हरिवंश सिंह यांचा 125 विरुद्ध 105 मतांनी विजय

राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी हरिवंश सिंह
नवी दिल्ली – राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीमध्ये सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आणि संयुक्‍त जनता दलाचे खासदार हरिवंश नारायण सिंह हे विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांचा पराभव केला. राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करून दिली. हरिवंश नारायण सिंह यांना 125, तर हरिप्रसाद यांना 105 मते मिळाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही निवडणूक अटितटीची होण्याची अपेक्षा होती. मात्र बिजू जनता दलाच्या 9 सदस्यांनी ऐनवेळी भाजप प्रणित एनडीएच्या बाजूने मतदान केल्यामुळे हरिवंश सिंह यांचा विजय सोपा झाला. बीजेडी आणि जेडियु या दोन्ही पक्षांची विचारधारा जय प्रकाश नारायण यांच्याच विचारातून विकसित झाली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना नेते संजय राऊत, अकाली दलाचे एस. एस. धिंडसा आणि जेडियुचे आरसीपी यादव यांच्याशी संपर्क साधून हरिवंश यांच्यासाठी पाठिंबा मिळवला होता. दुसरीकडे कॉंग्रेसच्या हरिप्रसाद यांना बसपाचे सतिश मिश्रा, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वंदना चव्हाण, कॉंग्रेसचे आनंद शर्मा, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव आणि आरजेडीच्या मिसा भारती यांचा पाठिंबा होता.

राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन हे 1 जुलै रोजी निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्‍त होते. गेल्या महिन्यामध्ये विरोधकांनी सरकारच्या विरोधात अविश्‍वास ठराव आणला होता. मात्र अपेक्षित संख्याबळ नसल्याने हा ठराव मंजूर होऊ शकला नव्हता. त्यानंतर सरकारची कोंडी करण्यासाठी राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये विरोधक एकवटले होते. लोकसभेमध्ये सरकार जरी बहुमतात असले तरी राज्यसभेमध्ये सत्तारुढ भाजपा आणि मित्र पक्षांचे संख्याबळ पुरेसे नसल्यामुळे अनेक महत्वाच्या विधेयकांसाठी विरोधकांवर अवलंबून राहण्याची नामुष्की भाजपवर आली होती. संयुक्‍त जनता दलाच्या उमेदवाराला राज्यसभेचे उपाध्यक्षपद देऊन भाजपकडून सहकारी पक्षांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आता राज्यसभेमध्ये उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष वेंकय्या नायडू आणि उपाध्यक्ष हरिवंश सिंह हे दोन्ही भाजपच्याच बाजूचे असल्याने हे अडथळे काही प्रमाणात कमी होण्याची भाजपला अपेक्षा आहे.

पंतप्रधानांकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरिवंश सिंह यांचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व सभागृहाच्यावतीने अभिनंदन केले. हरीवंशजी यांनी माजी पंतप्रधान चंद्रशेखरजी यांच्याबरोबर काम करत असताना, चंद्रशेखर राजीनामा देणार असल्याचे हरीवंश यांना आधीच माहिती होते. मात्र या बातमीचा त्यांनी स्वत:च्या वृत्तपत्रालाही सुगावा लागू दिला नाही. यातून नैतिकता आणि सार्वजनिक सेवेविषयी त्यांची प्रतिबद्धता व्यक्त होते; असे पंतप्रधान म्हणाले. हरीवंश उत्तम वाचक असून त्यांनी विपूल लिखाण केले आहे. हरीवंश यांनी समाजाची अनेक वर्ष सेवा केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)