हडपसरमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत कलगीतुरा

थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, तुपे यांच्याकडून दोघांचीही पाठराखण

पुणे – हडपसर येथील कै. रामचंद्र आप्पा बनकर शाळेतील अनेक प्रश्नांवरून राष्ट्रवादीतील दोन नगरसेवकांमध्ये कलगीतुरा रंगला असून, त्या दोघांनी एकमेकांविरुद्ध थेट पक्षश्रेष्ठींकडेच तक्रार केली आहे. मात्र या दोन नगरसेवकांत कोणताही वाद नसल्याची सारवासारव करत विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी त्यांची पाठराखण केली आहे. बनकर शाळेत सकाळी सात वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी आंदोलन सुरू केले. त्याचवेळी तेथे त्याच प्रभागातील समपक्षाच्या नगरसेविका वैशाली बनकर आल्या. ससाणे यांनी खाकी रंगाची हाफ पॅण्ट आणि पांढरा शर्ट असा शालेय पोषाख करून आंदोलन केले. मात्र बनकर यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला नाही. त्यांनी पालकांशी संवाद साधला आणि त्या तेथून निघून गेल्या.

ही शाळा महापालिकेची आहे. यामध्ये सुमारे 1600 विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेमध्ये एकूण 54 वर्ग खोल्या असून त्यापैकी फक्त 27 वर्ग खोल्या सुरू आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये मिळून केवळ पंधराच शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. महापालिकेच्या अन्य शाळांपेक्षा सर्वात अद्ययावत सोयींनी युक्त असलेल्या या शाळेत ग्रंथालय, सायन्स लॅब, एरोमॉडलिंग, संगणक लॅब, संगीत रूम, तसेच ऑडिटोरिअम, जिम, बॅडमिंटन हॉल, स्नूकर हॉल, स्विमिंग टॅंक आणि टेबल टेनिस आहे. शिक्षकांअभावी या सुविधा धूळ खात पडलेल्या आहेत. यावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ससाणे यांनी आंदोलन केले. नगरसेवक महेंद्र पठारे यांनीही खराडी भागातील पालिकेच्या शाळेमधील असुविधांसाठी या सह्यांच्या मोहिमेस उपस्थित राहून पाठिंबा दिला.

वेगळे असल्याचे भासवू नका – वैशाली बनकर

हा विषय प्रशासकीय पातळीवर सोडवला पाहिजे होता. पालकांना वेठीला धरून लोकप्रतिनिधींनी असे कृत्य करणे चुकीचे असल्याची टीका वैशाली बनकर यांनी ससाणे यांचे नाव न घेता केली. एवढेच नव्हे तर अशाप्रकारचा महिलांना लज्जास्पद वाटेल अशी वेशभूषा करणेही चुकीचे असल्याचे त्या म्हणाल्या. आपण वेगळे आहोत हे दाखवून राजकीय स्टण्टबाजी करण्याची काहीच गरज नसल्याचेही त्या म्हणाल्या. मी देखील यासाठी प्रयत्न करत असून अतिरिक्त आयुक्तांशी याबाबत बोलले असल्याचे त्यांनी नमूद केले.

शाळा बापजाद्यांची इस्टेट नव्हे – योगेश ससाणे

शाळेत केलेल्या सोयी विद्यार्थ्यांना वापरता याव्यात, पुरेसे शिक्षक त्यांना मिळावेत एवढ्या हेतूने हे आंदोलन केले होते. वास्तविक या शाळेत शिक्षक भरती प्रक्रिया लवकर सुरू होणे आवश्‍यक होते मात्र तसे न झाल्याने आंदोलन करावे लागले आहे. मुळात ही महापालिकेची शाळा आहे, ती कोणाच्या बापजाद्यांची इस्टेट नव्हे की त्याला नाव द्यावे, अशी थेट टीका ससाणे यांनी केली. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचेही ससाणे यांनी नमूद केले. पक्षाचे नेते अजित पवार आणि शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या कानावर ही बाब घातल्याचे ससाणे म्हणाले.

विरोधी पक्षनेत्यांची शाब्दिक कसरत

या प्रकरणात बेबनाव असा काहीही झालेला नाही. दोन्ही नगरसेवकांची शिक्षक भरती व्हावी हीच मागणी आहे. त्यांच्यात कोणताही विसंवाद नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेते तुपे यांनी शाब्दिक कसरत करत वेळ मारून नेली. दोनही नगरसेवक एकत्र काम करत आहेत असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)