हवा सुधारणावादी शिक्षेचा विचार (भाग-२)

संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये फाशीच्या शिक्षेला जगभरातून हद्दपार करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात भारताने मतदान केले आहे. वास्तविक पाहता फाशीची शिक्षा असल्याने कायद्याची भीती आणि वचक राहतो हा समज बाळबोध असल्याचे मत गुन्हेगारीचा समाजशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या अनेकांनी मांडले आहे. “डोळ्यासाठी डोळा असे ठरवले तर जगच आंधळे होईल’ असे गांधीजींनी म्हटले होते. ते यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे.

हवा सुधारणावादी शिक्षेचा विचार (भाग-१)

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेतील गुन्हेगारी आणि सुधारणा विषयक अभ्यास कऱणाऱ्या केंद्रानेही स्पष्टपणे सांगितले आहे की, गुन्ह्यांचा आलेख कमी होण्याचा कडक किंवा भयानक शिक्षेचा काहीही संबंध नाही, पण तरीही आपण याबाबत पारंपरिक भूमिका सोडण्यास तयार नाही आहोत. फाशीच्या शिक्षेला विरोध करणारी अनेक प्रसिद्ध वाक्‍ये आहेत. यामध्ये “ऍन आय फॉर ऍन आय, विल मेक द वर्ल्ड ब्लाईंड’ अर्थात डोळ्यासाठी डोळा घेतला तर संपूर्ण जगच आंधळे होईल, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. याखेरीज “व्हाय वुई किल पीपल, टू टेल पीपल दॅट किलिंग पीपल इज इल्लिगल’ अर्थात एखाद्याचा जीव घेणे हे बेकायदेशीर आहे हे लोकांना सांगण्यासाठी आपण लोकांचा जीव का घेतो?’ असेही एक प्रसिद्ध वाक्‍य आहे. आपण धार्मिक संदर्भ पाहिला तर अत्यंत निर्घृण हत्या करणाऱ्या, थंड डोक्‍याच्या वाल्याला वाल्मिकी होण्याची संधी दिली होती. तेव्हाच तो वाल्मिकी झाला. मग आधुनिक युगात असा सुधारणावादी विचार का स्वीकारू नये?

फाशीच्या शिक्षेसंदर्भात न्यायव्यवस्थेअंतर्गतही कोणतेही न्यायतात्विक एकमत नाही. मध्यंतरी, “फाशीच्या भीतीने गुन्ह्यांस प्रतिबंध होतो, गुन्हे कमी होतात किंवा गुन्हेगारांना जरब बसते हे दाखवून देणारा कोणताही पुरावा नाही” असे वक्‍तव्य सर्वोच्च न्यायालयाचे न्या. लोकुर यांनी केले होते. गुन्हेगारीचा आलेख वाढणे किंवा कमी होणे यांचा संबंध भीतीदायक शिक्षांशी नसतो तर जे कायदे आहेत त्यांच्या जलद व परिणामकारक अंमलबजावणीमुळे कायद्याबाबत वचक व आदर निर्माण होऊ शकतो भीतीदायक शिक्षा असल्यास जरब बसते आणि त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण नियंत्रणात राहते, असा समज अशास्त्रीय आणि असंबंद्ध असल्याचे अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवी हक्‍क संघटनेने आणि नंतर ह्युमन राईटस्‌ वॉच आणि संयुक्‍त राट्र संघाच्या मानवाधिकार आयोगानेही फार पूर्वीच जाहीर केले आहे.

फाशी हा अत्यंत तत्कालीन व मलमपट्टी स्वरूपाचा उथळ उपाय ठरतो हे क्रिमीनॉलॉजी विषयावरील जगभरातील अभ्यासकांनी मान्य केले आहे. प्रसिद्ध तत्त्वज्ञ खलील जिब्रान यांच्या मते, झाडावरचे पिकलेले पान जेव्हा गळून पडते तेव्हा त्या पडण्याला संपूर्ण झाडाची मुकसंमती असते; तर आर्य चाणाक्‍य यांचे वाक्‍य महत्त्वाचे आहे की, “जोपर्यंत वाईट गोष्टी घडण्याचे कारण समाजात अस्तित्वात आहे तोपर्यंत गुन्हेगारी कमी होणार नाही’ या दोन्ही विचारांवर घासून फाशीच्या शिक्षेचे अस्तित्त्व आणि परिणामकारकता तपासली तर लक्षात येते की, आपण समाज म्हणून एकत्रितपणे गुन्हेगारी वाढण्यासाठी दोषी आहोत. अगदी देशविघातक कारवाया करणाऱ्यांची बुद्धीधुलाई (ब्रेनवॉश) करण्यासाठी कुणाची भाषणे त्यांना ऐकविली जातात याची माहीती घेतली तर फाशीवर लटकणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्ती तयार होण्याची कारणे समाजात सतत उपस्थित आणि अस्तित्वात आहेत हेच लक्षात येते. गुन्हेगारांचा द्वेष करण्याऐवजी गुन्ह्यांचा द्वेष करा, असेही गांधीजी म्हणायचे. त्यामुळे प्रश्‍न केवळ फाशीच्या शिक्षेचा नाही तर आपण व्यापकपणे अस्तित्वात असलेल्या शिक्षांच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणणे आवश्‍यक आहे हे समजून घेतले पाहिजे. गुन्ह्यांच्या वर्गवारीनुसार सामाजिक शिक्षांचा विचार करून माणसांना सुधारण्याची संधी देणाऱ्या शिक्षाही अस्तित्वात आणल्या पाहिजेत हा विचार कायदेविषयक सुधारणांशी संबंधित आहे.

– अॅड. असीम सरोदे (लेखक हे मानवीहक्‍क विश्‍लेषक वकील आहेत.)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)