हाऊसवाईफची ‘व्हीआरएस…’

स्त्रिया नोकरीतून निवृत्त होऊ शकतात पण घरातून त्यांना अर्हात गृहिणींना “रिटायर’ करणं फार अवघड असतं. संसारातून मन काढून घेणं त्यांना सहजासहजी जमत नाही. आपण कष्टाने उभारलेला संसार नव्या पिढीच्या हातात देणं त्यांना सहजासहजी जमत नाही. त्यातून घरात कुरबुरी वाढतात त्या वेगळ्याच. महिलांनीही आपल्या वयाचा विचार करून योग्य वेळी संसारातून निवृत्त होण्याचं कसब अंगी बाणवायला हवं. त्यातच घराचं सौख्य दडलेलं आहे. ही निवृत्ती सहजसाध्य व्हावी म्हणून त्यांना घरापेक्षा अन्य गोष्टीत मन गुंतवून घेण्याची सवय लावून घ्यायला हवी. तशी तयारी त्यांनी चाळिशीतच करायला हवी. ही निवृत्ती सुखद होण्यासाठी काय करता येईल?

पुरुष जसे आपल्या नोकरीधंद्यातून निवृत्त होतात तसं ठरवून बायकांनी संसारातून बाहेर पडायचं ठरवलं तर काय हरकत आहे? नाहीतरी आपल्या संस्कृतीत स्त्री-पुरुष दोघांनाही वानप्रस्थाश्रमाची संकल्पना लागू आहेच. मग ती गृहिणींनीही प्रत्यक्षात आणायला हवी. खासकरून सगळं आयुष्य घरासाठी देणाऱ्या बायकांनी! सतत घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून आपलं असं काही वेगळं आयुष्य आहे हेच विसरणाऱ्या या बायकांना त्यानिमित्ताने आपल्या मर्जीने वागण्याची संधी मिळते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्य म्हणजे संसारात गुंतून पडलेलं त्यांचं मन जरा बाहेरचा विचार करायला लागतं. पुढच्या पिढीच्या हाती कारभार सोपवताना या गोष्टीचा मोठा आधार होऊ शकतो. मात्र, त्याची तयारी आधीपासून हवी हेही तितकंच खरं. तरच ही “ऐच्छिक निवृत्ती’ सुखाची होऊ शकते. अशा स्त्रियांनी केवळ घर आणि घराशी संबंधित गोष्टी म्हणजेच सर्वस्व मानणं सोडून द्यायला हवं. त्याबाहेरही काही जग आहे, याचा विचार करायला हवा. घरात आपण जितकं गुंतवून घेऊ तितकी तिथली मागणी वाढतच जाणार आहे. त्यातून ठराविक वयानंतर बाहेर पडणं ही गरज आहे.

इतकी वर्षे घरासाठी अनेक इच्छा-आकांक्षांना बाजूला ठेवलेलं असतं. एकदम त्यातून बाहेर पडणं सोपं नाही, पण व्यवस्थित आखणी करून काही गोष्टी करायच्या ठरवल्या तर त्या नक्कीच होऊ शकतात. टप्प्याटप्प्याने या गोष्टी करायला हव्यात. घरातल्या माणसांना हळूहळू स्वावलंबी बनवणं हा त्यातला मुख्य भाग असतो. इतके दिवस घरातल्या बाईला काही कामांसाठी गृहीत धरल्याने बाकीच्यांची मर्जी आणि वेळा सांभाळणं हेही गृहीतच धरलेलं असतं. त्यातून अंग काढून घेऊन थोडी अलिप्तता दाखवणं फार गरजेचं असतं. हे सगळं जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे एकदम होणार नाही, हे अगदी खरं असलं तरी कुठून तरी सुरुवात करायलाच हवी. ही आखणी तुम्हाला ज्या वयात घरातून निवृत्ती घ्यायची आहे त्याच्या आधी दोन-तीन वर्ष तरी करायला हवी.

घरातून लक्ष काढणं म्हणजे ते मनानेही काढणं होय. नाही तर माझ्या अनुपस्थितीत काय घोळ करून ठेवला असेल, याचीच चिंता करत बसलं तर त्याला निवृत्ती म्हणता येणार नाही. ऑफिसमधून बाहेर पडल्यावर आपल्या कामाची जबाबदारी कोणी तरी घेणार हे जितक्‍या सहजतेने आपण स्वीकारतो तशीच तयारी घरचं काम हॅंड ओव्हर करताना असली पाहिजे. आता या सगळ्यातून तुम्हाला जो वेळ मिळणार आहे त्याचा विनियोग तुमच्या स्वत:साठी कसा करता येईल, याची आखणी करता येईल. त्यातून आपल्या छंदांसाठी, राहून गेलेल्या एखाद्या कामासाठी किंवा काहीतरी गोष्ट शिकण्यासाठी करून घेता आला तर उत्तमच.

समवयस्कांमध्ये मिसळण्याची चांगली संधी यामुळे मिळेल. मनन-चिंतन करायला वेळ मिळेल. कधी एखादी कविता करावीशी वाटली, कधी एखादी खरेदी करत भटकावंसं वाटलं, पाहायची राहून गेलेली ठिकाणं पाहावीशी वाटली तर त्यासाठी वेळेची कमतरता भासणार नाही. या सगळ्या राहून गेलेल्या गोष्टी करायच्या आहेतच, पण निवृत्तीनंतर केवळ एवढ्याच गोष्टी सतत करत राहता येणार नाहीत. त्यामुळे दैनंदिन कामाचाही काही क्रम लावायला हवा. त्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी योगासनं, फिरणं असे व्यायाम हवेत.

पथ्याचं काही करून तब्येत सांभाळायची कला आत्मसात करायला हवी. गुंतवणूक, बॅंकांचे व्यवहार यातही लक्ष घालायला पाहिजे. “दिसामाजी काहीतरी लिहीत राहावं’ ही समर्थ रामदास स्वामींची उक्ती आचरणात आणून काहीतरी चांगलं लिहिण्या-वाचण्याची सवय लावून घ्यायला हरकत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे वेळ कसा घालवायचा, याचा प्रश्न पडणार नाही आणि मग भरपूर वेळ असल्यामुळे येणाऱ्या समस्याही येणार नाहीत. तेव्हा गृहिणींच्या निवृत्तीचीही तयारी करायला पाहिजे. तो दिनक्रम कसा असेल ते प्रत्येकाने आपली निवड पाहून ठरवायचं आहे. त्यामुळे एका आनंदी म्हातारपणाची बेगमी होईल, एवढं मात्र नक्की!

– श्रुती कुलकर्णी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)