हडपसरसह काही उपनगरांमध्ये दिवसाआड पाणी

बहुतांश पेठांमध्ये दररोज पहाटे आणि सकाळी 10 वाजता पुरवठा


समान पाणी देण्यात येणार असल्याचा महापालिकेचा दावा 

पुणे – महापालिकेने पाणी पुरवठ्याचे नियोजन जाहीर केले असून, हडपसरसह काही उपनगरांमध्ये दिवसाआड पाणी देण्यात येणार आहे. तर बहुतांश पेठांमध्ये दररोज पहाटे आणि सकाळी 10 वाजता पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सोमवारपासून या वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

समान पाणीपुरवठा करण्यासाठी वेळापत्रकात बदल केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यातूनच त्यांनी संपूर्ण शहराचे पाच तास पाणी पुरवठ्याचे नियोजन जाहीर केले आहे. या नियोजनातूनच सर्वांना समान पाणी देण्यात येणार असल्याचाही दावा महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी केला आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले आहे. मात्र, उपनगरांमध्ये एक दिवसाआड पाणी मिळणार आहे. त्यामुळे हे समान पाणी मिळण्याचे नियोजन आहे की, कपातीचे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेला 1,150 एमएलडीच पाणी मिळणार असून, त्याप्रमाणेच महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. बहुतांश पेठांच्या भागांमध्ये पहाटे आणि सकाळी 10 च्या वेळेत पाणीपुरवठा होणार असून, झोपडपट्टी आणि उपनगरांमध्ये दुपारी आणि संध्याकाळी पाणीपुरवठा केला जाणार आहे.

वेळेत बदल नाही
जलशुद्धीकरणांतर्गत येणाऱ्या पंपिंग स्टेशन्सनिहाय वितरण व्यवस्थेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वडगांव जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेले धनकवडी, कात्रज, कोंढवा बुद्रुक, वडगाव धायरी इ. भागांतील पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्यात येणार नसून, पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात येणार नाही. तसेच काही भागांतील वेळापत्रकातही बदल करण्यात आला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)