हरिदासाची कथा पुन्हा मूळ ‘पदावर’!

Bengaluru : Indian Cricket Team Head Coach Anil Kumble speaks during a press conference on the first day of a preperatory camp ahead of the West Indies series, in Bengaluru on Wednesday. PTI Photo by Shailendra Bhojak (PTI6_29_2016_000172A)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा पुन्हा एकदा प्रशिक्षक शोध सुरू झालाय. म्हणूनच ‘हरिदासाची कथा पुन्हा मूळ पदावर’ या वाक्‍याचा आधार घ्यावा लागला. जरा कामगिरी खराब झाली की कर्णधार बदला, खेळाडू बदला, प्रशिक्षक बदला या नेहमीच्याच चर्चाना जोर येतो. यंदा ‘खापर’ फोडायला कोणाचेही डोके न सापडल्याने संघ संचालक वगैरे नको, पूर्ण वेळ प्रशिक्षक हवा या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरलाय. सध्या तरी अनिल कुंबळे यांनाच मुदतवाढ मिळणार असे संकेत आहेत. आता नंतर काटेरी मुकुट कोणाच्या डोक्‍यावर जाणार, हे येणारी वेळच सांगेल.
भारतीय खेळाडूंच्या मानधनात 150 टक्के वाढ करावी या सूचनेनंतर कुंबळे आणि भारतीय नियामक मंडळ यांच्यामध्ये मतभेद झाले होते. कर्णधार विराट कोहली जरी याबाबत कुंबळेशी सहमत असला, तरी त्यांच्यात कांहीतरी मतभेद आहेत अशी आवई उठली होती. मात्र, प्रशिक्षक निवड समितीने यातून समजुतीचा मार्ग काढला आणि कुंबळेंची मुदतवाढ निश्‍चित झाली.
बरं, हा पूर्णवेळ प्रशिक्षक निवडणार कोण तर या निवडीसाठी संघटित केलेली त्रिसदस्यीय समिती. या समितीत सचिन तेंडुलकर, व्यंकटसाई लक्ष्मण आणि सौरव गांगुली आहेत. मुळात या समितीच्या आजवर केवळ तीन बैठका झाल्या आहेत. गांगुली सध्या बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूुषवतोय, लक्ष्मण समालोचक म्हणून विविध देशांचे दौरे करतोय आणि सचिन सध्या वरिष्ठ खेळाडूंच्या ‘मास्टर्स लीग’ स्पर्धेत व्यस्त आहे. अशा स्थितीत समितीची बैठक होणार कधी. मुळात या समितीकडे भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांचेच किती अर्ज आले आहेत, त्यातून काही नावे निवडली का? मंडळाकडे त्याबाबत काही माहिती आहे का? या आणि अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरेच नाहीत. मग मंडळाचे सचिव कोणत्या भरवशावर पूर्णवेळ प्रशिक्षक देण्याच्या वल्गना करत आहेत. मुळात या समितीने सुचवलेल्या नावाला मंडळाकडून किती किंमत मिळणार आहे, का त्यांची सूचना केराच्या टोपलीत जाणार आहे.
विश्‍वकरंडक 2015 नंतर मूळचे झिम्बावेचे डंकन फ्लेचर यांचा भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा कार्यकाल संपला. त्यानंतर आतापर्यंत रवी शास्त्री यांना संघ संचालक म्हणून संघाबरोबर नियुक्त केले आहे. सपोर्ट स्टाफ मात्र संजय बांगर, भरत अरुण आणि आर. श्रीधर असाच कायम ठेवलाय. जेव्हा ही समिती नियुक्त केली त्यावेळी शास्त्रींची मुदत संपून सौरव गांगुली मुख्य प्रशिक्षक होणार अशी आवई उठली होती. मात्र, गांगुली या समितीचा, तसेच बंगाल क्रिकेट संघटनेचा प्रमुख बनला व ही चर्चा थांबली आणि अनिल कुंबळे यांना पूर्ण वेळ प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले.
संघ संचालक म्हणून काम करताना शास्त्री यांच्यामुळे संघाच्या कामगिरीचा आलेख चांगला राहिला आहे. 2011 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत कर्स्टन यांच्याचमुळे भारतीय संघ विश्‍वकरंडकाला गवसणी घालू शकला होता. मात्र, त्यानंतर कौटुंबिक कारणाने कर्स्टन यांनी भारतीय संघासोबतचा करार वाढविण्यास नकार दिला. या पदावर नंतर डंकन फ्लेचर यांची नियुक्ती करण्यात आली होती. फ्लेचर यांचा करार संपल्यानंतर मात्र भारतीय संघाला पूर्णवेळ प्रशिक्षक न मिळता संघ संचालक मिळाला. ‘मियां बीबी राजी तो क्‍या करेगा काझी’ ही परिस्थिती आहे. तर मग मंडळ विनाकारण या समितीची स्थापना करून ‘कबाब में हड्डी’ का होते आहे. कुंबळेंचा संघाबरोबरचा संसार सुखाचा सुरू आहे मग नवा घरोबा करून आता ‘नांदा सौख्य भरे’ हे संकेत कशासाठी? जगात अनेक नवे पायंडे पडत आहेत. मग प्रशिक्षक नसण्याचा, पण तरीही सरस कामगिरीचा आपण पायंडा पाडला तर बिघडले कुठे?

कर्स्टन यांच्याशीच पुन्हा संपर्क
2011च्या विश्‍वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनाच पुन्हा हे पद स्वीाकरण्याबाबत मंडळाकडून विचारणा करण्यात आल्याचे वृत्त आहे. मंडळाच्या एका सदस्याने अनधिकृतरीत्या ही माहिती दिली आहे. या संपर्कादरम्यान खुद्द कर्स्टन यांनीही मंडळाकडे विचार करण्याची मुदत मागितली असून सकारात्मक चर्चा झाल्याची खबर आहे. सर्व काही जुळून आले तर 2019 विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत कर्स्टन पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून सूत्रे स्वीकारतील.
जॉन राईट यांच्या यशस्वी कालखंडानंतर ग्रेग चॅपेल यांच्याकडे प्रशिक्षकपद दिले होते आणि तिथेच सगळा फियास्को झाला. ‘तुम्ही आमचे क्रिकेट दहा वर्षे मागे नेले. अशी टीका खुद्द सचिन तेंडुलकरने केली होती. त्यावेळी तोंड पोळल्यामुळे मंडळाकडून कोणाही ऑस्ट्रेलियन खेळाडूला या पदावर नियुक्ती करण्याबाबत विचारणा झालेली नाही. कर्स्टन यांचे खेळाडूंबरोबर संबंध खूपच चांगले होते. मुळात या स्तरावर प्रशिक्षक गरजेचा नसतो, तर खेळाडूंना मानसिक आधार देणारा व कायम आशावादी ठेवणारा ‘मेंटॉर’ हवा असतो आणि कर्स्टन या बाबतीत ‘प्रोफेसर ऑफ क्रिकेट’ समजले जातात. जर खरेच शास्त्रींना योग्य पर्याय निवडला जावा असे मंडळाला वाटत असेल, तर तो पर्याय फक्त कर्स्टन यांचाच आहे. आगामी काळात त्यांच्याशी बोलणी फिस्कटली तर अन्य कोणाचाही विचार न करता कुंबळेंनाच मुदतवाढ द्यावी.
भारतीय प्रशिक्षक हवा
कर्स्टन यांच्याशी झालेला संपर्क ताजा असतानाच काही माजी खेळाडूंनी मात्र आता भारतीय प्रशिक्षकाची गरज असल्याचे बोलले आहे. अर्थात त्यांच्या मताला ‘श्‍वान’ही विचारत नाही. त्यामुळे शास्त्रींऐवजी कर्स्टन किंवा शास्त्रींनाच मुदतवाढ हा पर्याय निवडला जाईल. कदाचित कुंबळेंच्या मदतीला एखादा वरिष्ठ क्रिकेटपटू सल्लागार म्हणून दिला जाईल.
विचार 2019 विश्‍वकरंडकाचा
पूर्णवेळ प्रशिक्षक निवडीमागे विश्‍वकरंडक 2019 ही स्पर्धा डोळ्यासमोर ठेवण्यात आली आहे. पण कसोटी आणि एकदिवसीय तसेच टी-20 साठी दोन वेगवेगळे प्रशिक्षक ठेवले जावे असेही मंडळाचे संकेत आहेत. तसे झाले तर प्रशिक्षकच्या चर्चेत असलेल्या कर्स्टन, राहुल द्रविड यांच्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेच्या केपलर वेसल्स यांचीही नावे परत एकदा चर्चेत आहेत. मुळात कुंबळेंनाच मुदतवाढ दिली, तर सगळेच प्रश्‍न मिटतील. कारण टी-20 विश्‍वकरंडकात विजेतेपद किंवा उपविजेतेपद जरी आपण मिळवले तर पुन्हा एकदा ‘प्रशिक्षक’ हवाच कशाला हा प्रश्‍न उपस्थित होईल. असो, सध्यातरी आगामी दोन महिने प्रशिक्षक निवड यावर चर्चा करण्याच्या मुडमध्ये मंडळाचे पदाधिकारी आहेत. त्रिसदस्यीय समिती देखील ‘बैठक-बैठक’ खेळेल. त्यातून काहीच हशील होणार नाही. कारण त्यांनी सुचवलेल्या नावावर मंडळाचे लोक सहमत होणार नाहीत. मग ही समितीच नको इथपर्यंत चर्चा होईल. मुळात, ज्या प्रशिक्षक निवडीसाठी हे सर्व सुरू आहे, ते बाजूला टाकून एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरू होईल. काही महिने शांततेत जातील. या वर्षी तेरा कसोटी सामने भारतीय संघ खेळला आहे, म्हणजे जेव्हा मोठा पराभव होईल तेवहा पुन्हा एकदा ‘पूर्णवेळ प्रशिक्षक’ हवा ही चर्चा जोर धरील व ‘हरिदासाची कथा पुन्हा मूळ पदावर’ आलेली असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)