हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

कण्हेर कालव्यातून पाणी न सोडल्याने पिकांचे नुकसान : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

सातारा – कण्हेर कालव्यातून पाणी न सोडल्यामुळे ऊसासह इतर पिके जळून गेली असून तात्काळ नुकसानीची भरपाई देवून हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

सातारा तालुक्‍यातील जाधववाडी तर्फ तासगाव येथील वेण्णा नदीवरील उजव्या कालव्यावरील मोरीपुल जीर्ण झाल्याचे कारण सांगून धोम पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पाडला. मोरीपुलाचे बांधकाम करण्यासाठी सप्टेंबर 2018 मध्ये टेंडर काढण्यात आले. परंतु अद्याप काम पुर्ण करून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले नाही. त्यामुळे कशी बशी पावसावर उगवलेली पिके व ऊस वाळून गेला आहे.

वास्तविक या कालव्याच्या पाण्यावर सातारा तालुक्‍यातील मौजे जाधववाडी, वर्णे, अंगापूर, चिंचणेर, वढळवाडी, माळवाडी, मुंढेवाडी, निगडी, लांडेवाडी, कामेरी, फत्यापूर, टिटवेवाडी, देशमुखनगर, जावळवाडी, वारणानगर, खोजेवाडी, अंबेवाडी, वेणेगावातील शेतकरी पिके घेत असतात. पिके वाळू नये व पाण्याचे आवर्तन सोडावे यासाठी सातत्याने कार्यकारी अभियंतांना शेतकरी भेटले मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी शेतकऱ्यांना आंदोलन देखील करावे लागले.

त्यावेळी तहसिलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांसमवेत सभा घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. असे असताना दुसऱ्या बाजूला मोरीच्या पुलाचे काम होण्यास अजून दोन महिने लागणार आहेत.
त्यामुळे पिकांचे आणखी नुकसान होणार असून त्याची नुकसान भरपाई आता शासनाने द्यावी व हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी राजेंद्र शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, श्रीमंत पिसाळ, गणेश काळंगे, गणेश चव्हाण, दत्तात्रय इंगळे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)