हजारो वाहन परवाने “गहाळ खात्यात’

निशा पिसे
पिंपरी – नागरिकांना घरबसल्या वाहन परवाना मिळावा यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने टपाल खात्याची मदत घेतली. मात्र, आरटीओ बरोबरच टपाल खात्याच्या गहाळ कारभाराचा फटका परवान्यांना बसत आहे. महिन्याकाठी शेकडो परवाने गहाळ होत असून ते नेमके आरटीओमध्ये आहेत की टपालात याचे उत्तर नागरिकांना मिळत नाहीत. पुन्हा परवाना मिळवण्यासाठी नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागांतर्गत (आरटीओ) पिंपरी-चिंचवड शहरासह खेड, जुन्नर, आंबेगाव, मावळ तालुका येतो. लोकांना परवाना घेण्यासाठी चकरा माराव्या लागू नयेत म्हणून टपालाद्वारे परवाने घरपोच पोहोचविण्याचा निर्णय झाला. एक परवाना घरी पोहोचविण्यासाठी टपाल विभागाला 50 रुपये शुल्क अदा केले जाते. त्यामुळे वाहन चालकांचा परवाना मिळविण्यासाठीचा खर्च अडीचशे रुपयांवर जातो. पैसे खर्च करूनही वेळेत परवाना मिळत नसल्याचा अनुभव नागरिकांचा आहे.

-Ads-

याबाबत विचारणा करण्यासाठी ते आरटीओत जातात. परवाना तुमच्या भागातील टपाल कार्यालयात पाठविल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ते टपाल कार्यालयात धाव घेतात. तर तेथेही पोस्टमनला विचारा, पत्ता चुकीचा असेल, पुन्हा आरटीओकडे पाठविला असेल अशी उत्तरे त्यांना दिली जातात. परवाना टपालाद्वारेच मिळणार असल्याने तो परत आला तरी संबंधितांना देण्याबाबत आरटीओ कार्यालयाकडून असर्मथता दर्शविली जाते. परवाना घरपोच मिळावा यासाठी पत्त्यातील दुरुस्तीबाबतचा अर्ज करावा लागतो. पुन्हा टपाल खर्चासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागते. या प्रकारामुळे टपाल कार्यालयाच्याही फेऱ्या वाढल्याची तक्रार वाहन चालक करतात.

परवाना प्राप्तीसाठी नागरिकांनी दिलेले पत्ते अपुरे असतात. पोस्टमनने चकरा मारूनही काही नोकरदार भेटत नाहीत. आम्हाला प्राप्त झालेला परवाना दोन दिवसांपेक्षा अधिक दिवस आमच्याकडे ठेवता येत नाही. त्यामुळे परवाने पुन्हा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविले जातात, असे टपाल खात्याचे कर्मचारी सांगतात. तर दुसरीकडे टपाल खात्याकडूनच वाहन परवाने गहाळ होत असून आम्हाला नाहक नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो, अशी तक्रार आरटीओ अधिकारी करीत आहेत. आरटीओ व टपाल खात्यातील समन्वयाच्या अभावाचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

दुबार परवान्यासाठी नाहक भूर्दंड
नागरिकांना 48 तासांच्या आत वाहन परवाना घरपोच मिळाला पाहिजे, असा नियम असला तरी मुळात आरटीओकडूनच सर्व प्रक्रिया पूर्ण करुन टपाल खात्यापर्यंत परवाने पोहचण्यास विलंब होतो. टपाल खात्याच्या ताब्यात परवाने आल्यानंतर “पॅकींग’, “बारकोडींग’ यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर टपाल खात्याकडून विभागीय कार्यालयांकडे हे परवाने पाठवले जातात. त्यानंतर वितरणाला सुरुवात होते. या सर्व प्रक्रियेला दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. परवाना रिटर्न गेल्यावर दोन महिन्यांच्या आत तो आरटीओ कार्यालयाकडून मिळवावा लागतो. ही मुदत उलटून गेल्यावर परवाना हरवल्याची नागरिकांना पोलिसांत तक्रार द्यावी लागते. त्यानंतर आवश्‍यक कागदपत्र सादर करुन दुबार परवाना नागरिकांना दिला जातो. 50 रुपयांचे शूल्क भरावे लागते. यामध्ये हकनाक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

नागरिकांचे हेलपाटे वाचावेत यासाठी टपाल खात्यामार्फत वाहन परवाने पाठविण्यात येतात. मात्र कित्येकांची घरेच बंद असतात. पत्तेही चुकीचे असतात. त्यामुळेच हे वाहन परवाने परत येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पत्ता योग्य दिला आहे का याची खातरजमा करावी. दोन महिन्याच्या आत परवाना न मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ आरटीओ कार्यालयात यावे. टपाल खात्याकडून परत आलेले परवाने रिटर्न फॉर्म, रहिवास पुरावा, एक छायाचित्र सादर केल्यानंतर 50 रुपयांचे शूल्क आकारणी करुन तात्काळ दिले जातात.
आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड.

वाहन परवाने घरपोच मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये दिवसें-दिवस वाढ होत आहे. आरटीओकडून टपाल खात्यापर्यंत परवाने पोहचण्यास विलंब होतो. तेथून वितरणाची टपाल खात्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. अशा परिस्थितीमध्ये परवाने परत आल्यास ते मिळवण्याची नागरिकांसाठी मुदत उलटून जाते. अशा वेळी परवाना हरवल्याची पोलिसांत तक्रार द्यावी लागते. अनेक हेलपाटे मारल्यानंतर नागरिकांना दुबार परवाना मिळतो. मात्र, त्यासाठी डिलिव्हरी चार्जेस म्हणून 50 रुपये आकारले जातात. नागरिकांनाच खटापट करुन परवाना मिळवावा लागत असताना हे शूल्क आकारण्यामागचे गणितच कळत नाही. रिटर्न येणाऱ्या परवान्यांचे कारण टपाल खात्याकडून दिले जात नाही. टपाल खाते व आरटीओची यासंदर्भात संयुक्‍त बैठक घेण्याची मागणी मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनकडून वारंवार केली जात आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
– अनंत कुंभार, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)