हम आपके है कौन ?

– सम्राट गायकवाड

लोकसभा अन विधानसभेच्या निवडणुका जस जशा जवळ येवू लागल्या आहेत तसतसे वातावरण तापायला सुरूवात झाल्याचे जाणवू लागले आहे. ठीकठीकाणी होणाऱ्या सभा व पत्रकार परिषदांच्या माध्यमातून प्रतिस्पर्धींमध्ये टोकाच्या टिप्पण्या होवू लागल्या आहेत. एवढेच काय तर, खासगी जीवनावर चिखलफेक होण्याइतपत सातारा जिल्ह्याचा राजकारणाचा दर्जा खालावू लागला आहे. ही बाब गंभीर असून येत्या काळात राजकारणात येवू पाहणाऱ्या युवकांनी त्यांच्याकडून नेमका काय बोध घ्यावा ? की त्यांनी ही राजकारणात आल्यानंतर अशाच पध्दतीने टिप्पण्या कराव्यात अशी अपेक्षा त्या लोकप्रतिनिधींना आहे का ? हा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. तसेच एकमेकांवर आरोप ज्या कारणासाठी केले जात आहेत त्यातून नेमके साध्य काय करावयाचे आहे ? निवडणुकांच्या माध्यमातून निवडून जावून त्यांना नेमकी जनतेची सेवा करण्याची एवढी हौस का, असा देखील प्रश्‍न साहजिकच निर्माण होतो. वास्तविक मागील 20 वर्षापूर्वीपासून राजकारणाचा दर्जा खालावायला सुरूवात झाल्याचे दिसून येते. त्यामध्ये निवडणूक व भ्रष्टाचाराची प्रकरणे ही चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते. निवडणुकांमध्ये येणारा काळा पैसा स्विकारण्याची मानसिकता मतदारांची करण्यास सुरूवात झाली व खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पाया खचण्यास सुरूवात झाली. निवडणुकीत मतदारांनी लाचारी केल्यामुळे आपसुकच लोकप्रतिनिधींना आपण मतदारांचे मालक झाल्याचा अर्विभाव निर्माण झाल्याचे पदोपदी दिसून येते. परिणामी सार्वजनिक जीवनात वावरताना व बोलताना आपला आचार व विचार कसा असावा, याचे भान देखील त्यांना रहात नाही आणि मतदार ही त्यांना जाब विचारत नाहीत ही खरी शोकांतिका आहे. उलट टिका, टिप्पण्या व नको त्या स्टाईलचा आनंद युवा मतदार घेताना दिसून येतात तेव्हा साहजिकच सुशिक्षित व जबाबदार मतदारांचे प्रश्‍न बाजूला पडायला सुरूवात होते. तसाच प्रकार सध्या सातारा जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्याचे नेमके प्रश्‍न सोडविण्याचे तर बाजूलाच राहिले आहे. मुळ प्रश्‍नांवर बोलण्याची जबाबदारी सत्ताधारी व विरोधक देखील घेताना दिसून येत नाही. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रस्ते, आरोग्य, पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर असते हे स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष झाल्यानंतर ही नमूद करावे लागते ही मोठी शोकांतिका आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात तसेच आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसे डॉक्‍टर नाहीत, त्यावर कोणीही बोलायल तयार नाही. रस्त्यांची अवस्था ही तशीच. शिक्षण हक्क कायद्याच्या अमंलबजावणी बद्दल कोणी ही सजग नाही. त्यावर देखील कोणी बोलत नाही. मात्र, निवडणुकांच्या तोंडावर एकमेकांवर चिखलफेक करून मुळ प्रश्‍नांना बगल देणे ही जिल्ह्याच्याच नव्हे तर देशातील सर्वच पक्षांच्या नेत्यांची खासयित राहिली आहे. मात्र, बोटावर मोजण्या इतपत सजग व सुशिक्षित मतदार या सर्व बाबीवर लक्ष ठेवून आहे, हे त्यांना लक्षात ठेवावे हे नक्की.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)