हळदीचे विक्रमी उत्पादन, पण भाव नाही

बाजार समितीवर व्यापाऱ्यांचे वर्चस्व
कोणत्याही बाजार समितीत व्यापारी हा बाजार पेठ व शेतकरी यांच्यातील मुख्य दुवा असल्याने शेतकर्यांकडून व्यापारी हव्या त्या भावात बोली बोलून प्रतवारी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करतो, बाजार समितीला व्यापार्यांकडून आर्थिक फायदा होत असल्याने व्यापाऱ्यांची मनमानी चालते,बाजार समितीचे पदाधिकारी शेतकरीच, तरीही हळद पिकाच्या दराबाबत उदासीनतादिसून येते हे दुर्दैव म्हणावे लागेल, एकंदरीत बाजार समितीवर व्यापार्यांचेच वर्चस्व पाहायला मिळते. हे चित्र बदलल्यास शेतकऱ्यांची आर्थिक घडी सुधारू शकते.

शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीस:वाई तालुक्‍यात विक्रमी उत्पादन

वाई – वाई तालुका हळद पिकाचा आगर मानला जातो. संपूर्ण तालुक्‍यात हळद पिकाच्या काढणीला वेग आला असून शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. लाखो रुपये खर्च झालेल्या पिकाची दरासंदर्भात परवड झाल्याने वाई तालुक्‍यातील ेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत आल्याचे संपूर्ण तालुक्‍यातील चित्र आहे. हळदीच्या दर हा उत्पादन खर्चापेक्षा जास्त होत असल्याने हळदीच्या पिकासाठी लाखो रुपये खर्च करूनही बळीराजाच्या पदरी निराशाच पडत आहे.
शासनासह बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हळदी पिकाला हमी भाव न दिल्यास सोन्याच्या किमतीचे पिक घेवूनही मातीमोल भावाने विकण्याची नामुष्की वाई तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर येत आहे. ज्या पिकावर बाजार समितीतील उलाढाल अवलंबून असते त्याच बाजार समितीने कोणतेही शेतकऱ्यांच्या हिताचे पाऊल आगामी काळात उचलावे लागेल. गेल्या अनेक वर्षांपासून हळदीच्या पिकाला हमी भाव मिळत नसल्याने हे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे भविष्यात हळद पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्यास आश्‍चर्य वाटून घेवू नये.

हळद पिकाचे उत्पन्न घेण्यासाठी एकरी साठ-ते-पासष्ट हजार खर्च अपेक्षित असतो. त्यामध्ये शेणखत, बियाणे, मशागत, काढणी, वरखत, औषधे, पॉलिश, मजुरीने तर शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटिला आल्याचे चित्र आहे, उत्पादन खर्चाच्या प्रमाणात हळदीला भाव मिळत नसल्याने घातलेला खर्च सुध्दा मिळत नाही. त्यामुळे हळद उत्पादन शेतकऱ्याचे कर्ज कधीही कमी होताना दिसत नाही. त्यातच वाई तालुक्‍यातील हळद पिकाला व्यापारी शेतकऱ्याला बांधावर जावून पैसे देत असल्याने व्यापाऱ्याकडूनहव्या त्या दराने हळद पिकाची किंमत लावली जाते. तसेच पिक लागवडीच्या अगोदरच शेतकऱ्यांना उचल पैसे देत असल्याने दिलेल्या पैशाला व्यापार्याकडून व्याजाचे पैसे आकारले जातात. त्यामुळेच हळद उत्पादक शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत येतो. तसेच या पिकावर शेतकरी विकास सेवा सोसायटीचे कर्ज घेतो, त्या कर्जाचे व्याज भरून शेतकर्यांचा जीव मेटाकुटीस येतो. तरीही या पिकाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा पहावयास मिळते. एवढ्या प्रचंड खर्चाच्या हळदीच्या पिकाचा माल घेवून ज्यावेळी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावर घेवून जातो त्यावेळी मिळालेल्या तुटपुंज्या दरामुळे शेतकर्याने ठरविलेल्या प्रापंचिक आर्थिक नियोजनाचे कंबरडे मोडलेले असते. अशी व्यथा वाई तालुक्‍यातील शेतकरी मांडत आहेत. हळद शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समितीच्या पदाधिकार्यांनी एकत्रित येवून एक समिती गठीत करून या समितीच्या मार्फत हळद पिकाची व्यथा शासन दरबारी मांडून हळद दरासाठी भांडून हमी भाव घेण्यासाठी आग्रह धरला पाहिजे तरच या सोन्याचे पिक घेणारा पारंपारिक शेतकरी कुठेतरी तरला जाईल अशी अपेक्षा हळद उत्पादक शेतकर्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

हळद हे पिक पारंपारिक पध्दतीने घेतले जाते. यावर हळद पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. सध्याच्या हळदीच्या दराची अवस्था पाहता शेतकरी हा कर्जाच्या खाईत लोटलेला चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. गेल्या पाच वर्षांपासून हळदीच्या मालाचा दर गडगडल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल दर वाढीच्या अपेक्षांनी खाजगी शीतगृहात ठेवल्याने त्याचे भाडे आणि होणारे व्याज निघत नसल्याने हळदीचा माल शीत गृहाच्या मालकाच्या स्वाधीन करावा लागल्याचे बोलले जात आहे. हळदीच्या पिकास शासनाने हमीभाव न दिल्यास वाई तालुक्‍यातील हळदीचे पिक शेतातून नामशेस होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांवर आश्वासनाची खैरात न करता चांगला भाव दिल्यास बळीराजा खऱ्या अर्थाने तरला जावू शकतो अशी मागणी वाई तालुक्‍यातील शेतकरी करताना दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)