हत्याकांडातील आरोपींचा तत्काळ शोध घेऊ

जिल्हाधिकारी महाजन, आमदार राजळेंसमवेत शेवगावला भेट

शेवगाव – शेवगाव येथील एकाच कुटुंबातील चौघा जणांचे हत्याकांड करणाऱ्या मारेकऱ्यांचा लवकरात लवकर छडा लावू व पीडितांना न्याय देऊ, असे आश्‍वासन पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले. मृतदेहांची उत्तरीय तपासणी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊनच औरंगाबाद येथे करत आहोत. तेथे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत बारकाईने तपासणी होत असल्याने शवविच्छेदनास विलंब झाला, असा खुलासा शिंदे यांनी केला.

पालकमंत्री शिंदे, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा, आमदार मोनिका राजळे यांनी आज मृतकांचे कुटुंबीय, तसेच नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ही घटना पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेतली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद केले जाईल. मयतांचे नातेवाईक, शेजारचे नागरिक, तसेच अन्य कुणालाही घटनेबद्दल काही माहिती असल्यास त्यांनी ती पोलीस प्रशासनाला द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल याची खात्री बाळगावी, असे आवाहन शिंदे यांनी केले.
मारेकऱ्यांना पकडल्यावरच या कुटुंबास न्याय मिळणार आहे. अप्पासाहेब हारवणे यांचे कुणाशीही वैराचे संबंध नव्हते. ते साध्या सरळ स्वभावाचे होते. या कुटुंबावरचे दुःख फार मोठे आहे. ही घटना समाजास काळिमा फासणारी आहे. नागरिकांनी देखील प्रशासनाला मदतीसाठी पुढे यावे, अशी विनंती शिंदे यांनी केली.

आई व सासूने फोडला टाहो..

अप्पासाहेब हारवणे यांची आई गोपिकाबाई व सासू राधाबाई झिरपे यांनी भेटीसाठी आलेल्या सर्वांसमक्ष मोठा टाहो फोडला. मंत्र्यांचा ताफा वडुले या गावी आई गोपिकाबाईंना भेटण्यासाठी गेला. “आमच्यासाठी सर्व काही संपले आहे. आता आमच्याही जगण्याला काही अर्थ नाही. आम्हालादेखील कुणीतरी मारून टाका,’ असा आक्रोश या दोघांनी केला. त्यामुळे पालकमंत्री शिंदे, आमदार राजळे तसेच जिल्हाधिकारी निःस्तब्ध झाले.

शीतलला पाहून सर्वांनाच दाटून आले
कुटुंबात बचावलेली एकमेव शीतल ही आपली आजी राधाबाई यांच्याजवळ बसलेली होती. तिला पाहून सर्वांनाच गहिवरून आले. शब्द फुटेनासे झाले. काय बोलावे, सांत्वन कसे करावे सूचत नव्हते. सर्वच जण हतबल झाले होते. आक्रोश, टाहो यामुळे वातावरण मोठे उदास झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)