हळद उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था म्हणजे म्हशीपेक्षा रेडकू मोठं

वाई  – हळदीच्या उत्पादनासाठी वाई तालुका प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हळदीचा योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. मात्र, यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी चांगला भाव मिळेल या एकाच आशेव शेतकरी हळदीचे पिक घेत आहे, परंतु हळदीला काही योग्य भाव न मिळाल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याचे आजरवचे चित्र असल्याने सध्या वाई तालुक्‍यातील हळद उत्पादक शेतकऱ्याची अवस्था “म्हशीपेक्षा रेडकू जड’ अशीच झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वाई तालुक्‍यातील हळद उत्पादक शेतकरी सोन्याच्या किंमतीचे हळदीचे पिक घेत असतानासुध्दा कायम कर्ज बाजारी होताना दिसत आहे. हळद पिकाला शासनाकडून हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची परवड थांबत नाही. बाजार समितीने पोसलेले व्यापारी हेच हळदीचा भाव ठरवीत असल्याने त्यांच्याकडून हळद उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक होताना दिसत आहे. त्यातच तालुक्‍यातील शेतकरी व्यापाऱ्यांकडून हवे तेव्हा पैसे उचलत असल्याने व्यापाऱ्यांची मनमानी चालू असते.

गेल्या पाच वर्षात एकाही वर्षी दहा हजारांच्या वर हळदीला भाव मिळाला नाही. यावर्षी वाई बाजार समितीने 8600 रुपयांचा भाव हा उत्तम प्रतीच्या मालाला जाहीर केला असल्याने सात हजारातच सर्वसामान्य मालाला पैसे मिळणार हे निश्‍चित! उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च वाढत असल्याने “म्हशीपेक्षा रेडकू जड’ अशी काहीशी अवस्था तालुक्‍यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. हळद हे पिक स्पर्धात्मक असल्यानेच शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे आहे. तसेच या पिकाचा बिवड हा दुसऱ्या घेणाऱ्या पिकासाठी उत्तम प्रतीचा होत असल्यानेच हळदीचे उत्पन्न घेताना शेतकरी दिसत आहे. वाई तालुक्‍यात शहाबाग, खानापूर, ओझर्डे, पांडे, जोशिविहीर, बावधन, मेणवली, धोम या गावांमधून हळदीचे पिक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे.

गेल्या पाच वर्षातील हळदीच्या भावाची रूपरेषा

सन 2013 – 2014 मध्ये हळदीला कमीतकमी सहा हजार, जास्तीत-जास्त अकरा हजार, तर सरासरी भाव हा आठ हजार पाचशे इतका मिळाला, 2014 – 2015 साली सहा हजार, बारा हजार, व नऊ हजार इतका मिळाला होता. 2015 – 2016 साली- सात हजार, बारा हजार, नऊ हजार पाचशे, मिळाला, 2016 – 2017 साली आठ हजार, दहा हजार, व नऊ हजार मिळाला, 2017 – 2018 साली पाच हजार, नऊ हजार, व आठ हजार मिळाला आणि यंदाच्या हंगामातील नुकताच जाहीर झालेला भाव हा सात हजार, आठ हजार सहाशे व सरासरी पाच हजार पाचशे पर्यंत मिळेल. एकंदर हळदीचा भाव अनियमित दिसून येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)