड येतात अन्‌ मग तिथली त्वचा घट्ट होते. घट्टे बरे व्हायला बराच काळ जावा लागतो. अन्‌ हातांना विश्रांती मिळाली तर ते थोड्या फार प्रमाणात दबतात. क्रीम वगैरे लावून मालीश केल्यास घट्टे कमी होतात.

विशेष काळजी..
गुडघे आणि कोपरं या दोन अवयवांकडे आपण खूपच दुर्लक्ष करतो. कित्येकदा सुंदर, गोऱ्यापान मुलींच्या हातांची कोपरंही अत्यंत कळकट व निस्तेज असतात. कोपरांची त्वचा पातळ असते. त्यामुळे ती लवकर सुरकुतते आणि खरबरीत होते.

सहसा टेबलसमोर बसताना कोपरं टेबलवर ठेवायची सवय आपल्याला असते. त्यामुळे कोपरांच्या त्वचेला इजा होते. तिथे धूळ व घाण साठते. त्यामुळेच कोपरांकडे विशेष लक्ष द्यायला हवं. साबण व मऊ स्क्रबरने कोपरं रोज घासायला हवीत. स्नानापूर्वी तेल चोळून मग साबणाने घासल्यास कोपरं स्वच्छ होतात. त्यानंतर लगेचच मऊ कापडाने टिपून कोपरांना क्रीम चोळा. फारच कळकट झालेली कोपरं स्वच्छ करण्यासाठी एक लिंबू मधोमध कापून ती दोन्ही तुकडे कोपरांवर घासा. लिंबसालांच्या खोबणीत कोपरं थोडा वेळ ठेवा. मग धुऊन त्यावर क्रीम लावा. लिंबामुळे त्वचा मऊ होते व उजळतेही.

हातांना मालीश
हातांना क्रीमने चोळणं असा मालीशचा सर्वसाधारण अर्थ. हातांना भरपूर क्रीम चोळून ते त्वचेत नीट जिरवायला हवं. त्यामुळे हातातील रक्‍तप्रवाह सुरळीत राहतो. क्रीममुळे त्वचा मुलायम होते. क्रीमने मालीश करण्याचा वेळ हळूहळू वाढवत न्यावा.

सुकोमल हातांसाठी…
हात धुण्यापूर्वी ब्रेसलेट, घड्याळ, अंगठी वगैरे वस्तू काढून ठेवा. हातांवर काही डाग वगैरे दिसल्यास लिंबाची फोड त्यावर घासा. लिंबात स्वच्छ करण्याचा नैसर्गिक गुण आहे. लिंबाचा रस त्वचेत खोलपर्यंत साचलेला मळही बाहेर काढतो. त्यानंतर चांगल्या साबणाने नखापासून कोपरांपर्यंत हात स्वच्छ धुवा.

धुतलेले हात मऊ स्वच्छ कपडयाने टिपून कोरडे करा. बरेचदा, दोन बोटांच्या मधल्या भागात ओलेपणामुळे जंतुसंसगाची भीती असते. पुसून कोरडे केल्यामुळे तो धोका राहत नाही. टिपून कोरड्या झालेल्या हातांवर कोल्ड क्रीम, बॉडी लोशन किंवा मॉश्‍चरायझर लावा. उन्हातील अती नील किरणांचा त्रास होऊ नये म्हणून बाहेर जाताना हातावर सनस्क्रीन लोशन लावा.

हातांची स्वच्छता …
बराच वेळ पाण्यात काम केल्यामुळे हाताच्या त्वचेवर परिणाम होतो. फार गरम किंवा फार गार पाण्यात जास्त वेळ हात राहिले तर त्यांचं नैसर्गिक तेल पाण्याबरोबर निघून जातं. त्यामुळे त्वचा रूक्ष होते. अशी कामं करताना शक्‍य असल्यास रबरी हातमोजे वापरा. त्यामुळे त्वचेला संरक्षण मिळतं. अर्थात्‌च रबरी मोज्यांमुळे हातांना घाम येतो त्यामुळे असे हातमोजे थोड्या वेळासाठीच घाला. शक्‍यतो वरून रबर व आतून सुती कापडाचं अस्तर कापडाचं अस्तर असलेले हातमोजे वापरा. हातांच्या त्वचेला संरक्षण म्हणून सिलिकॉनचा बेस असलेल्या क्रीमचा वापर करा. सॉफ्ट ऍण्ड सिल्की हॅण्डक्रीम किंवा हॅण्ड ऍण्ड बॉडी लोशन वापरा. आपल्या त्वचेलाही प्राणवायू हवा असतो. त्वचाही श्‍वास घेते म्हणूनच गरज नसताना रबरी हातमोजे उगीचच वापरू नयेत.

हातांसाठी सौंदर्योपचार घेत असताना कोणतंही काम करू नका. बागकाम करताना रबरी हातमोजे वापरा. त्यामुळे हातांना संरक्षण मिळेल. नखंही स्वच्छ राहतील. खरचटणं, रक्‍त येणं वगैरे गोष्टी टळतील.

सकाळी स्नानानंतर व रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे हातांना हात धुऊन हॅन्डक्रीम लावावें. हॅण्डक्रीममुळे हाम मुलायम व कोमल होतील. त्वचेतील आर्द्रताही टिकून राहील. हॅण्डक्रीम किंवा बॉडीलोशनची बाटली स्नानगृहातच ठेवा.

एक बाटली स्वयंपाकघरात सिंकजवळ असायला हवी. स्नान झाल्यावर व स्वयंपाकघरातील कामं आटोपल्यावर तिथल्या तिथे क्रीम लगेच लावता येईल. सिल्क प्रोटीनयुक्‍त सॉफ्ट ऍण्ड सिल्की बॉडीलोशनही चांगलं असतं, यांच्या वापराने हाताची त्वचा मऊ व कोमल राहील.
हात खूपच रूक्ष व कोरडे झाले असतील तर ज्यात अधिक प्रमाणात मृदूपणा देणारे घटक आहेत असं एखादं क्रीम प्रौढवयीन महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हातांवरील सुरकुत्या वगैरे त्यामुळे दूर होऊन हातांना तारुण्य लाभेल. हात मऊ व सुरकुत्याविरहित दिसतील.

या क्रीममध्ये एसपीएफ 15 प्रोटेक्‍शनयुक्‍त घटक आहेत. त्यामुळे उन्हापासूनही हातांना संरक्षण मिळेल. रात्री झोपताना क्रीम लावल्यामुळे रात्रभर ते शरीरात मुरतं. त्वचेचं पोषण होतं व त्वचा तुकतुकीत दिसते. आपल्या हातांची जितकी काळजी घ्याल, तितके आरोग्य उत्तम राहील.

डॉ. जयदीप महाजन 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)