हरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग ३)

हरभरा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान (भाग २)

* रुंद वरंबा- सरी पद्धतीने पेरणी 
हरभरा पिकाची रुंद वरंबा- सरी पद्धतीने पेरणी केल्याने परतीच्या पावसाच्या पाण्याचे सरीद्वारे संवर्धन तसेच निचरा झाल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते व यांत्रिक पद्धतीने आंतरमशागत करता येते. हरबरा पिकाची सुधारित पद्धतीने लागवड केल्याने रोपांची योग्य संख्या राखून उत्पादनात वाढ मिळते तसेच योग्य पद्धतीने पीक व्यवस्थापन करता येते.
बागायती व जिरायती पीक पद्धतीत शिफारसीनुसार एकरी रोपांची संख्या असणे, हा पीक उत्पादनाचा पाया आहे. हरभऱ्याची पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास प्रत्येक ओळीतील अंतर 18 इंच मिळते आणि सलग पेरणीप्रमाणे ओळींची संख्यासुद्धा मिळते.
* ट्रॅक्‍टरचलित रुंद वरंबा- सरी टोकण यंत्र: 
मध्यवर्ती कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद यांनी विकसित केलेल्या ट्रॅक्‍टरचलित टोकण यंत्रास दोनसरी नांगर व 4 फण बसून केलेले यंत्र असून, याच्या सांगाड्यावर दोनसरी नांगर बसविलेले आहेत. यंत्राच्या सांगाड्यावर एक पेटी बसविलेली आहे. त्या पेटीचे खत व बियाणासाठी असे दोन मुख्य भाग केलेले आहेत. या मुख्य भागाचे फणाच्या संख्येनुसार प्रत्येकी चार उपभाग केलेले आहेत. अशा प्रकारे यंत्राच्या प्रत्येक फणासाठी स्वतंत्र बियाणे व खतपेटी दिलेली आहे. त्यामुळे आंतरपीकसुद्धा पेरणी करता येते.बियाणे पेरणीसाठी तिरपी प्लेट, तर खतपेरणीसाठी उभी प्लेट बसविण्यात आलेली आहे.
यंत्रासोबत विविध पिकांच्या पेरणीसाठी स्वतंत्र प्लेट दिलेल्या आहेत. आवश्‍यकतेप्रमाणे खताचे प्रमाण कमी-जास्त करता येते. या टोकण यंत्राने ज्वारी, मका, भुईमूग, कांदा इ. पिकांची पेरणी करता येते.
* यंत्राची जोडणी :– हरभरा पिकाची पेरणी 18 इंच (दीड फूट) अंतरावर करण्यासाठी ट्रॅक्‍टरचलित रुंद वरंबा सरी टोकण यंत्राची जोडणी पुढीलप्रमाणे करून पेरणीसाठी वापरावे. प्रत्येक ट्रॅक्‍टरच्या मागील टायरमधील अंतर अश्‍वशक्तीच्या प्रकारानुसार कमी-जास्त असते. त्यामुळे, यंत्राची जोडणी केल्यानंतर सरी नांगर ट्रॅक्‍टरच्या मागील टायरच्या मध्यभागी आहे की नाही, याची पाहणी करावी. नांगर टायरच्या मध्यभागी नसेल तर मागील टायर काढून पलटी करून बसवून घ्यावे. त्यामुळे दोन्ही टायरमधील अंतर साधारणपणे 8 त12े इंच वाढते. अशा प्रकारे टायरच्या मध्यभागी सरी नांगर घेतल्यामुळे पेरणीनंतर जमीन वाफशावर असताना या यंत्राने आंतरमशागत करता येते. तसेच ट्‍रॅक्‍टरचलित फवारणी यंत्राने फवारणी करता येते. त्यामुळे वेळ व मजुरांची बचत होते. वरीलप्रमाणे यंत्रावर खुणा केल्यानंतर यंत्राचा मध्य सोडून सांगाड्याच्या मागील बाजूस फणाची जोडणी करावी. फण जोडल्यानंतर सांगाड्याच्या समोरील बाजूस सरी नांगर बसवावे. अशा प्रकारे यंत्र पेरणीसाठी तयार करावे. पेरणी करीत असताना पहिले तास मारल्यानंतर बांधावरून वळताना जाताना पडलेल्या सरीमध्ये सरी नांगर घालावा, जेणेकरून सरीच्या दोन्ही बाजूंना येणाऱ्या ओळीमध्ये 18 इंच अंतर राहील.
* रुंद वरंबा सरी -पद्धतीचे फायदे :– 1. परतीच्या पावसाच्या पाण्याचे सरीमध्ये संवर्धन होते. 2. जास्त पाऊस झाल्यास पावसाच्या पाण्याचा जलद निचरा होतो. 3. सरीद्वारा पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होते. 4. यांत्रिक पद्धतीने आंतरमशागत करता येते. 5. पीक उत्पादनात 15 ते 30 टक्के वाढ होते. बळीराम नांगराने सरी वरंबा पेरणी : बऱ्याच शेतकऱ्यांकडे बैलचलित बळिराम नांगर असल्याने बैलचलित तिफण वापरून शेतकरी पेरणी करतात. पेरणीपूर्वी पाऊस पडल्यानंतर शेतात 4.5 फूट अंतरावर बळिराम नांगराने सरी काढाव्यात.
पाऊस झाल्यानंतर बळिराम नांगराने तयार झालेल्या वरंब्यावर पेरणी करावी.
ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्र असेल, तर त्या यंत्राच्या सांगाड्यावर दोन्ही बाजूंना सरी यंत्र बसवून रुंद सरी वरंबा पेरणी करता येते.
* बीजप्रक्रिया: पेरणीपूर्वी हरभऱ्यास 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम बाविस्टीन किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा यांची प्रक्रिया करावी. यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास प्रत्येकी 250 ग्रॅम रायझोबियम व पी.एस.बी. या जिवाणू ची प्रक्रिया करावी.
* खतमात्रा: हरभरा पिकास 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. यासाठी 125 किलो डी.ए.पी. आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटाश पेरणीच्या वेळी दुचाडी पाभरीने पेरून द्यावे. पिक फुलोऱ्यात व घाटे भरण्याच्या अवस्थेत असताना 2 टक्के युरिया किंवा 13:00:45 या अन्नद्रव्याची फवारणी करावी.
* आंतरमशागत: पिकाची जोमदार वाढ व्हावी म्हणून शेत सुरुवातीपासून तणविरहित ठेवावे. पिक 20 दिवसांचे असतांना पहिली व 30 दिवसाचे असतांना दुसरी कोळपणी जमिनीत वापसा असताना करावी. कोळपणी केल्याने जमिनीत हवा खेळती राहते आणि पिकाची वाढ चांगली होते. कोळपणी नंतर खुरपणी करावी. कोळपणी मुळे कोरडवाहू क्षेत्रात जमिनीत पडलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहण्यास मदत होते.
तण नियंत्रणासाठी फ्लूक्‍लोरालीन किंवा पेन्डीमेथिलीन हे तणनाशक 1.0 ली. प्रति एकरी 200 लिटर पाण्यातून जमिनीत पुरेसा ओलावा असतांना पिक व तण उगवणीपूर्वी फवारणी करावी.
* एकात्मिक पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान: जिरायती हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्‍य असल्यास हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे.हरभरा पिकास मध्यम जमिनीत लागवडीनंतर20 ते 25 दिवसांनी पहिले,45ते50 दिवसांनी दुसरे आणि 65ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीत पहिले पाणी लागवडीनंतर 30-35दिवसांनी, तर दुसरे पाणी 60-65 दिवसांनी द्यावे.स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. भेगा पडलेल्या शेतात पाणी दिल्यास जास्त पाणी बसून, चांगले पीक उभळण्याचा धोका असतो. पाणी दिल्या नंतर शेतात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.
* तुषार सिंचनाचा वापर : तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्‍यकत्या वेळेला पाणी देता येत असल्याने जमीन नेहमी भुसभुशीत राहते. तुषारसिंचन पद्धतीमध्ये पाणी दिल्यास शेतामध्ये सारा, पाटा, वरंबे पाडण्याची गरज नसल्याने यावरील खर्चात बचत होते.
तुषार सिंचनाने पाणी प्रमाणात देता येत असल्यामुळे मूळकूजरोगामुळे होणारे नुकसान टाळता येते. जमिनीत नेहमीच वाफसास्थिती राहत असल्याने पिकास दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात आणि पिकाची अन्नद्रव्ये शोषण्याची
क्षमता वाढते.
अधिक माहितीसाठी संपर्क : 
नारायण निबे 
विषय विशेषज्ञ,(कृषिविद्या), 
कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव 
मो. 8805985205 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)