हरगड किल्ला…

साईप्रसाद कुंभकर्ण

सह्याद्री पर्वताच्या उत्तर- दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणाऱ्या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड, असे गड आहेत. तर डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्‍चिमेकडील गुजरातमधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत. सटाणा तालुक्‍यात व डोलबारी रांगेवर हरगड गिरिदुर्ग असून याची उंची साधारण 4420 फूट इतकी आहे. साल्हेर मुल्हेर किल्ले महाराष्ट्रातील गडप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहेत. यातील मुल्हेर गावात गेल्यावर आपल्याला हरगडचे दर्शन होते. मुल्हेर गावातून समोर दिसणारा मुल्हेर, डावीकडे मोरागड आणि उजवीकडचा हरगड किल्ला होय.

-Ads-

गडाचा परिचय :
“हरगड’ या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत. या दोन्ही वाटा मुल्हेरवाडी गावातूनच जातात. मुल्हेरवाडी गावात पोहोचण्यासाठी नाशिक मार्गे सटाणा हे गाव गाठावे. सटाण्याहून साधारण 25 कि. मी. वरील ताहाराबादला जावे. ताहाराबाद गावातून मुल्हेरवाडीला जाण्यासाठी एसटी किंवा खासगी जीप मिळतात. मुल्हेरवाडी गाव ते किल्ल्याचा पायथा यात अंदाजे 2 कि.मी. चे अंतर आहे. गावातून अर्धा तास चालत गेल्यावर डावीकडे एक घर लागते आणि समोरच वडाचे एक झाड दिसते. झाडापासून सरळ पुढे जावे, दहा मिनिटांतच धनगरवाडी लागते. धनगरवाडीवरून गडाकडे जाणारी वाट पकडावी. साधारण एक तासाने 2 वाटा फुटतात, एक वाट सरळ, तर दुसरी उजवीकडे वळते. उजवीकडे जाणाऱ्या वाटेने 45 मिनिटांत मुल्हेर माची आणि हरगड यांच्या मधील खिंडीत पोहोचता येते.

या खिंडीतून डावीकडे मुल्हेर तर उजवीकडे हरगड लागतो. या खिंडीत डावीकडून मुल्हेरच्या गणेश मंदिराजवळून येणारी वाटसुद्धा येऊन मिळते. येथून पुढे अर्धा तास चालत गेल्यावर आपण एका घळीपाशी पोहोचतो. या घळीतून वर चढल्यावर आपण हरगडाचे पहिले प्रवेशद्वार गाठू शकतो. संपूर्ण घळ पार करण्यास साधारण 1 तास लागतो. या गडाचा गडमाथा प्रशस्त आहे. मुल्हेर माचीवरुन येणाऱ्या वाटेने गडावर प्रवेश करताना तीन दरवाजे लागतात. सगळ्या दरवाजांची पडझड झालेली आहे. सर्वात शेवटच्या दरवाजाने गडावर प्रवेश केल्यावर समोरच महादेवाचे मंदिर आहे. मंदिरासमोरून दोन वाटा फ़ुटतात. डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पाण्याचे एक टाके लागते. तेथेच समोर घरांचे व वाड्याचे अवशेष दिसतात. पाण्याच्या टाक्‍याच्या खालून एक वाट खाली उतरते. या वाटेने खाली उतरल्यावर आपण एका तळ्याजवळ पोहोचतो. तळ्याच्या मागच्या बाजूला एक दरवाजा आहे. हे सर्व पाहून पुन्हा मंदिरापाशी परत यावे. आता उजवीकडची वाट पकडावी आणि गडाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचावे. गडाच्या या टोकावर एक मोठी तोफ़ पडलेली दिसते. या गडाचा गडमाथा फ़िरण्यास दोन तास पुरतात. असा हा हरगड इतिहासाची साक्ष देत निसर्गाशी झुंजत उभा असून या गडावरून मुल्हेर गडाची माची, मोरागड, न्हावीगड, मांगीतुंगी आणि साल्हेर असा सगळा आसपासचा परिसर दिसतो.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)