हद्दीतील जुन्या वाड्यांचे करायचे काय

वाढती डोकेदुखी : कॅन्टोन्मेंट बोर्डासमोर प्रश्‍न, उत्तर सापडेना


कॅन्टोन्मेंट कायद्यात सकारात्मक बदलांची अपेक्षा

पुणे – लष्कर परिसरात मोठ्या प्रमाणात जुने वाडे आहेत. यातील अनेक वाडे मोडकळीस आले असून, काही अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे, अशा वाड्यांमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे. मात्र, वाड्यांच्या नूतनीकरणाबाबतची किचकट परवानगी प्रक्रिया, मालकी हक्काबाबत साशंकता, मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद अशा विविध कारणांमुळे या वाड्यांबाबत कारवाईत अडसर निर्माण होत आहे. परिणामी, या वाड्यांची स्थिती अत्यंत धोकादायक बनली असून याबाबत नेमके करायचे काय? असा प्रश्‍न कॅन्टोन्मेंट बोर्डासमोर निर्माण झाला आहे.

लष्कर परिसरातील जुन्या वाड्यांपैकी सुमारे 100 हून अधिक वाडे हे धोकादायक स्थितीत आहेत. मूळ मालकाबाबत माहिती नसणे, भाडेकरारातील गोंधळ तसेच नूतनीकरणाबाबतची किचकट परवानगी प्रक्रिया यामुळे या वाड्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी वाड्यांच्या भिंती मोडकळीस आल्या आहेत. विशेषत: पावसाळ्यात या वाड्यांचा प्रश्‍न अधिक गंभीर असतो. यामुळे नागरिकांच्या जीवास धोका उदभविण्याची शक्‍यता असते. त्यामुळे हे वाडे बोर्डाच्या सदस्यांसाठी चिंतेचा विषय आहे.

याबाबत नगरसेवक विनोद मथुरावाला म्हणाले, “लष्कर भागातील घोरपडी, वानवडी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जुने वाडे आहेत. या वाड्यांच्या नूतनीकरण, बांधकामाबाबत लष्करी मुख्यालयातर्फे परवानगी घ्यावी लागते. या प्रक्रियेत बराच वेळ जातो. दरम्यान, एखाद्या नागरिकाने त्याठिकाणी काही बांधकाम केले, तर त्यांना “नोटीस’ पाठवून पुन्हा ते बांधकाम पाडले जाते, अथवा त्या व्यक्तीस कायदेशीर बाबींच्या चक्रव्युहात अडकावे लागते. यामुळे परिसरातील नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे.

बोर्डाच्या सदस्यांमध्ये लष्करी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या दोन्हींचा सहभाग आहे. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार बोर्डाला मिळावा, अशी मागणी बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियंका श्रीगिरी यांनी केली आहे. दरम्यान, नुकत्याच पुणे भेटीवर असलेल्या केंद्रीय समितीसमोरही हा विषय मांडण्यात आला असून, लवकरच कॅन्टोन्मेंट कायद्यात सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा बोर्डाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)