हवा सुधारणावादी शिक्षेचा विचार (भाग-१)

संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये फाशीच्या शिक्षेला जगभरातून हद्दपार करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात भारताने मतदान केले आहे. वास्तविक पाहता फाशीची शिक्षा असल्याने कायद्याची भीती आणि वचक राहतो हा समज बाळबोध असल्याचे मत गुन्हेगारीचा समाजशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या अनेकांनी मांडले आहे. “डोळ्यासाठी डोळा असे ठरवले तर जगच आंधळे होईल’ असे गांधीजींनी म्हटले होते. ते यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे.

फाशीविषयी भारताने घेतलेली भूमिका पारंपरिक, जुनाट आणि मागास विचार संकल्पनेवर आधारित शिक्षापद्धतीला अनुसरून घेतलेली आहे. कारण आपण शिक्षा दिल्याने समाज सुधारतो या भ्रमात आहोत. रचनात्मक, सकारात्मक शिक्षेच्या कोणत्याही स्वररूपाचा विचारही आपल्याला करायचा नाही. त्यामुळे कठोर शिक्षा केल्याने समाज चांगला राहतो, शिक्षा कठोर, भयानक असल्या तर माणसे चांगली वर्तणूक करतात असा आपला समज आहे. तथापि, असा विचार करणारे देश अल्पसंख्यांक आहेत हे झालेल्या मतदानातून दिसून येते.

सुधारणात्मक शिक्षा असू शकतात आणि त्याचा सकारात्मक परिणाम होतो ही बाबच मुळी आपल्याकडे मान्य केली जात नाही. रचनात्मक किंवा सुधारणात्मक शिक्षा देताना त्याची जबाबदारी समाजावरही पडते. कदाचित म्हणूनच परंपरागत शिक्षा देऊन त्या गुन्हेगारांना चार भिंतीत कोंडण्याचा सुलभ मार्ग अवलंबला जातो. वास्तविक, तुरुंगात शिक्षा भोगणे गुन्हेगारांनाही बरे वाटते. कारण समाजापुढे जाऊन शिक्षा भोगल्यास त्या अपमानाची सल अधिक तीव्र असते. उदाहरणार्थ, एखाद्या गुन्हेगाराला दररोज शौचालये स्वच्छ करण्याची शिक्षा दिली गेली तर ती त्याच्यासाठी सर्वाधिक वेदनादायी असेल. आम्ही जातपंचायतीच्या कायद्याचा मसुदा देतानाही अशाच प्रकारची शिक्षा प्रस्तावित केली होती. ज्या जातीतले लोक त्यांच्याच जातवाल्यांवर अन्याय करतात, वाळीत टाकतात. अशा व्यक्‍तींना त्याच समाजासमोर शिक्षा व्हावी म्हणून जिथे घटना घडली तिथेच रस्ते झाडणे, सार्वजनिक संडास, बाथरूम साफ करणे अशा स्वरूपाच्या शिक्षा द्याव्यात, असे आम्ही सुचवले होते. इतकेच नव्हे तर त्या गुन्हेगाराचे फोटो काढणे, शुटिंग करणे याचे अधिकार पत्रकारांना असतील असेही स्पष्टपणे कायद्यात नमूद करा असे सांगितले होते. अशा शिक्षांमधून गुन्हेगाराचे प्रतिमाभंजन होते. त्याचा त्रास होतो हे लोकांच्या लक्षात येईल.

हवा सुधारणावादी शिक्षेचा विचार (भाग-२)

फाशीच्या शिक्षेचा विचार करता दुर्मिळातील दुर्मीळ गुन्ह्यात फाशीची शिक्षा दिली जाते, पण आपण ही शिक्षा पुस्तकांमध्येच कायम ठेवली आहे. प्रत्यक्ष आयुष्यात ती रद्दच केल्यासारखी आहे. कारण त्याची अंमलबजावणीच केली जात नाही. मात्र, तरीही आपल्या देशातील लोकांना ही शिक्षा रद्द करणे आवडणार नाही, असा विचार करून या शिक्षेचे समर्थन केले जाते. कदाचित, ही शिक्षा रद्द केल्यास लोक देशावर प्रेम नाही का, देशात गुन्हेगारी वाढावी अशी इच्छा आहे का, गुन्हेगारांचे लाड करायचे का, असे प्रश्‍न विचारतील अशीही एक अटकळ असते, पण 138 देशांमध्ये फाशीची शिक्षा बंद केली आहे. त्या देशातील लोकांचे देशावर प्रेम नाही किंवा त्यांना गुन्हेगारी वाढावी असे वाटते असे नाही. त्यांनी गुन्हे आणि सामाजिक शास्त्र यांचा शास्त्रशुद्ध आणि एकत्रित अभ्यास केला आहे.

– अॅड. असीम सरोदे (लेखक हे मानवीहक्‍क विश्‍लेषक वकील आहेत.)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)