हरता हरता ‘जिंकलो’ !

पुण्यातील पहिल्या कसोटी सामन्यापासून भारतीय फलंदाजीला जी ‘साडेसाती’ लागली ती बंगळुरूमधील दुसऱ्या कसोटी सामन्यातही कायम राहिली. ‘जागा बदलली तरी नशीब बदलत नाही.’ असे म्हणतात, तेच खरे. दुसऱ्या डावात चेतेश्‍वर पुजारा, के. एल. राहुल आणि अजिंक्‍य रहाणे यांनी उपयुक्त फलंदाजी केली; त्याचबरोबर रविचंद्रन अश्‍विन आणि उमेश यादव यांनी अविश्‍वसनीय गोलंदाजी केली आणि जवळपास हरणारा सामना भारताला जिंकून दिला.
या विजयाने भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. विजय मिळवला असला, तरीही कांही प्रश्‍न निर्माण झालेलेच आहेत. या दोन्ही सामन्यांत ऑस्ट्रेलियाची ‘फिरकी’ गोलंदाजी खेळताना आपण जणू भूत पाहिल्यासारखे घाबरलो आणि बेजबाबदार पध्दतीने आपल्या विकेट गमावल्या. दुसऱ्या सामन्यात पहिला डाव 189 धावांत गडगडला. मात्र दुसऱ्या डावात पुजारा, राहुल आणि रहाणे यांच्या फलंदाजीच्या जोरावर आपण ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य देऊ शकलो. पण द्विशतकी लक्ष्याच्या आतील धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने नेहमीची जिगर दाखवलीच नाही. हा सामना आपण 75 धावांनी जिंकला आणि पुण्यात गमावलेली प्रतिष्ठा कांही प्रमाणात का होईना, परत मिळवली, आता रांची आणि धर्मशाळा येथील दोन्ही कसोटी सामने जर आपण जिंकले व मालिकाही खिशात घातली, तरच कसोटीतील अव्वल स्थान आणि प्रतिष्ठा टिकेल.
पुण्यातील पहिल्या सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज स्टीव ओकीफ याने आपल्या फलंदाजांना नाचवले, तर बंगळुरूच्या दुसऱ्या सामन्यात ऑफ स्पिन गोलंदाज नॅथन लियॉन याने ‘झिम-फुगडी’ खेळायला लावली. स्टीव ओकीफ म्हणजे लान्स गिब्ज किंवा शेन वॉर्न नाही; आणि लियॉन म्हणजे मुथय्या मुरलीधरण किंवा सकलेन मुश्‍ताक नाही. पण यांची फिरकी खेळताना अत्यंत बेजबाबदार फटके मारून आपण बाद झालो व आता ऑस्ट्रेलियाला ही कसोटी देखील जिंकण्याची संधी देऊन बसलो आहोत.
बॅंकेतून चार वेळा व्यवहार केला, की नंतरच्या पाचव्या व्यवहारावर दीडशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे, तद्वत भारताने चार मालिकांत खोऱ्याने धावा ओढल्या आणि आता पाचव्या मालिकेत संघावर दंड भरण्याची नामुष्की ओढवली आहे. उपरोध सोडा, पण कचखाऊ, बेजबाबदार वगैरे जी काही विशेषणे असतील, तर ती देखील कमी पडतील अशी फलंदाजी या मालिकेत आपले फलंदाज करत आहेत. पहिल्या कसोटीत पुण्यात पहिल्या डावात के. एल. राहुलने अर्धशतकी खेळी केली होती. दुसऱ्या सामन्यातही त्याने पहिल्या डावात 90 धावांची खेळी केली, शतक साकार करण्यात तो अपयशी ठरला. मात्र तो वगळता बाकी सगळे भारतीय फलंदाज आयाराम-गयाराम ठरत आहेत. ‘रन मशीन ‘ विराट कोहली, चेतेश्‍वर पुजारा, अभिनव मुकूंद, अजिंक्‍य रहाणे, करूण नायर, रविचंद्रन अश्‍विन वृद्धिमान साहा, रविन्द्र जडेजा यांना ऑस्ट्रेलियाची फिरकी खेळताना इतके जड जात होते, की ते पाहावत नव्हते. असे वाटते होते, की फिरकी आणि खेळपट्टीचे भूत, जे पुण्यातील सामन्यात मानगुटीवर बसले आहे; ते अद्याप उतरलेले नाही. दुसऱ्या डावात पुजारा, राहुल आणि रहाणे यांनी थोडी फार जिगर दाखवत फलंदाजी केली. अन्यथा हा सामना जवळपास गमावलाच होता.
फलंदाजी सल्लागार हवा
सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर किंवा राहुल द्रविड यांना भारतीय संघाचा फलंदाजी सल्लागार नियुक्त करावे असे आता प्रकर्षाने जाणवू लागले आहे. गेल्या चार मालिकांमध्ये खोऱ्यांनी धावा करणारा संघ इतकी लाजीरवाणी फलंदाजी ऑस्ट्रेलियाविरुध्द करत आहे, की संघात कोणी जबाबदार व्यक्ती आहे की नाही असा प्रश्‍न पडावा.
वीरेंद्र सेहवाग म्हणायचा, की एखादया गोलंदाजाची गोलंदाजी तुम्ही सावधपणे खेळू शकत नसाल, तर सरळ सरळ आक्रमण करा. ‘आक्रमकता हेच बचावाचे योग्य धोरण’ असते हे सेहवागच नव्हे,. तर सर व्हिवीयन रिचर्डस्‌पासून सर्वच आक्रमक फलंदाज सांगतात. मग मुळातच आक्रमक असलेला विराट कोहली याच मालिकेत दर्जाहीन का वाटतो आहे. नेटमध्ये सराव करताना वर उल्लेख केलेल्यांपैकी एका मोठ्या खेळाडूला पाचारण करा व कोणत्या फलंदाजाचे काय आणि कुठे चुकत आहे, ते एकदातरी तपासून घ्या. व्हिडीओ ऍनालीसकडून आपल्या दोन्ही सामन्यांचे चित्रीकरण मागवून त्यावर या खेळाडूंचे समीक्षण संघातील प्रत्येकाला सांगायला हवे.
भारताचे दौरे करणारे अनेक ऑस्ट्रेलिया संघ आपण आजवर पाहिले. त्यातला आजचा संघ सर्वात कमकुवत आहे, पण तोच भारी पडतोय. बंगळुरू कसोटीत ज्या पध्दतीने पायचीत आणि झेलबाद होत आपल्या फलंदाजांनी स्वतःच्या विकेट गमावल्या, त्या पाहता केवळ आत्मपरीक्षण करून उपयोग नाही; तर जबाबदारीची जाणीव करून देणे गरजेचे आहे. मुळात प्रश्‍न हा आहे विराट कोहली बाद झाल्यावर खेळपट्टीवर ठाण मांडून डावाची जबाबदारी आपल्या खांदयावर घेणारा एकही फलंदाज संघात नाही, असे कसे ? ज्यांना या कसोटीत संधी दिली ते अभिनव मुकूंद आणि करूण नायर ज्या पध्दतीने बाद झाले, त्याला दर्जाहीन असेच म्हणावेसे वाटते. एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांत धडाकेबाजे कामगिरी करणाऱ्या केदार जाधवला तिसऱ्या सामन्यापासून संघात घ्यावे व संधी द्यावी, हा मुलगा ‘कसोटीवर’ खरा उतरेल इतकी गुणवत्ता त्याच्याकडे निश्‍चितच आहे. मात्र दुखापतीतून सावरणाऱ्या रोहित शर्माला पुन्हा एकदा कसोटी संघात घेऊन तिसऱ्या कसोटीचीही माती करणारी आपली निवड समिती आहे, त्याला कोण काय करणार ?
मानसोपचार तज्ञाची गरज
एखादया व्यक्तीला मानसिक नैराश्‍यातून किंवा धक्कयातून सावरण्यासाठी कोणत्याही मानसोपचार तज्ञाची गरज भासते. आता भारतीय खेळाडूंना अशा एखादया मानसोपचार तज्ञाची गरज आहे. प्रशिक्षक अनिल कुंबळे किंवा त्यांचा सपोर्ट स्टाफ हे काम करू शकत नाहन्यू हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगला देश यांच्याविरुध्दच्या मिळून सलग चार मालिका ज्या संघाने जिंकल्या तोच भारतीय संघ ऑस्ट्रेलियासमोर इतका लाचार कसा झाला हे न उलगडलेले कोडे आहे. खेळपट्टया तयार करणारे क्‍युरेटर, स्थानिक संघटना व त्यांचे पदाधिकारी ‘लोढा समिती’ वर नाराज होऊन मुद्दाम पहिल्याच दिवशी फिरकीला साथ देणारी खेळपट्टी बनवत आहेत का, असाही संशय येत आहे. पण ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज धावा करू शकतात तिथे याच मातीत लहानाचे मोठे झालेले भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी कसे ठरत आहेत. अचानक इतकी भयभीत आणि नकारात्मक मानसिकता कशी काय झाली आपल्या फलदाजांची. म्हणूनच आता उर्वरित सामने व मालिका वाचवायची असेल आणि जागतिक कसोटी मानांकनातील पहिले स्थान टिकवायचे असेल तर खरोखर मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी.
कांगारूंना दुबई लाभली
भारताच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाने त्यांचे सराव शिबीर दुबईत आयोजित केले होते. भारतीय खेळपट्टयांप्रमाणेच तेथील खेळपट्टया असल्याने फलंदाज आणि गोलंदाजांना नेमका सराव मिळावा हा त्यांचा हेतु होता. तो तंतोतंत लागू पडला. या मालिकेतील पहिल्या दोन्ही कसोटी सामन्याचे समीक्षण करताना एक गोष्ट स्पष्ट होत,े की दुबईतील सरावामुळे ऑस्ट्रेलियाचे नवखे आणि अननुभवी फलंदाज भारतीय फिरकीसमोर कधी नव्हे, इतके यशस्वी ठरत आहेत आणि त्याच वेळी भारतीय फलंदाज मात्र त्यांच्या फिरकीसमोर साफ अपयशी ठरत आहेत. दुबईतील कोरडयाठाक खेळपट्टयांवर चेंडू फिरवण्याचा सराव नॅथन लियान आणि स्टिव ओकीफ यांना चांगलाच फायदेशीर ठरला. भारतातील ज्या खेळपट्टयांवर पहिले दोन्ही कसोटी सामने झाले, ते अशाच कोरडयाठाक खेळपट्टयांवर झाले, जिथे भारतीय फलंदाजीचे ‘पानीपत’ झाले. पाण्याशिवाय तडफडणाऱ्या माशाची जी अवस्था होते, ती भारतीय फलंदाजांची झाली.
नाणेफेकीने तारले
भारतीय उपखंडातील खेळपट्टया फिरकी गोलंदाजीसाठी पोषक असतात. त्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या दिवसापासून फिरकी गोलंदाजीसमोर धावा करणे किंवा धावांचा पाठलाग करून सामना जिंकणे अथवा वाचवणे अशक्‍यप्राय असते. अशा खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणे व प्रथम फलंदाजी करणे कधीही सुलभ ठरते. कारण मग चौथ्या डावात फलंदाजीची वेळ येत नाही. पुणे कसोटीत पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकूनही विराट सेना 189 धावांत गारद झाली. नाणेफेकीचा कौल विराटच्या बाजूने लागूनही आपण त्याचा फायदा घेण्यात साफ अपयशी ठरलो. पहिल्या डावात केलेली चूुक दुसऱ्या डावात मात्र आपण सुधारली आणि नाणेफेकीचा कौल अपयशी ठरणार नाही याची काळजी घेतली. मात्र ज्या खेळपट्टीवर पहिल्याच दिवसापासून फिरकी गोलंदाजांना मदत मिळायला सुरुवात झाली, त्या खेळपट्टीवर फिरकीवर दादागिरी करणारे आपलेच फलंदाज कचरखाऊ ठरले. ज्या फिरकी गोलंदाजीवर आपल्या गोलंदाजांनी जागतिक दर्जाच्या फलंदाजांना नाचवले; आता त्याच परदेशी संघातील फिरकी गोलंदाज आपल्या फलंदाजांना ‘आटयापाटया’ खेळायला लावत आहेत.
विराटच्या बॅटला नजर लागली
गेल्या दोन मोसमात हजारच्यावर धावा, गेल्या चार मालिकेत चार द्विशतके ठोकून विक्रम सम्राट साकार करणारा ‘रन मशीन’ विराट कोहली या मालिकेत मात्र साफ अपयशी ठरत आहे. अंधश्रध्दा नव्हे पण त्याच्या या धवांच्या रतीबाला नक्कीच कोणाची तरी नजर लागली की काय असा प्रश्‍न मनात निर्माण झाला आहे. सर डॉन ब्रॅडमन, राहुल द्रविड यांच्या द्विशतकी खेळींची बरोबरी करताना विराटने वेस्ट इंडिज, न्युझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेश यांच्याविरूध्दच्या चार मालिकांत द्विशतकी खेळी केल्या. यंदाच्या मोसमातही हजारपेक्षा जास्त धावा करत जागतिक स्तरावर विक्रमी कामगिरी केली. इतका भरात असणारा फलंदाज एकाएकी सपशेल अपयशी कसा ठरतो हे कोडे निर्माण झाले आहे. तंत्र, एकाग्रता, शॉट सिलेक्‍शन, फुटवर्क, हेड मुव्हमेंट, चेंडूवर पाय येणे यांपैकी एकही निकष या दोन्ही कसोटी सामन्यांत त्याच्याबाबतीत खरा ठरला नाही. ज्या खेळी त्याने यापूर्वी केल्या त्याचे चित्रीकरणे जरी आता त्याने पुन्हा एकदा पाहिजे तर परत एकदा भरात आलेला विराट बघायला मिळेल.
पुण्यातील पराभवानंतर अत्यंत संघर्षाने बंगळुरूमध्ये मिळवलेला हा विजय भारतीय खेळाडूंना निश्‍चीतच आत्मविश्‍वास परत मिळवून देईल. रांची आणि धर्मशाळा येथील सामन्यात तोच पूर्वीचा भरात असलेला भारतीय संघ आणि रन मशीन विराट कोहली बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

-अमित मधुकर डोंगरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)