व्यापाऱ्यांनी संप पुकारू नये : पणन संचलनालयाचे परिपत्रक

पुणे – हमीभावाबाबतच्या चुकीच्या समजामुळे राज्यातील काही भुसार व्यापाऱ्यांनी काही बाजार समित्यांमध्ये बंद पुकारला आहे. याबाबत पणन संचलनालयने परिपत्रक काढून शिक्षा किंवा दंडाची तरतूद असल्याचा कुठलाही कायदा केला नसल्याचा खुलासा केला आहे.

राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून व्यापाऱ्यांनी शेतीमाल खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.शेतकऱ्यांना माल फेकून द्यावा लागत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना सहा महिन्यांची शिक्षा व दंड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. प्रत्यक्षात याबाबत निर्णय झाला असला, तरी कायदा मात्र झालेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी घाबरुन जावू नये.

याबाबत पणन संचालनालयाने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे, की अधिनियम 1963 व नियम 1967 मध्ये हमी दरापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी शेतीमाल खरेदी केल्यास दंडाची वा शिक्षेची कोणतीही तरतूद नाही. तसेच याबाबत शासनाने कोणतेही आदेश काढलेले नाहीत. त्याचबरोबर गेले काही दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेली बाजारपेठ त्वरीत सुरू करावी. पणन संचलनालयातील अधिकाऱ्यांनी याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा करुन बाजारपेठ त्वरीत कशाप्रकारे सुरू होतील याची पूर्तता करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)