हजार कोटींच्या विकासाच्या टप्पा पूर्ण करणार

आ. शंभूराज देसाई : 2019 च्या निवडणुकीच्या रणसंग्रामाचे वाढदिनी फुंकले रणशिंग

काळगाव – 2019 च्या निवडणुकीला सामोरे जाताना गत विधानसभा निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार एक हजार कोटींच्या विकासकामांचा टप्पा पार करणार आहे. कार्यकर्त्यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीसारखी डोक्‍यात हवा जाऊन देऊ नका.

सत्तेची व कामाची हवा माझ्याही डोक्‍यात नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पायावरच देसाईगट मजबूत असून हीच खरी ताकद आहे. गत विधानसभा निवडणुकीत 18 हजार 824 मताधिक्‍य घेत विरोधकांना धोबीपछाड केले होते. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत दुप्पटीने मताधिक्‍य घेऊनच गुलाल उधाळण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन उत्कृष्ट संसदपट्टू आ. शंभूराज देसाई यांनी करीत 2019 च्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

-Ads-

दौलतनगर, ता. पाटण येथे पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित रणसंग्राम 2019 चा पुन्हा आमदार या जाहीर सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, सौ. स्मितादेवी देसाई, सौ. अस्मितादेवी देसाई, युवा नेते यशराज देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई, ईश्वरी, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, शिवदौलत बॅंकेचे चेअरमन ऍड. मिलींद पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख जयवंतराव शेलार, पंचायत समितीचे माजी उपसभापती डी. आर. पाटील, विरोधी पक्षनेते पंजाबराव देसाई, जि. प. सदस्या सुग्रा खोंदू, विजय पवार, हरिषशेठ भोमकर, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे आजी-माजी सदस्य, कारखान्याचे संचालक मंडळ, शंभूराज युवा संघटनेचे अध्यक्ष भरत साळुंखे, उपाध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह युवा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. देसाई म्हणाले, माझ्या 32 वर्षाच्या कारकिर्दीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे घराणे संपविण्यासाठी जिल्ह्याबरोबरच राज्यातील नेत्यांनी प्रयत्न केले.

पाटण तालुक्‍याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व. आबासाहेबांनी शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी उभा केलेला कारखाना हिसकवण्याचा प्रयत्न केला. स्व. आबासाहेब आणि मॉंसाहेबांच्या पराभवाचा वचपा काढत माजी आमदार पिता-पुत्रांना आस्मान दाखविण्याचे काम मतदार संघातील तमाम मतदारांनी केले. माजी आमदार आणि त्यांचे सुपुत्र यांना विधानसभेच्या पराभवानंतर जनतेमध्ये मिसळायला 3 वर्षे लागली होती. 2004 ला आमदरकीच्या पहिल्या टर्ममध्ये विधानसभेतील माझे कामांचे मूल्यमापन करुन उत्कृष्ट संसदपट्टू आमदार म्हणून माझी निवड करुन महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते मला उत्कृष्ट संसदपट्टू आमदार म्हणून पुरस्कार मिळाला होता.

मात्र माजी आमदारांना 26 वर्षाच्या आमदारकीच्या काळात कधी असा कुठला पुरस्कार मिळाला नसल्याने मला मिळालेला पुरस्कार हा वशिल्यांने मिळल्याची टिमकी वाजवत आहेत. ते पुढे म्हणाले, 2009 साली माझा पराभव झाल्यानंतर मी मंजूर आणलेली 79 गावातील विकासकामे माजी आमदारांनी बदलली. त्यासाठी मला उपोषण करावे लागले. 2014 ला पुन्हा आपण आमदार झाल्यानंतर विरोधकांनी मंजूर केलेली कामे मलाही रद्द करता आली असती. मात्र मी तसे केले नाही. विकासकामात दुजाभाव करणे, ही शिकवण आम्हाला सुरुवातीपासूनच नाही.

देसाई घराणे स्वाभिमानी असून मंत्रीपदासाठी हांजी-हांजी करणारे नसल्याचे स्पष्ट करुन ते त्यांनी मतदारसंघातील जनता सुज्ञ असून विरोधकांची आमदारकी, मंत्रीपद आणि माझ्या आमदारकीच्या काळात झालेल्या कामांची तुलना करुनच येणाऱ्या 2019 च्या विधानसभा निवडणूकीत मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक दिलीपराव चव्हाण यांनी केले. आभार अशोकराव पाटील यांनी मानले.

मतदारसंघाचा आमदार कसा हवा? 
माजी आमदारांनी बांधकाम मंत्री असताना कराड-पाटण रस्त्यावर 13 का 14 कोटींचा निधी आणला आणि या रस्त्यावर दोन टोल नाके बसविले. मी कराड ते घाटमाथा रस्त्यासाठी एकूण 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणूनही रस्त्यावर कुठेच टोलनाका बसवून दिला नाही. त्यामुळे जनतेच्या खिशातून पैसे काढणारा की जनतेचे पैसे वाचवणारा आमदार मतदार संघाला हवा? असा प्रश्न आ. शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)